YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रकटीकरण 6

6
सात शिक्के
1कोकर्‍याने त्या सात शिक्यातील पहिला शिक्का फोडून उघडताना मी पाहिले. तेव्हा त्या चार सजिव प्राण्यांतील एकाने, गर्जनेसारख्या आवाजात म्हटले, “ये!” 2मी पहिले तो माझ्यासमोर एक पांढरा घोडा आहे असे मला दिसले! घोडेस्वाराजवळ एक धनुष्य होते. त्याच्या डोक्यावर एक मुकुट ठेवण्यात आला. मग विजेता म्हणून जिंकण्याच्या उद्देशाने तो स्वार निघून गेला.
3नंतर कोकर्‍याने दुसरा शिक्का फोडला, तेव्हा दुसर्‍या सजीव प्राण्याने, “ये” अशी हाक मारली, ती मी ऐकली. 4यावेळी एक अग्निवर्ण घोडा बाहेर पडला. पृथ्वीवरील शांतता नष्ट करण्याचा अधिकार त्याला देण्यात आला होता. लोक एकमेकांचे वध करू लागले. त्या स्वाराला एक मोठी तलवार देण्यात आली.
5मग कोकर्‍याने तिसरा शिक्का फोडला, तेव्हा तिसरा सजिव प्राणी, “ये” असे म्हणताना मी ऐकले. मग मी एक काळा घोडा पाहिला! त्याच्या स्वाराच्या हातात एक तराजू होते. 6मग त्या चार सजीव प्राण्यांमधून निघालेली एक वाणी मी ऐकली. ती म्हणाली, “एका दिवसाच्या मजुरीत एक किलोग्रॅम गहू आणि तीन किलोग्रॅम जव! आणि तेल आणि द्राक्षारस यांची नासाडी करू नका.”
7जेव्हा कोकर्‍याने चौथा शिक्का फोडला, तेव्हा मी ऐकले, चौथा सजीव प्राणी म्हणाला, “ये!” 8मग मी एक फिकट रंगाचा घोडा पाहिला! त्याच्या स्वाराचे नाव मृत्यू असे होते. आणि अधोलोक त्याच्यामागून आला. पृथ्वीवरील एक चतुर्थांश लोकांना युद्ध, दुष्काळ, पीडा आणि हिंस्र पशू याच्याद्वारे ठार मारण्याचा त्यांना अधिकार देण्यात आला होता.
9त्यानंतर त्याने पाचवा शिक्का फोडला, तेव्हा मी एक वेदी पाहिली. त्या वेदीखाली परमेश्वराचे वचन सांगितल्यामुळे, आणि विश्वासूपणे साक्ष दिल्यामुळे जिवे मारले गेलेल्या सर्व लोकांचे आत्मे होते. 10त्यांनी प्रभुला मोठ्याने हाक मारली, “हे सर्वसत्ताधारी पवित्र आणि सत्य प्रभू, पृथ्वीवरील लोकांचा न्याय करण्यास आणि आमच्या रक्ताबद्दल सूड घेण्‍यास तुम्ही किती काळ लावणार?” 11तेव्हा त्यातील प्रत्येकाला एक एक पांढरा झगा देण्यात आला. त्यांना सांगण्यात आले की त्यांचे सहकर्मी बंधू, हुतात्म्यांची संख्या पूर्ण होईपर्यंत, आणखी थोडा काळ थांबा.
12मी पाहत असताना त्याने सहावा शिक्का फोडला, तेव्हा एक प्रचंड भूमीकंप झाला. सूर्य बकर्‍याच्या केसांपासून तयार केलेल्या घोंगडयासारखा काळा झाला; चंद्र रक्तासारखा लाल झाला. 13अंजिराच्या वृक्षांवरील कच्ची फळे एखाद्या प्रचंड वादळाने गळून पडतात, तसे आभाळातील तारे भूमीवर गळून पडतांना मला दिसले. 14एखाद्या गुंडाळीप्रमाणे अंतराळ गुंडाळले गेले, आणि प्रत्येक पर्वत व बेट हादरून आपल्या जागेवरून ढळले.
15तेव्हा पृथ्वीवरील राजे, राजपुत्र, सैन्याचे उच्चाधिकारी, श्रीमंत तसेच बलवान लोक, सर्व लहान थोर माणसे, गुलाम आणि स्वतंत्र लोक, सारे जण डोंगराच्या गुहांमध्ये व खडकांमध्ये दडून बसले. 16ते डोंगरटेकड्यांना उद्देशून ओरडून विनवू लागले, “आम्हावर पडून जे राजासनावर बसले आहेत, त्यांच्या नजरेपासून आणि कोकर्‍याच्या क्रोधापासून आम्हाला लपवा! 17कारण त्यांच्या क्रोधाचा महान दिवस आला आहे, त्यात कोणाचा निभाव लागेल?”

सध्या निवडलेले:

प्रकटीकरण 6: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन