11
लाजराचा मृत्यू
1आता लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता. तो मरीया व तिची बहीण मार्था यांच्या बेथानी गावाचा होता. 2ही मरीया, जिचा भाऊ लाजर आजारी होता, तीच ही मरीया जिने प्रभुच्या मस्तकावर बहुमोल सुगंधी तेल ओतले आणि त्यांचे चरण आपल्या केसांनी पुसले होते. 3तेव्हा या बहिणींनी येशूंना निरोप पाठविला, “प्रभू, ज्यावर तुमची प्रीती आहे तो आजारी आहे.”
4येशूंनी हा निरोप ऐकला, तेव्हा ते म्हणाले, “या आजाराचा शेवट मृत्यूत होणार नाही. तर परमेश्वराच्या गौरवासाठी होईल आणि त्याद्वारे परमेश्वराच्या पुत्राचेही गौरव होईल.” 5मार्था आणि तिची बहीण मरीया व लाजर यांच्यावर येशूंची प्रीती होती, 6तरी लाजर आजारी आहे हे ऐकूनही येशू ज्या ठिकाणी राहत होते, तेथेच अधिक दोन दिवस राहिले. 7यानंतर ते आपल्या शिष्यांना म्हणाले, “चला आपण परत यहूदीयात जाऊ.”
8परंतु शिष्य म्हणाले, “गुरुजी, थोड्याच दिवसांपूर्वी यहूदी आपल्याला धोंडमार करण्याचा प्रयत्न करीत होते आणि तरी आपण पुन्हा तेथे जाता काय?”
9येशूंनी त्यांना उत्तर दिले, “दिवसात बारा तास प्रकाश असतो की नाही? जर कोणी दिवसा चालतो तर अडखळत नाही, कारण या पृथ्वीवरील प्रकाशामुळे त्याला दिसते. 10जेव्हा एखादी व्यक्ती रात्री चालते तेव्हा ती अडखळते, कारण तिच्याजवळ प्रकाश नसतो.”
11असे म्हटल्यानंतर, मग येशू त्यांना सांगू लागले, “आपला मित्र लाजर झोपी गेला आहे, परंतु मी जाऊन त्याला झोपेतून जागे करतो.”
12त्यांचे शिष्य म्हणाले, “प्रभुजी तो झोपला असेल, तर बरा होईल.” 13येशू तर लाजराच्या मरणाविषयी बोलत होते, परंतु शिष्यांना वाटले की ते नैसर्गिक झोपेविषयीच बोलत आहेत.
14मग येशूंनी त्यांना स्पष्टपणे सांगितले की, “लाजर मरण पावला आहे, 15तुमच्यासाठी मी तेथे नव्हतो म्हणून मला आनंद होत आहे, यासाठी की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवावा. चला, आपण त्याच्याकडे जाऊ.”
16परंतु दिदुम#11:16 थोमा (अरेमिक) आणि दिदुमस (ग्रीक) या दोघांचा अर्थ जुळा असा आहे म्हटलेला थोमा इतर शिष्यांना म्हणाला, “चला, आपणही त्यांच्याबरोबर मरू.”
येशू मार्था आणि मरीयेचे सांत्वन करतात
17ते तेथे पोहोचल्यावर, येशूंना समजले की, लाजराला कबरेत ठेऊन चार दिवस झाले होते. 18बेथानी हे गाव यरुशलेमपासून दोन मैलापेक्षा#11:18 जवळजवळ 3 किलोमीटर कमी अंतरावर होते. 19आणि अनेक यहूदी लोक मार्था व मरीया यांच्या भावाचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचे सांत्वन करण्यासाठी आले होते. 20येशू येत आहेत हे ऐकताच, मार्था त्यांना भेटावयास सामोरी गेली, पण मरीया मात्र घरातच राहिली.
21“प्रभुजी,” मार्था येशूंना म्हणाली, “आपण येथे असता, तर माझा भाऊ मेला नसता. 22परंतु तरी आता जे काही आपण परमेश्वराजवळ मागाल, ते तो आपणास देईल, हे मला ठाऊक आहे.”
23त्यावर येशूंनी तिला सांगितले, “तुझा भाऊ पुन्हा उठेल.”
24मार्था म्हणाली, “होय, अंतिम दिवशी, पुनरुत्थानाच्या दिवशी तो जिवंत होईल.”
25येशू तिला म्हणाले, “पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो कोणी मजवर विश्वास ठेवतो, तो मरण पावला असला, तरी पुन्हा जगेल; 26जो कोणी मजवर विश्वास ठेवून जगतो तो कधीही मरणार नाही. यावर तुझा विश्वास आहे काय?”
27“होय,” ती म्हणाली, “या जगात येणारा, तो ख्रिस्त (मसीहा), परमेश्वराचा पुत्र आपण आहात, यावर माझा विश्वास आहे.”
28ती असे बोलल्यानंतर परत गेली व आपली बहीण मरीया हिला बाजूला बोलावून म्हणाली, “गुरुजी आले आहेत आणि ते तुला विचारत आहेत.” 29मरीयेने हे ऐकले तेव्हा ती त्वरेने उठून त्यांच्याकडे गेली. 30येशूंनी अद्याप गावात प्रवेश केलेला नव्हता, जेथे मार्था त्यांना भेटली त्याच ठिकाणी ते होते. 31जे यहूदी लोक मरीयेच्याजवळ घरात होते, व तिचे सांत्वन करीत होते, त्यांनी तिला चटकन उठून बाहेर जाताना पाहिले, तेव्हा ती शोक करण्यासाठी कबरेकडेच जात आहे असे त्यांना वाटले आणि म्हणून तेही तिच्या पाठीमागे गेले.
