50
स्तोत्र 50
आसाफाचे स्तोत्र.
1सर्वसमर्थ याहवेह, परमेश्वर
पृथ्वीला, सूर्याच्या उगविण्यापासून
तो जिथे मावळतो तिथपर्यंत हाक मारून बोलवितात.
2सौंदर्यात परिपूर्ण असलेल्या सीयोनमधून,
परमेश्वराचे गौरव प्रकाशते.
3आमचे परमेश्वर येतील
आणि ते स्वस्थ राहणार नाहीत;
त्यांच्याभोवती खवळलेले वादळ
व विध्वंस करणारा अग्नी आहे.
4ते आपल्या लोकांचा न्याय करावयास येतील;
आकाशाला आणि पृथ्वीला उद्देशून ते हाक मारतात:
5“त्या माझ्या भक्तांना माझ्याजवळ एकत्र करा,
ज्यांनी यज्ञ करून माझ्याशी करार स्थापित केला.”
6आणि आकाश त्यांचे नीतिमत्व जाहीर करते,
कारण ते न्यायी परमेश्वर#50:6 किंवा परमेश्वर स्वतः न्यायाधीश आहेत आहेत. सेला
7“ऐका, माझ्या लोकांनो ऐका, मी बोलत आहे;
इस्राएला, मी तुझ्याविरुद्ध साक्ष देत आहे:
मी परमेश्वर, तुझा परमेश्वर आहे.
8तुझ्या अर्पणासंबंधी आणि होमार्पणाबद्दल
माझी काहीही तक्रार नाही, ते नियमित माझ्यापुढे आहेतच.
9मी तुमच्या गोठ्यातील बैल
आणि मेंढवाड्यातील बोकड यज्ञपशू म्हणून घेणार नाही.
10कारण वनातील सारे प्राणी माझे आहेत;
हजारो टेकड्यांवरील गुरे माझी आहेत;
11पर्वतावरील सर्व पक्षी मला माहीत आहेत,
भूमीवरील सर्व प्राणीही माझेच आहेत.
12मी भुकेला असलो, तरी तुमच्याकडे खावयाला मागणार नाही,
कारण संपूर्ण जग आणि त्यातील सर्वकाही माझे आहे.
13बैलाचे मांस माझा आहार आहे का
किंवा बोकडांचे रक्त माझे पेय आहे का?
14“परमेश्वराला उपकारस्तुतीचे यज्ञ कर;
सर्वोच्च परमेश्वरापुढे आपले नवस फेड,
15आणि संकटकाळी माझा धावा कर;
मी तुला संकटमुक्त करेन आणि तू माझे गौरव करशील.”
16परंतु परमेश्वर दुष्ट लोकांना उद्देशून म्हणतात:
माझ्या नियमांचे पाठांतर करू नका
आणि माझा करार आपल्या ओठांनी उच्चारणारा तू कोण?
17कारण माझे नियम झुगारून
तुम्ही माझी शिस्त अव्हेरली आहे.
18तुम्ही एखाद्या चोराला पाहता व त्याला साथ देता
आणि तुम्ही व्यभिचाऱ्यांचे भागीदार होता.
19तुझी जीभ कपट रचते
तुमच्या मुखातून ओंगळ भाषा बोलली जाते.
20तुम्ही बसून आपल्या भावाविरुद्ध साक्ष देता
आणि आपल्या सख्ख्या भावाची निंदा करता.
21तुम्ही हे करीत असता मी गप्प राहिलो,
तेव्हा तुम्हाला वाटले की मी तुमच्यासारखाच आहे,
परंतु आता तुम्हाला शासन करण्याचा काळ आला आहे;
तुमचे आरोप मी तुमच्यापुढे ठेवणार.
22“तुम्ही जे परमेश्वराला विसरला आहात, याचा विचार करा,
मी तुमचे तुकडे करण्यापूर्वी, कारण नंतर तुमचे कोणीही रक्षण करू शकणार नाही:
23जो कोणी उपकारस्तुतीचा यज्ञ करतो तो माझे गौरव करतो आणि
जो कोणी आपले आचरण यथायोग्य ठेवतो, त्याला मी परमेश्वराचे तारण दाखवेन.”