40
स्तोत्र 40
संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे स्तोत्र.
1मी धीराने याहवेहची वाट पाहिली;
तेव्हा त्यांनी माझ्याकडे लक्ष दिले आणि माझी आरोळी ऐकली.
2निसरड्या खाचेतून, दलदलीच्या चिखलातून
त्यांनी मला बाहेर काढले;
त्यांनी माझी पावले खडकावर ठेवली,
आणि त्यांनी मला उभे राहण्यास भक्कम ठिकाण दिले.
3त्यांनी आपल्या परमेश्वराचे स्तवन करण्यास
माझ्या मुखात नवीन गीत दिले.
हे अनेकजण पाहतील व याहवेहचे भय धरतील
आणि त्यांच्यावर विश्वास ठेवतील.
4जे लोक याहवेहवर भरवसा ठेवतात,
जे गर्विष्ठांच्या व असत्याकडे#40:4 किंवा असत्य दैवतांकडे वळणार्यांच्या
वार्यासही उभे राहत नाही,
ते धन्य होत.
5याहवेह, माझ्या परमेश्वरा,
तुम्ही अनेक चमत्कार केलेले आहेत;
आमच्यासाठी तुम्ही केलेल्या
योजनेची तुलना करता येत नाही;
त्याबद्दल बोलावयाचे झाले
तर त्यांची मोजदाद करता येणार नाही.
6यज्ञ किंवा अन्नार्पणे यांची इच्छा तुम्हाला नाही—
परंतु तुम्ही माझे कान उघडले आहेत;
होमार्पण आणि पापार्पण यांनी तुम्हाला संतोष होत नाही.
7तेव्हा मी म्हणालो, “पाहा मी येथे आहे, आलो आहे—
शास्त्रलेखात माझ्याविषयी लिहिले आहे.
8हे माझ्या परमेश्वरा, तुमची इच्छा पूर्ण करावी असे मला वाटते;
तुमचे नियम माझ्या अंतःकरणात आहेत.”
9विशाल सभेत तुमच्या तारणाच्या कृत्यांची घोषणा करतो;
त्याबाबतीत मी माझे ओठ मुळीच आवरून धरीत नाही,
याहवेह हे तुम्हाला माहीत आहे.
10हे नीतिमत्व मी माझ्या हृदयात दडवून ठेवले नाही,
मी तुमचा विश्वासूपणा आणि तुमच्या तारणाच्या मदतीची चर्चा करतो.
सर्व मंडळीपासून तुमची प्रीतिपूर्ण
दया आणि सत्य ही लपवित नाही.
11याहवेह, तुमची कृपा माझ्यापासून राखून धरू नका;
तुमची प्रीती आणि विश्वासूपणा मला नेहमी सुरक्षित ठेवील.
12असंख्य समस्यांनी माझ्यावर मात केली आहे;
माझ्या अपराधांनी माझा पिच्छा पुरविला आहे आणि ते मी पाहू शकत नाही.
ते माझ्या डोक्यावरील केसांपेक्षा जास्त आहेत,
आणि माझे हृदय विव्हळत आहे.
13याहवेह, प्रसन्न होऊन मला वाचवा;
त्वरेने या, याहवेह मला साहाय्य करा.
14माझ्या जीव घेऊ पाहणार्यांना
लज्जित करा व गोंधळात पाडा;
त्यांना मागे हटवून त्यांची
दाणादाण करून त्यांना घालवून द्या;
15जे लोक मला, “अहा! अहा!” म्हणतात,
ते स्वतःच्या लज्जेमुळे चकित होवोत.
16परंतु जे तुम्हाला शोधतात ते
तुमच्यामध्ये आनंद आणि हर्ष करोत;
जे तुमच्या तारणाच्या साहाय्याची अपेक्षा बाळगतात
ते सर्व हेच म्हणोत, “याहवेह किती थोर आहेत!”
17मी गरीब आणि गरजवंत आहे,
याहवेहला माझी आठवण असो;
तुम्ही माझे साहाय्यकर्ता आणि मला सोडविणारे आहात;
माझ्या परमेश्वरा, विलंब लावू नका.