8
आत्म्याच्याद्वारे जीवन
1यास्तव, जे आता ख्रिस्त येशूंमध्ये आहेत त्यांना दंडाज्ञा नाही. 2कारण ख्रिस्त येशूंच्याद्वारे आत्म्याच्या नियमाने जे तुम्हाला जीवन देतात, त्यांनी तुम्हाला पापाचे नियम व मरण यातून मुक्त केले आहे. 3कारण आपल्या पापी स्वभावामुळे आपल्याला वाचवण्यास नियम असमर्थ होते, तेव्हा परमेश्वराने स्वतःच्या पुत्राला पापमय मनुष्यासारखे व पापबली म्हणून पाठविले व मानवी स्वभावात जे पाप राज्य करीत होते त्याला दोषी ठरविले. 4यासाठी की जे देहाने नव्हे तर पवित्र आत्म्याप्रमाणे जीवन जगतात, त्यांच्यामध्ये नियमांसाठी आवश्यक असणारे नीतिमत्व पूर्ण व्हावे.
5जे आपल्या शारीरिक स्वभावाला अनुसरून जीवन जगतात, त्यांची मने दैहिक गोष्टींकडे असतात, परंतु जे पवित्र आत्म्याला अनुसरून जीवन जगतात त्यांची मने आत्म्याच्या इच्छेप्रमाणे करण्याकडे असतात. 6मन दैहिक असणे म्हणजे मरण आहे; पवित्र आत्म्याने नियंत्रित मनाला जीवन व शांती लाभते, 7कारण दैहिक मन परमेश्वरविरोधी आहे; ते परमेश्वराच्या नियमाच्या अधीन होत नाही आणि कधीही होणार नाही. 8जे देहाच्या सत्तेखाली आहेत ते परमेश्वराला संतुष्ट करू शकणार नाहीत.
9तुम्ही देहाच्या सत्तेखाली नाही, परंतु जर परमेश्वराचा आत्मा तुमच्यामध्ये राहतो तर तुम्ही आत्म्याच्या सत्तेखाली आहात, जर कोणामध्ये ख्रिस्ताचा आत्मा वास करीत नाही, तर तो ख्रिस्ताचा नाही. 10जर ख्रिस्त तुम्हामध्ये आहे, आणि पापामुळे तुमचे शरीर मरण पावले; पण नीतिमत्वामुळे तुमचा आत्मा जिवंत राहील. 11आणि ज्यांनी येशूंना मेलेल्यातून उठविले, त्यांचा आत्मा जर तुम्हामध्ये वास करीत असेल, तर ज्यांनी ख्रिस्ताला मरणातून उठविले ते तुमच्यामध्ये राहात असणार्या त्याच पवित्र आत्म्याच्याद्वारे तुमची मर्त्य शरीरे जिवंत करतील.
12यास्तव, बंधुंनो आणि भगिनींनो, आपण ऋणी आहोत, परंतु देहस्वभावाप्रमाणे जगण्यास देहाचे ऋणी नाही. 13कारण तुम्ही देहस्वभावाप्रमाणे वागत राहिला, तर मराल. पण पवित्र आत्म्याच्या शक्तीने दैहिक कुकर्मे नष्ट केलीत, तर जगाल.
14कारण ज्यांना परमेश्वराचा आत्मा चालवितो, ती परमेश्वराची लेकरे आहेत, 15पुन्हा भीती बाळगावी असा दास्यतेचा आत्मा तुम्हाला मिळालेला नाही; याउलट असा आत्मा मिळाला आहे की ज्यामुळे तुम्ही दत्तकपुत्र झाला आहात आणि, “अब्बा, बापा” अशी हाक मारू शकता. 16कारण पवित्र आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण परमेश्वराची मुले आहोत. 17ज्याअर्थी आपण मुले आहोत, त्याअर्थी आपण परमेश्वराचे वारस, ख्रिस्ताबरोबर सहवारस आहोत, जर आम्ही खरोखर त्यांच्या दुःखात सहभागी होतो, तर त्यांच्या गौरवात सुद्धा सहभागी होऊ.
वर्तमान काळाचे क्लेश आणि भावी गौरव
18तर आपल्याला पुढे जे गौरव प्रकट होणार आहे, त्याच्या तुलनेने वर्तमान काळातील दुःखे काहीच नाहीत. 19कारण परमेश्वर आपल्या लेकरांना प्रकट करेल, त्या दिवसाची अखिल सृष्टी वाट पाहत आहे. 20कारण सृष्टी स्वतःच्या निवडीनुसार निराशेच्या स्वाधीन नाही, तर त्यांनी तिला या आशेच्या स्वाधीन ठेवले ते, 21यासाठी की स्वतः सृष्टी विनाशाच्या दास्यत्वातून मोकळी होईल आणि परमेश्वराच्या मुलांना मिळणार्या स्वतंत्रेत व गौरवात सहभागी होईल.
