9
स्तोत्र 9#9 स्तोत्र 9 आणि 10 ही मुळात एक ठराविक कविता असावी ज्यामध्ये इब्री वर्णमालाच्या सलग अक्षरांनी पर्यायी ओळी सुरू होतात. मूळग्रंथांमध्ये ते एक स्तोत्र बनतात
संगीत दिग्दर्शकासाठी; मूथ लब्बेन रागावर आधारित दावीदाचे स्तोत्र.
1याहवेह, मी माझ्या संपूर्ण मनापासून तुमचे आभार मानेन;
मी तुमच्या सर्व अद्भुत कृत्यांबद्दल सांगेन.
2मी आनंदित होईन आणि तुमच्यामध्ये हर्ष करेन;
हे सर्वोच्च प्रभू, मी तुमच्या नावाची स्तुतिस्तोत्रे गाईन.
3माझे शत्रू मागे वळतात;
ते तुमच्यासमोर अडखळतात आणि नष्ट होतात.
4कारण तुम्ही माझे अधिकार आणि न्यायाला पाठिंबा दिला आहे,
तुम्ही नीतिमान न्यायाधीश म्हणून सिंहासनावर बसलेले आहात.
5तुम्ही राष्ट्रांना धमकाविले आहे आणि दुष्टांना नष्ट केले आहे;
त्यांची नावे तुम्ही कायमची पुसून टाकली आहेत.
6माझे शत्रू कायमचे नष्ट झाले आहेत,
तुम्ही त्यांची नगरे उद्ध्वस्त केली;
त्यांची आठवणसुद्धा नाहीशी झाली आहे.
7याहवेह सिंहासनावर सदासर्वकाळ विराजमान आहेत;
न्यायनिवाडा करण्याकरिता त्यांनी आपले सिंहासन स्थापिले आहे.
8ते नीतिमत्तेने जगावर राज्य करतात
आणि समानतेने लोकांना रास्त न्याय देतात.
9याहवेह, पीडितांसाठी आश्रय आहेत,
संकटकाळी तेच आश्रयाचे दुर्ग आहेत.
10ज्यांना तुमचे नाव ठाऊक आहे, ते तुमच्यावर भरवसा ठेवतात,
कारण हे याहवेह, जे तुमचा धावा करतात त्यांना तुम्ही कधीही टाकत नाही.
11सीयोनच्या सिंहासनावर विराजमान असलेल्या याहवेहची स्तुतिस्तोत्रे गा;
त्यांनी केलेली अद्भुत कृत्ये सर्व राष्ट्रांमध्ये जाहीर करा.
12जे रक्तपाताचा सूड घेतात, ते आठवण ठेवतात;
दीनांच्या आक्रोशाकडे ते दुर्लक्ष करीत नाही.
13हे याहवेह, माझे शत्रू माझा कसा छळ करतात ते पाहा!
मजवर दया करा आणि मृत्यूच्या दारातून मला ओढून काढा,
14मग मी सीयोनकन्येच्या वेशींवर
तुमची स्तुतीची घोषणा करेन,
आणि तुमच्या तारणात आनंद करेन.
15दुसर्यांसाठी खणलेल्या खाचेतच राष्ट्रे पडली आहेत;
स्वतःच लपवून ठेवलेल्या जाळ्यात त्यांचे पाय अडकले आहेत.
16याहवेहची नीतिपूर्ण कृत्ये हीच त्यांची ओळख आहे;
दुष्ट स्वतःच्याच हस्तकर्माच्या सापळ्यात अडकले आहेत. सेला
17परमेश्वराला विसरणारी सर्व दुष्ट राष्ट्रे
मृतांच्या राज्यात पाठविली जातात.
18परंतु परमेश्वराला गरजवंताचा कधीही विसर पडत नाही;
दुःखितांच्या आशा कधीही नष्ट होणार नाहीत.
19याहवेह, उठा, नाशवंत मानवाला विजयी होऊ देऊ नका;
राष्ट्रांचा न्याय तुमच्यासमोर होऊ द्या.
20याहवेह, त्यांच्यावर भयाचा प्रहार करा;
आपण केवळ नाशवंत आहोत याची राष्ट्रांना जाणीव होऊ द्या. सेला