YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रकटीकरण 22:1-21

प्रकटीकरण 22:1-21 MRCV

मग देवदूताने मला जीवनाच्या पाण्याची नदी दाखविली. तिचे पाणी स्फटिकासारखे नितळ होते. परमेश्वर आणि कोकरा यांच्या राजासनांतून ती निघाली होती. राजमार्गाच्या मध्यावरून ती वाहत होती. नदीच्या दोन्ही बाजूंना जीवनदायी वृक्ष उभे होते, त्यांना वर्षातून बारा वेळा बहर येई. प्रत्येक महिन्याला त्यांना नवी फळे येत. त्यांची पाने राष्ट्रांना निरोगी करण्यासाठी औषध म्हणून वापरली जात. तिथे कोणतेही शाप असणार नाही, कारण परमेश्वराचे व कोकर्‍याचे सिंहासन त्या शहरात असेल आणि त्यांचे सेवक त्यांची सेवा करतील. ते त्यांचे मुख पाहतील व त्यांचे नाव त्यांच्या कपाळावर लिहिलेले असेल. तिथे रात्र असणार नाही, दिव्यांची किंवा सूर्यप्रकाशाची तिथे गरज पडणार नाही, कारण प्रत्यक्ष प्रभू परमेश्वरच त्यांचा प्रकाश होतील आणि ते युगानुयुग राज्य करतील. नंतर तो देवदूत मला म्हणाला, “ही वचने सत्य व विश्वसनीय आहेत आणि संदेष्ट्यांना अंतःस्फूर्ती देणाऱ्या प्रभू परमेश्वरांनी ज्यागोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत, त्या त्यांच्या सेवकांना कळविण्यासाठी त्यांच्या दूताला पाठविले आहे.” “पाहा, मी लवकर येतो! जो कोणी या पुस्तकात लिहिलेली भविष्यवचनाचे पालन करतो तो धन्य.” मी, योहानाने या सर्वगोष्टी ऐकल्या व पाहिल्या आणि ज्या देवदूताने मला त्या दाखविल्या, त्याला नमन करण्यासाठी मी त्याच्या पायांवर उपडा पडलो. परंतु तो मला म्हणाला, “असे करू नकोस. संदेष्टे व या पुस्तकातील वचने पाळणारे लोक यांच्या सोबतीचा मी सेवकबंधू आहे. तू परमेश्वराची आराधना कर.” नंतर त्याने मला सांगितले, “या पुस्तकातील भविष्यकथनाचे शब्द शिक्का मारून बंद करू नकोस, कारण वेळ जवळ आली आहे. अनाचारी अधिक अनाचार करोत, दुष्ट अधिक दुष्ट बनोत, न्यायी लोक अधिक नीतिमान होवोत व जे पवित्र आहेत, ते पवित्रतेत अधिकाधिक दृढ होवोत.” “पाहा, मी लवकर येत आहे! माझे प्रतिफळ मी बरोबर घेऊन येत आहे. प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कर्मानुसार देईन. मीच अल्फा व ओमेगा, प्रारंभ आणि शेवट, आदि व अंत आहे. “आपल्याला जीवनाच्या झाडावर अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत प्रवेश मिळावा म्हणून जे आपली वस्त्रे धुतात ते धन्य. नगराच्या बाहेर कुत्रे व जादूटोणा करणारे, जारकर्मी, खुनी, मूर्तिपूजक, ज्यांना लबाडी प्रिय आहे असे लबाडी करणारे सर्वजण राहतील. “तू हे सर्व मंडळ्यांना सांगावे म्हणून मी येशूने, माझा दूत तुझ्याकडे साक्षीदार म्हणून पाठविला आहे. मी दावीदाचे मूळ व त्याचा वंश आहे. मी पहाटेचा तेजस्वी तारा आहे.” आत्मा व वधू म्हणतात “ये!” हा शब्द ऐकणारा प्रत्येकजण म्हणो, “ये!” कोणाही तान्हेल्याने यावे आणि कोणतेही मोल न देता जीवनाचे पाणी हवे तेवढे प्यावे. या पुस्तकातील संदेश ऐकणार्‍या प्रत्येकाला मी सावध करतो: या ग्रंथपटात जे लिहिले आहे त्यात कोणी भर घातली, तर परमेश्वर त्याच्यावर या पुस्तकात लिहिलेल्या पीडा आणेल. तसेच जो कोणी या भविष्यकथनच्या पुस्तकात वर्णन केलेल्या वचनांतून काही काढून टाकील, परमेश्वर त्याचा वाटा या पुस्तकात वर्णिलेल्या जीवनाच्या झाडातून व पवित्र नगरीतून काढून टाकील. ज्यांनी या गोष्टी सांगितल्या आहेत, ते जाहीरपणे म्हणतात, “होय, मी लवकर येत आहे!” आमेन! हे प्रभू येशू, या! आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वराच्या लोकांवर असो. आमेन.