21
नवे आकाश व नवी पृथ्वी
1नंतर मी, “एक नवी पृथ्वी व एक नवे आकाश”#21:1 यश 65:17 पाहिले, कारण पहिले आकाश व पहिल्या पृथ्वीचे अस्तित्व राहिले नसून त्यात समुद्र अस्तित्वात नव्हते. 2तेव्हा मी नवे यरुशलेम म्हणजे पवित्र नगरी, स्वर्गातून परमेश्वरापासून उतरतांना पाहिली, ती वरासाठी शृंगारलेल्या वधूप्रमाणे सजविलेली होती. 3राजासनावरून मला एक मोठी वाणी ऐकू आली. ती म्हणाली, “पाहा! परमेश्वराचे वसतिस्थान आता मनुष्यांबरोबर आहे; ते स्वतः त्यांच्याबरोबर राहतील; ते त्यांचे लोक होतील; आणि ते त्यांचे परमेश्वर होतील. 4‘ते त्यांच्या डोळ्यांतील प्रत्येक अश्रू पुसून टाकतील आणि आता मृत्यू,’#21:4 यश 25:8 दुःख, रडणे व वेदना अस्तित्वात राहणार नाहीत. या सर्व जुन्या गोष्टी कायमच्या नाहीशा झाल्या आहेत.”
5जे राजासनावर बसले होते ते म्हणाले, “मी सर्वकाही नवीन करीत आहे!” मग ते म्हणाले, “हे लिहून घे; कारण ही वचने विश्वसनीय आणि सत्य आहेत.”
6ते मला म्हणाले, “सर्वकाही पूर्ण झाले आहे! मीच अल्फा व ओमेगा, प्रारंभ आणि शेवट आहे. तान्हेल्या सर्व लोकांना मी जीवनाच्या झर्याचे पाणी मोफत देईन. 7जो विजय मिळवितो त्याला या सर्व गोष्टींचा वारसा मिळेल. मी त्यांचा परमेश्वर होईन आणि ते माझी संतती होतील. 8परंतु भेकड, विश्वासहीन, अशुद्ध, खून करणारे, जारकर्मी, चेटकी, मूर्तिपूजक व सर्व लबाड—अशा माणसांच्या वाट्यास अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल. हेच ते दुसरे मरण होय.”
नवीन यरुशलेम, कोकराची वधू
9मग शेवटच्या सात पीडांनी भरलेल्या वाट्या ओतणार्या सात देवदूतांपैकी एक देवदूत माझ्याकडे येऊन मला म्हणाला, “चल, माझ्याबरोबर ये, म्हणजे मी तुला वधू—कोकर्याची पत्नी दाखवितो.” 10तेव्हा मी आत्म्याने संचारित झालो आणि मला एका उंच व विशाल अशा पर्वतशिखरावर नेण्यात आले. तिथून मी ती पवित्र नगरी म्हणजे यरुशलेम, स्वर्गातून परमेश्वरापासून उतरतांना पाहिली. 11ती परमेश्वराच्या गौरवाने भरली होती, एखाद्या रत्नाप्रमाणे चमकत होती; यास्फे खड्यासारखी स्फटीकशुभ्र होती. 12तिचे तट रुंद व उंच होते. तिला बारा मोठमोठ्या वेशी असून त्यावर बारा देवदूत पहारा करीत होते. त्या वेशींवर इस्राएलच्या बारा वंशांची नावे लिहिलेली होती. 13उत्तरेकडे तीन, दक्षिणेकडे तीन, पूर्वेकडे तीन व पश्चिमेकडे तीन वेशी होत्या. 14नगरीच्या तटबंदीला बारा पाये होते. या पायांवर कोकर्याच्या बारा प्रेषितांची नावे लिहिलेली होती.
15नगरी, वेशी व तटबंदी यांचे मोजमाप घेण्यासाठी देवदूताच्या हातामध्ये सोन्याची एक मोजकाठी होती. 16ती नगरी चौरस होती. म्हणजे तिची लांबी जितकी होती तितकीच तिची रुंदी होती, देवदूताने नगरीचे माप काठीने घेतले. ते लांबीला 2,200 किलोमीटर भरले. तिची रुंदी व उंची समान होती. 17मग त्याने भिंतीची जाडी मोजली. ती या टोकापासून त्या टोकापर्यंत 65 मीटर होती. देवदूताने मानवी परिमाणांत ही तटबंदी मोजली. 18नगरीचा तट यास्फे रत्नाचा होता आणि ती शुद्ध काचेसारख्या पारदर्शक सोन्याची होती. 19तिच्या तटाच्या पायाचे बारा थर होते. ते रत्नजडित शीलांनी बांधलेले होते. पहिला थर यास्फे रत्नाचा, दुसरा नीलमण्याचा, तिसरा स्फटिकचा, चौथा पाचूचा, 20पाचवा गोमेद रत्नाचा, सहावा सार्दि, सातवा लसणा, आठवा वैडूर्य मण्याचा, नववा पुष्कराजाचा, दहावा सोन लसणीचा, अकरावा याकींथ रत्नाचा व बारावा पज्ञराग रत्नाचा होता. 21बारा वेशी बारा मोत्यांच्या होत्या. प्रत्येक वेस एकाच मोत्याची होती. शहराचा विशाल राजमार्ग काचेसारखा पारदर्शक शुद्ध सोन्याचा होता.
22नगरीत कुठे मंदिर दृष्टीस पडत नव्हते, कारण सर्वसमर्थ प्रभू परमेश्वर आणि कोकरा हेच तिथे मंदिर होते. 23नगरीला प्रकाश देण्यासाठी सूर्यचंद्राची गरज नाही, कारण परमेश्वराचे गौरव तिला प्रकाश देते आणि कोकरा तिचा दिवा आहे. 24राष्ट्रे त्यांच्या प्रकाशाने चालतील आणि पृथ्वीवरील राजे त्यांचे वैभव तिथे आणतील. 25तिच्या वेशी दिवसा बंद होत नाहीत; तिथे रात्र नाहीच. 26सर्व राष्ट्रांचे वैभव आणि प्रतिष्ठा, नगरीमध्ये आणण्यात येईल. 27मात्र त्या नगरीत कोणतीही अपवित्र गोष्ट, लज्जास्पद किंवा असत्य आचरण करणाऱ्यांचा प्रवेश होणार नाही. परंतु ज्यांची नावे कोकर्याच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत, असे लोकच या नगरीत प्रवेश करतील.