22कारण आपल्याला ठाऊक आहे की संपूर्ण सृष्टी प्रसूतिवेदनांच्या क्लेशांप्रमाणे आतापर्यंत कण्हत आहे. 23ज्या आपणाला आत्म्याचे प्रथमफळ मिळाले आहे, ते आपणही कण्हत आहोत, आपण देखील त्या परमेश्वराची दत्तक मुले म्हणून आपल्या शरीराचा उद्धार होईल त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहोत, 24आणि या आशेमध्येच आपण तारण पावलो आहो. जी आशा दृश्य आहे ती आशाच नव्हे. जे काही आहे त्याची आशा कोण धरेल? 25पण जे अद्यापि प्राप्त झाले नाही त्याबद्दल आशा ठेवतो, तर आपण धीराने वाट पाहतो.
26त्याचप्रकारे, पवित्र आत्माही आपल्या अशक्तपणात आपणास साहाय्य करतो. कारण प्रार्थना कशासाठी करावी हे आपल्याला समजत नाही, पण पवित्र आत्मा आपल्यासाठी शब्दाविना कण्हण्याने मध्यस्थी करतो. 27आणि जो आपली अंतःकरणे शोधतो तो आत्म्याचे मन जाणतो, कारण आत्मा परमेश्वराच्या इच्छेनुसार परमेश्वराच्या लोकांसाठी मध्यस्थी करतो.
28आणि आपल्याला माहीत आहे की, परमेश्वरावर प्रीती करणारे आणि जे त्याच्या संकल्पनेप्रमाणे बोलावलेले आहेत, त्यांच्या कल्याणार्थ सर्वगोष्टी सहकारी ठरतात. 29ज्यांच्याविषयी परमेश्वराला पूर्वज्ञान होते व त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे व्हावे, यासाठी त्यांना पूर्वनियोजित केले होते की त्यांनी अनेक बंधू आणि भगिनीमध्ये जेष्ठ असे व्हावे. 30आणि त्यांनी ज्यांना पूर्वनियोजित केले, त्यांना बोलावले; व ज्यांना बोलावले, त्यांना नीतिमान ठरविले व ज्यांना नीतिमान ठरविले, त्यांचे त्यांनी गौरव ही केले.
अधिक विजयी
31अशा गोष्टींना प्रतिसाद म्हणून काय म्हणावे? जर परमेश्वर आपल्या पक्षाचे आहेत तर आमच्याविरुद्ध कोण असू शकेल? 32ज्यांनी स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता आपणा सर्वांकरिता त्यांना दिले, तर ते आपल्याला त्यांच्यासोबत सर्वकाही उदारतेने देणार नाहीत काय? 33परमेश्वराने ज्यांना निवडले आहे त्यांच्यावर आरोप करण्यास कोण धजेल? नीतिमान ठरविणारे ते परमेश्वरच आहेत. 34तर असा कोण आहे जो आपल्याला दंडाज्ञा देईल? कोणी नाही. ख्रिस्त येशू जे मरण पावले, इतकेच नव्हे तर जिवंत असे उठविले गेले आणि तेच आता परमेश्वराच्या उजवीकडे बसून आमच्यासाठी मध्यस्थी करीत आहेत. 35मग ख्रिस्ताच्या प्रीतिपासून आपल्याला कोण विभक्त करू शकेल? संकट किंवा आपत्ती किंवा छळ किंवा दुष्काळ किंवा नग्नता, धोका किंवा तरवार काय? 36कारण असे लिहिले आहे:
“तुझ्यासाठी आम्ही दिवसभर मरणाला तोंड देतो,
वधाची प्रतीक्षा करणार्या मेंढरांसारखे आम्हाला गणण्यात आले आहे.”#8:36 स्तोत्र 44:22
37नाही, या सर्व गोष्टीत ज्यांनी आमच्यावर प्रीती केली, त्यांच्याद्वारे आम्ही अत्यंत विजयी आहोत. 38कारण माझी खात्री आहे की न मरण न जीवन, न देवदूत न भुते, न वर्तमान न भविष्यकाळ, न कोणती शक्ती, 39अथवा उंची, खोली आणि सृष्टीमधील कोणतीही गोष्ट आपला प्रभू येशू ख्रिस्तामधील परमेश्वराच्या प्रीतिपासून आपणास विभक्त करू शकणार नाही.