32येशू जेथे होते तेथे मरीया पोहोचल्यावर त्यांना पाहून, ती त्यांच्या पाया पडली व त्यांना म्हणाली, “प्रभुजी, आपण येथे असता, तर माझा भाऊ मरण पावला नसता.”
33येशूंनी तिला असे रडताना आणि जे यहूदी तिच्याबरोबर होते त्यांना शोक करताना पाहिले, तेव्हा ते आत्म्यामध्ये व्याकुळ व अस्वस्थ झाले. 34येशूंनी विचारले, “तुम्ही त्याला कोठे ठेवले आहे?”
ते त्याला म्हणाले, “प्रभुजी, या आणि पाहा.”
35येशू रडले.
36नंतर यहूदी म्हणाले, “पाहा, त्यांचे त्याच्यावर किती प्रेम होते!”
37परंतु काहीजण म्हणाले, “ज्याने आंधळ्या मनुष्याचे डोळे उघडले, ते या मनुष्याला मरणापासून वाचवू शकले नाही का?”
येशू लाजराला मृतातून उठवितात
38येशू, पुन्हा व्याकुळ होऊन, कबरेजवळ आले. ती एक गुहा होती आणि तिच्या प्रवेशद्वारावर धोंड लोटलेली होती. 39येशू म्हणाले, “धोंड बाजूला काढा.”
“परंतु प्रभुजी,” मृत माणसाची बहीण मार्था म्हणाली, “आता त्याला दुर्गंधी सुटली असेल, कारण त्याला तेथे ठेऊन चार दिवस झाले आहेत.”
40तेव्हा येशू म्हणाले, “मी तुला सांगितले नव्हते काय, की जर तू विश्वास ठेवशील तर परमेश्वराचे गौरव पाहशील?”
41यास्तव त्यांनी ती धोंड बाजूला केली. मग येशूंनी दृष्टी वर करून म्हटले, “हे पित्या, तुम्ही माझे ऐकले म्हणून मी तुमचे आभार मानतो. 42मला माहीत आहे की तुम्ही नेहमीच माझे ऐकता, परंतु सर्व लोक जे येथे उभे आहेत, त्यांच्या हिताकरिता मी हे बोललो, यासाठी की, तुम्ही मला पाठविले आहे यावर त्यांनी विश्वास ठेवावा.”
43हे बोलल्यावर, येशू मोठ्याने हाक मारून म्हणाले, “लाजरा, बाहेर ये!” 44लाजर बाहेर आला, त्याचे हातपाय पट्ट्यांनी बांधलेले होते व तोंडाभोवती कापड गुंडाळलेले होते.
येशूंनी लोकांस म्हटले, “त्याची प्रेतवस्त्रे काढा आणि त्याला जाऊ द्या.”
येशूंना ठार मारण्याचा कट
45यामुळे मरीयेला भेटावयास आलेल्या अनेक यहूद्यांनी येशूंनी जे केले ते पाहिले, त्यांनी त्याजवर विश्वास ठेवला. 46परंतु काहीजण परूश्यांकडे गेले आणि येशूंनी काय केले ते त्यास सांगितले. 47मग मुख्य याजकांनी व परूश्यांनी न्यायसभा बोलावली.
ते विचारू लागले, “आपण काय साध्य केले आहे? या ठिकाणी हा मनुष्य अनेक चिन्हे करीत आहे. 48जर आपण त्याला असेच करत राहू दिले, तर प्रत्येकजण त्याच्यावर विश्वास ठेवेल आणि रोमी येतील व आपले मंदिर व आपले राष्ट्र दोन्ही ताब्यात घेतील.”
49त्यांच्यापैकी, कयफा नावाचा, एक मनुष्य त्या वर्षी महायाजक होता, तो म्हणाला, “तुम्हाला काहीच माहीत नाही! 50तुम्ही हेही लक्षात आणत नाही की, संपूर्ण राष्ट्राचा नाश होणे यापेक्षा एका मनुष्याने मरावे हे तुमच्या हिताचे आहे.”
51हे तो आपल्या मनाचे बोलला नाही, त्या वर्षाचा महायाजक म्हणून त्याने भविष्य केले की, येशू यहूदी राष्ट्राकरिता मरणार आहेत, 52हे केवळ इस्राएल राष्ट्रासाठीच नव्हे, तर परमेश्वराच्या सर्व पांगलेल्या मुलांना एकत्र आणावे आणि एक करावे यास्तव. 53मग त्या दिवसापासून त्यांनी त्याला जिवे मारण्याचा कट केला.
54यामुळे येशू यहूदी प्रांताच्या लोकांमध्ये उघडपणे फिरले नाहीत. तर त्याऐवजी ते अरण्याच्या जवळ असलेल्या एफ्राईम नावाच्या एका गावी आपल्या शिष्यांसह जाऊन राहिले.
55जेव्हा यहूद्यांचा वल्हांडण सण जवळ आला, तेव्हा सण सुरू होण्यापूर्वी शुद्धीकरणाचा विधी पार पाडावा म्हणून देशातील अनेक लोक वर यरुशलेममध्ये आले होते 56येशूंना ते शोधत होते, मंदिराच्या अंगणात उभे राहून ते एकमेकांना विचारीत होते, “तुम्हाला काय वाटते? तो वल्हांडण सणाला येणारच नाही काय?” 57इकडे मुख्य याजकांनी आणि परूश्यांनी उघडपणे आज्ञा केली की, येशू कोणाला आढळल्यास, त्याने ताबडतोब सूचना द्यावी म्हणजे ते त्याला अटक करतील.