23
सातवे सूत्र
1जेव्हा तू अधिकार्यांबरोबर भोजन करतोस,
तेव्हा तुझ्यासमोर काय#23:1 किंवा कोण आहे हे चांगले लक्षात घे,
2आणि जर तू खादाड असशील
तर तुझ्या गळ्यावर सुरी लाव.
3त्याच्या स्वादिष्ट पदार्थांची हाव धरू नकोस,
कारण ते भोजन फसविणारे आहे.
आठवे सूत्र
4श्रीमंत होण्यासाठी स्वतःला झिजवू नकोस;
स्वतःच्या चातुर्यावर भरवसा ठेऊ नकोस.
5तू श्रीमंतीकडे नजर टाकताच, ते निघून गेलेले असते,
कारण पंख उगवताच
गरुडाप्रमाणे ते आकाशात उडून जाईल.
नववे सूत्र
6कंजूष यजमानाचे अन्न खाऊ नकोस,
त्याच्या स्वादिष्ट अन्नाची हाव धरू नकोस;
7कारण तो अशा प्रकारचा व्यक्ती आहे
जो नेहमीच किमतीबद्दल विचार करीत असतो.
तो तुला म्हणतो “खा आणि पी”
परंतु त्याचे मन तुझ्यावर नसते.
8जे थोडेफार तू जेवला असशील ते ओकून टाकशील
आणि तू केलेली प्रशंसा व्यर्थ होईल.
दहावे सूत्र
9मूर्ख माणसांबरोबर बोलू नकोस,
कारण ते तुझ्या समंजस शब्दांचा तिरस्कार करतील.
अकरावे सूत्र
10पुरातन सीमारेखांसाठी असलेले दगड हलवू नकोस
किंवा अनाथाची शेती बळकावू नकोस.
11कारण त्यांना वाचविणारा परमेश्वर सामर्थ्यशाली आहे;
ते त्यांचा खटला तुझ्याविरुद्ध चालवितील.
बारावे सूत्र
12तुझे चित्त शिक्षणाकडे,
आणि तुझे कान ज्ञानाच्या वचनांकडे लाव.
तेरावे सूत्र
13मुलाला अनुशासन करण्यास संकोच करू नकोस;
जर तू छडीने त्यांना शिक्षा करशील तर ते मरणार नाहीत.
14छडीचा वापर करून त्यांना शिक्षा कर
आणि मृत्यूपासून त्यांचे रक्षण कर.
चौदावे सूत्र
15माझ्या मुला, जर तुझे अंतःकरण सुज्ञ असेल
तर माझे मन खरोखरच आनंदी होईल;
16जेव्हा तुझे ओठ न्यायपूर्ण शब्द बोलतील
तेव्हा माझा अंतरात्मा उल्हास करेल.
पंधरावे सूत्र
17तुझ्या अंतःकरणात दुष्टांचा हेवा करू नकोस,
परंतु याहवेहचे भय बाळगण्यास सदैव आवेशी राहा.
18कारण तुला तुझ्या भवितव्यामध्ये निश्चितच आशा आहे,
आणि तुझी आशा नाश पावणार नाही.
सोळावे सूत्र
19माझ्या मुला, ऐक आणि सुज्ञ हो
आणि तुझे अंतःकरण योग्य मार्गात स्थिर कर:
20जे अतिमद्यपान करतात
किंवा जे आधाशीपणे मांस खातात त्यांची संगत करू नको,
21कारण मद्यपी व खादाड गरीब होतात,
आणि गुंगीत असणार्यांना फाटके कपडे घालावे लागतील.
सतरावे सूत्र
22आपल्या वडिलांचे ऐक ज्याने तुला जीवन दिले,
आणि तुझी आई वृद्ध झाल्यावर तिचा तिरस्कार करू नको.
23सत्याला मोलाने विकत घे आणि ते विकू नको—
सुज्ञान, शिक्षण आणि समंजसपणासुद्धा मिळव.
24नीतिमान मुलाच्या वडिलांना फार आनंद होतो;
जो मनुष्य सुज्ञ पुत्राचा पिता आहे त्यामध्ये तो उल्लसित असतो.
25तुझे वडील आणि आई आनंदी असावेत;
आणि जिने तुला जन्म दिला ती हर्षित असो!
अठरावे सूत्र
26माझ्या मुला, तुझे अंतःकरण मला दे
आणि तुझी दृष्टी माझ्या मार्गामध्ये प्रसन्न असावी,
27कारण व्यभिचारी स्त्री एक खोल खड्डा आहे,
आणि परस्त्री म्हणजे एक अरुंद विहीर आहे.
28एखाद्या लुटारूप्रमाणे ती दबा धरून बसते
आणि लोकांमध्ये विश्वासघातक्यांची संख्या वाढवते.
एकोणविसावे सूत्र
29कोणाला हाय हाय आहे? कोणाला मोठे दुःख आहे?
कोणाला खेद आहे? कोणाकडे तक्रारी आहेत?
कोणाला विनाकारण जखमा आहेत? कोणाचे डोळे लाल आहेत?
30जे मद्यपानासाठी घुटमळतात,
जे मिश्रित मदिरेची चव घेण्यासाठी जातात.
31जेव्हा द्राक्षारस लाल आहे, तेव्हा त्याकडे टक लावून पाहू नको,
जेव्हा ते कपामध्ये चमकते,
जेव्हा ते सहजपणे खाली उतरते!
32शेवटी ते विषारी सर्पाप्रमाणे दंश करते
आणि ते विष फुरसे सर्पाप्रमाणे विषारी असते.
33तुझे डोळे विलक्षण दृष्ये पाहतील,
आणि तुझे मन गोंधळलेल्या गोष्टींची कल्पना करेल.
34तू उचंबळलेल्या समुद्रावर झोपल्यासारखा,
जहाजाच्या शिडाच्या दोरीवर पडल्यासारखा असशील.
35आणि तू म्हणशील, “त्यांनी मला मारले, परंतु मी जखमी झालो नाही!
त्यांनी मला मारले, परंतु मला जाणवले नाही!
जेव्हा मी जागा होईन,
तेव्हा मी आणखी एक मद्याचा प्याला पिईन.”