1
1हे गीतरत्न, शलोमोनाची रचना.
नायिका#1:2 मुख्य नर आणि मादी वक्ते प्रामुख्याने संबंधित हिब्रू प्रकारांच्या लिंगाच्या आधारावर ओळखले जातात तो आणि ती मथळ्यांद्वारे सूचित केले जातात. इतरांचे शब्द म्हणून चिन्हांकित केले जातात. मित्र काही प्रकरणांमध्ये विभाग आणि त्यांचे मथळे वादग्रस्त आहेत.
2तो आपल्या मुखाच्या चुंबनांनी माझे चुंबन घेवो—
कारण तुझे प्रेम हे द्राक्षारसापेक्षा आनंददायक आहे.
3तुझ्या अत्तरांचा सुगंध सुखदायक आहे;
तुझे नाव ओतलेल्या अत्तरासारखे आहे.
तरुण कुमारी तुझ्यावर प्रेम करतात यात आश्चर्य नाही!
4चल घाई करू या! मला तुझ्याबरोबर दूर घेऊन जा!
राजाने मला आपल्या अंतःपुरात न्यावे.
मैत्रिणी
आम्ही तुझ्यामध्ये उल्हास आणि हर्षित होऊ#1:4 हिब्रू भाषेमध्ये एकवचनी आहे.;
आम्ही द्राक्षारसापेक्षा तुझी अधिक प्रशंसा करू.
नायिका
त्यांनी तुझ्यावर प्रीती करणे किती यथार्थ आहे!
5अहो यरुशलेमच्या कन्यांनो,
मी सावळी असूनही सुंदर आहे,
केदारच्या काळ्या तंबूसारखी,
शलोमोनच्या डेर्याच्या पडद्यासारखी.
6मी सावळी आहे म्हणून माझ्याकडे टक लावून पाहू नका,
कारण मी सूर्यामुळे काळवंडले आहे.
माझ्या आईची मुले माझ्यावर रागावली
आणि त्यांनी मला द्राक्षमळ्याची राखण करावयास लावले;
पण मी स्वतःच्या द्राक्षमळ्याकडे दुर्लक्षित केले.
7मी तुझ्यावर प्रेम करते, तर तूच मला सांग,
तुझा कळप तू कुठे चरावयास नेतो
आणि मध्यानाच्या वेळी तू तुझ्या मेंढ्यांना कुठे विसाव्याला लावतोस.
पडद्यात असलेल्या स्त्रीप्रमाणे
तुझ्या सोबत्यांच्या कळपाच्या बाजूला मी का असावे?
मित्र
8अगे स्त्रियांमधील परमसुंदरी, जर तुला ठाऊक नाही,
तर कळपांच्या ठशांचे अनुसरण करत ये
आणि मेंढपाळाच्या तंबूशेजारी
तू आपली करडे चार.
नायक
9माझ्या प्रिये, फारोहच्या रथामधील घोडीशी,
मी तुझी तुलना करतो.
10तुझे गाल कर्णभूषणासह,
तुझा गळा दागिन्यांच्या साखळीसह किती सुंदर आहे.
11आपण तुझ्यासाठी सोन्याचे,
रुपेजडित असे कर्णभूषण घडवून घेऊ.
नायिका
12राजा त्याच्या मेजाजवळ असता,
माझ्या अत्तराचा सुगंध दरवळत होता.
13माझा प्रियकर माझ्यासाठी माझ्या स्तनांमध्ये ठेवलेल्या
गंधरसाच्या पुडीप्रमाणे आहे.
14माझा प्रिय माझ्यासाठी जणू
एन-गेदीच्या द्राक्षमळ्यात असलेल्या मेंदीच्या फुलांचा गुच्छच आहे.
नायक
15माझ्या प्रिये, तू किती सुंदर आहेस!
अहा, किती सुंदर!
तुझे नयन कबुतरे आहेत.
नायिका
16माझ्या वल्लभा, तू किती सुंदर दिसतोस!
अहा, किती मोहक!
आणि आपले अंथरूण ताजेतवाने आहे.
नायक
17आमच्या घराच्या तुळया केदारच्या;
व छपर देवदारूच्या लाकडाचे आहे.