4
अब्राहाम विश्वासाने नीतिमान ठरला
1आपण याबाबतीत काय म्हणावे, शारीरिक दृष्टीने आपला पूर्वज अब्राहामाला काय अनुभवयास मिळाले? 2अब्राहाम जर कृत्यांमुळे नीतिमान ठरला असता तर त्याला बढाई मिरविण्यास काही कारण असते; परंतु परमेश्वरासमोर नाही. 3शास्त्रलेख काय म्हणतो? “अब्राहामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला, आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले.”#4:3 उत्प 15:6
4आता जो परिश्रम करतो त्याची मजुरी त्याचे दान नसून त्याचा अधिकार आहे. 5जो व्यक्ती परिश्रम करीत नाही, परंतु जो अधर्मी लोकांना नीतिमान ठरविणार्या त्या परमेश्वरावर विश्वास ठेवतो, तो व्यक्ती विश्वासाने नीतिमान ठरतो. 6दावीद राजा पण तेच सांगतो की कर्मावाचून परमेश्वर त्यांना नीतिमान म्हणून जाहीर करतो, त्यांच्या धन्यतेचा आनंद काय वर्णावा:
7“धन्य ते लोक,
ज्यांच्या अपराधांची क्षमा झालेली आहे,
ज्यांच्या पापांवर पांघरूण घातले आहे.
8धन्य ती व्यक्ती,
ज्याच्या हिशोबी प्रभू कधीही पापाचा दोष लावणार नाही.”#4:8 स्तोत्र 32:1, 2
9हा आशीर्वाद केवळ सुंता झालेल्यांसाठी आहे की सुंता न झालेल्यांसाठी सुद्धा आहे? आपण म्हणतो की अब्राहामाचा विश्वास त्याला नीतिमत्व असे गणण्यात आला. 10कोणत्या परिस्थितीत त्याला मान्यता देण्यात आली? सुंता होण्यापूर्वी किंवा नंतर? नंतर नाही, पण आधी! 11सुंता झालेली नसताना त्याच्या विश्वासामुळे नीतिमत्व प्राप्त होते याचा शिक्का म्हणून सुंता ही खूण होती. जे विश्वास ठेवतात पण ज्यांची सुंता झाली नाही, त्या सर्वांचा अब्राहाम हा पिता झाल्यामुळे त्यांना नीतिमत्व प्राप्त व्हावे, 12आणि तो सुंता झालेल्याचाही पिता आहे, पण ज्यांची केवळ सुंताच झाली नाही तर जो विश्वास आपला पिता अब्राहामामध्ये सुंता होण्यापूर्वी होता त्या विश्वासावर पाऊल ठेऊन चालतात त्यांचाही पिता आहे.
13अब्राहामाला व त्याच्या वंशजांना जे अभिवचन दिले होते की तो या पृथ्वीचा वारस होईल, ते नियमशास्त्राद्वारे नव्हे, तर विश्वासाने जे नीतिमत्व प्राप्त होते त्याद्वारे देण्यात आले होते 14कारण जे नियमावर अवलंबून आहेत ते जर वारसदार आहेत, तर विश्वासास काहीच किंमत नाही आणि अभिवचने निरर्थक आहेत. 15कारण नियमामुळे क्रोध भडकतो आणि जिथे नियम नाही तिथे उल्लंघनही नाही.
16यास्तव, अभिवचन विश्वासाच्याद्वारे कृपा म्हणून अब्राहामाच्या सर्व वंशजाला मिळते. जे केवळ नियमांच्या अधीन आहेत त्यांनाच नव्हे, तर ज्यांचा विश्वास अब्राहामाच्या विश्वासासारखा आहे त्या सर्वांना, कारण अब्राहाम आपल्या सर्वांचा पिता आहे. 17असे लिहिले आहे: “मी तुला अनेक राष्ट्रांचा पिता केले.”#4:17 उत्प 17:5 परमेश्वराच्या दृष्टीने अब्राहाम आमचा पिता आहे, ज्यावर त्याने विश्वास ठेवला, जो परमेश्वर मेलेल्यांना जीवन देतो आणि ज्यागोष्टी नाही त्या गोष्टी अस्तित्वात याव्या अशी आज्ञा देतो.
18आशा धरण्यास काही आधार नसताना, अब्राहामाने आशेने विश्वास ठेवला व तो अनेक राष्ट्रांचा पिता झाला, आणि “तुझी संततीही होईल.”#4:18 उत्प 15:5 असे त्याला सांगण्यात आले होते त्याचप्रमाणे झाले. 19त्याचे शरीर जणू काही मृत अवस्थेत असताना—तो अंदाजे शंभर वर्षाचा होता—व साराहचे गर्भाशय मृत झालेले असताना, त्याने आपला विश्वास डळमळू दिला नाही 20परमेश्वराच्या अभिवचनाबद्दल अब्राहाम कधीही अविश्वासाने डळमळला नाही, परंतु विश्वासामध्ये दृढ झाला आणि त्याने परमेश्वराला गौरव दिले. 21अभिवचन दिल्याप्रमाणे परमेश्वर करावयास समर्थ आहे ही त्याची पूर्ण खात्री होती. 22त्यामुळेच, “ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले.” 23हे शब्द “तो नीतिमान ठरविला गेला” केवळ त्यांच्यासाठीच लिहिले गेले नव्हते, 24परंतु आपल्यासाठीही आहे, ज्यांनी प्रभू येशूंना मरणातून उठविले त्यावर विश्वास ठेवला तर परमेश्वर आपल्यालाही नीतिमान ठरवेल. 25त्यांना आपल्या पापांसाठी मरणाच्या स्वाधीन करण्यात आले आणि आपल्या नीतिमत्वासाठी पुन्हा उठविले गेले.