YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 25

25
शलोमोनाची आणखी काही नीतिवचने
1यहूदीयाचा राजा हिज्कीयाहच्या सहकार्‍यांनी संग्रहित केलेली, शलोमोन राजाची ही आणखी काही नीतिवचने आहेत:
2रहस्य गुप्त ठेवणे हे परमेश्वराचे गौरव आहे;
आणि गुप्त गोष्टींचा शोध लावणे हे राजाचे गौरव आहे.
3जसे आकाशाची उंची आणि पृथ्वीची खोली,
तसेच राजांच्या मनाचाही थांग लागत नाही.
4चांदीतील मळ काढला
म्हणजे रौप्यकार पात्र तयार करू शकतो;
5राजाच्या दरबारातील भ्रष्ट अधिकारी काढून टाका
आणि मग त्याचे राज्य न्यायीपणामुळे स्थिर राहील.
6राजाच्या समक्षतेत प्रौढी मिरवू करू नकोस,
आणि त्याच्या प्रतिष्ठित व्यक्तीमध्ये स्थान ग्रहण करण्याचा दावा करू नकोस;
7त्याच्या प्रतिष्ठित लोकांसमोर त्याने तुझा अपमान करावा,
यापेक्षा “इकडे वर ये” असे तुला बोलणे अधिक रास्त वाटेल.
तुझ्या डोळ्यांनी जे काही पाहिले आहे
8ते न्यायालयात नेण्याची घाई करू नकोस,
कारण जर तुझा शेजारी तुला फजीत करेल,
तर शेवटी तू काय करशील?
9जर तू तुझ्या शेजार्‍याला न्यायालयात घेऊन जातोस तर,
दुसर्‍याच्या विश्वासाला धोका देऊ नकोस,
10नाहीतर तो ऐकणारा तुला निर्लज्ज ठरवेल
आणि तुझ्याविरुद्ध तो दावा दाखल करेल.
11योग्य वेळेवर दिलेला सल्ला हा
चांदीच्या करंड्यात ठेवलेल्या सोन्याच्या सफरचंदासारखा आहे.
12न्यायाधीशाने केलेली कान उघाडणी, ऐकणार्‍या कानासाठी सुज्ञ
म्हणजे सोन्याचे कर्णफूल किंवा उत्तम सोन्याचा दागिना यासारखी आहे.
13ज्याने विश्वासू सेवकाला पाठविले
त्याच्यासाठी तो उन्हाळ्यातील शीतल पेयासारखा आहे;
तो त्याच्या मालकाला ताजेतवाने करतो.
14कधीही न दिलेल्या देणगीबद्दल जो घमेंड करतो,
तो वृष्टिहीन मेघ आणि वारा यासारखा आहे.
15सहनशीलते द्वारे शासकाचे मन वळविता येते,
कारण मृदू जिव्हा हाडे मोडू शकते.
16तुम्हाला मध मिळाला तर, पुरेसाच खा—
जास्त मध खाल्ल्यास तुम्ही ओकारी कराल.
17तुझ्या शेजार्‍यांकडे पाय क्वचितच टाक—
अतिपरिचय केल्यास शेजारी तुझा द्वेष करतील.
18शेजार्‍याविरुद्ध खोटी साक्ष देणे म्हणजे,
जाड काठीने किंवा तलवारीने मारणे किंवा तीक्ष्ण बाण सोडणे यासारखे आहे.
19संकटसमयी बेभरवशाच्या माणसावर विश्वास ठेवणे
म्हणजे तुटक्या दातांनी चावणे किंवा मोडक्या पायांनी पळण्यासारखे आहे.
20ज्याचे अंतःकरण दुःखाने भरले आहे, त्याच्यासाठी हर्षगीत गाणे,
एखाद्याचे पांघरूण थंडीच्या दिवसात काढून घेणे,
किंवा जखमेवर शिरका ओतणार्‍यासारखे आहे.
21तुझा शत्रू भुकेला असेल तर त्याला खावयास द्या;
तो तान्हेला असेल तर त्याला प्यावयास पाणी दे.
22असे केल्याने तुम्ही त्याच्या डोक्यावर निखार्‍यांची रास कराल,
आणि याहवेह तुम्हाला त्याचे प्रतिफळ देतील.
23जसा उत्तरेकडील वारा अनपेक्षितपणे पाऊस आणतो
तसेच कावेबाज जीभ—क्रोधित मुद्रेला चेतावणी देते.
24भांडखोर पत्नीसह घरात राहण्यापेक्षा
छतावरील एका कोपर्‍यात राहणे बरे.
25दूरवरून आलेला शुभ संदेश
तान्हेल्याला मिळालेल्या शीतल जलासारखा आहे.
26नीतिमान मनुष्याने दुष्टासमोर माघार घेणे,
हे पाण्याचा झरा दूषित होणे किंवा जलकुंड गढूळ होण्यासारखे आहे.
27जसे अति मध खाणे हानिकारक आहे
आणि अति खोल गोष्टींचा शोध घेणे सन्माननीय नसते.
28स्वतःवर ताबा नसलेला मनुष्य
तटबंदी ढासळलेल्या नगरासारखा आहे.

सध्या निवडलेले:

नीतिसूत्रे 25: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन