5
शांती आणि आशा
1ज्याअर्थी, विश्वासाद्वारे आपल्याला नीतिमान ठरविण्यात आले आहे, त्याअर्थी आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे परमेश्वराबरोबर शांती आहे, 2ख्रिस्ताद्वारे विश्वासामुळेच त्यांनी आपल्याला या कृपेत प्रवेश दिला आहे. येथे आपण स्थिर आहोत व आपण परमेश्वराच्या आशेच्या गौरवाची प्रौढी मिरवितो. 3इतकेच केवळ नव्हे तर क्लेशातही आनंद करतो, कारण आपणास माहीत आहे की दुःख हे धीर उत्पन्न करते. 4धीरामुळे, चारित्र्य; आणि चारित्र्यामुळे, आशा. 5आशेमुळे आपण लज्जित होणार नाही, कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याद्वारे परमेश्वराची प्रीती आपल्या अंतःकरणात ओतली गेली आहे.
6आपण अगदी दुर्बल होतो तेव्हा ख्रिस्त योग्य वेळी, अधर्मी लोकांसाठी मरण पावले. 7नीतिमान मनुष्यासाठी क्वचितच कोणी मरेल; चांगल्या मनुष्यासाठी मरावयास कोणीतरी धजेल. 8परंतु परमेश्वर आम्हावरील स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण असे देतात की, आम्ही पापी असताना, ख्रिस्त आम्हासाठी मरण पावले.
9त्यांच्या रक्ताने आपल्याला नीतिमान ठरविले, तर किती विशेषकरून परमेश्वराच्या सर्व भावी क्रोधापासून त्यांच्याद्वारे आपला उद्धार होईल! 10आपण परमेश्वराचे शत्रू असताना, त्यांच्या पुत्राच्या मरणाद्वारे आपला समेट झाला, त्याअर्थी समेट झाल्यानंतर, कितीतरी अधिक त्यांच्या जीवनाद्वारे तारले जाऊ! 11एवढेच नव्हे, तर परमेश्वरामध्ये आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे अभिमान बाळगतो, त्यांच्याद्वारे आमचा आता समेट झाला आहे.
आदामाच्या द्वारे मृत्यू, ख्रिस्ताद्वारे सार्वकालिक जीवन
12एका मनुष्याच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाद्वारे मरण जगात आले; सर्व लोकांमध्ये मरण पसरले, कारण सर्वांनी पाप केले आहे.
13नियमशास्त्र देण्यापूर्वी पाप जगात होतेच; पण नियमशास्त्र अस्तित्वात नसल्यामुळे, कोणालाही पापाबद्दल दोषी ठरविता येत नव्हते. 14आदामापासून मोशेपर्यंत मृत्यूचे राज्य होते, कारण आदामासारखा आज्ञेचा भंग त्यांनी स्वतः कधीही केलेला नव्हता. आदाम, जो येणार होता त्याचे प्रतिरूप होता.
15तरी देणगी ही आज्ञाभंगासारखी नाही. कारण या एका मनुष्याने, म्हणजे आदामाने, आपल्या पापांमुळे अनेक मानवांवर मृत्यू आणला. परंतु परमेश्वराची कृपा व देणगी एका मनुष्याद्वारे म्हणजे येशू ख्रिस्ताच्या कृपेद्वारे अनेकांना प्राप्त झाली. 16परमेश्वराचे वरदान एका मनुष्याने केलेल्या पापाच्या परिणामासारखे नाही आणि एकाच्या पापामुळे न्याय दंड मिळाला, परंतु वरदान अनेक अपराधानंतर आले आणि आपल्याला नीतिमान गणण्यात आले. 17कारण जर एका मनुष्याच्या अपराधामुळे, त्याच मनुष्याच्या द्वारे मरणाने राज्य केले, तर ज्यांना कृपेची व नीतिमत्वाची विपुल दाने मिळाली आहेत, ते येशू ख्रिस्त जे एक मानव आहेत, त्यांच्याद्वारे जीवनात किती विशेषकरून राज्य करतील!
18यास्तव एका अपराधामुळे सर्व मनुष्यजाती दंडास पात्र झाली, तसेच न्यायीपणाच्या एका कृत्यामुळे सर्व मनुष्यजात जीवनासाठी नीतिमान ठरविली जाते. 19कारण जसे एक मनुष्याच्या आज्ञाभंगामुळे अनेक लोक पापी ठरविले गेले, तसेच एका मनुष्याच्या आज्ञापालनामुळे अनेक लोक नीतिमान ठरविले जातील.
20पापाची जाणीव वाढावी म्हणून नियमशास्त्राचा प्रवेश झाला, कारण जिथे पाप वाढले, तिथे कृपा अति विपुल झाली, 21यासाठी की ज्याप्रमाणे पापाने मरणाद्वारे राज्य केले, त्याचप्रमाणे कृपेने नीतिमत्वाद्वारे राज्य करावे आणि येशू ख्रिस्त आपल्या प्रभूद्वारे सार्वकालिक जीवन मिळावे.