14
येशू आपल्या शिष्यांचे सांत्वन करतात
1“तुमची हृदये अस्वस्थ होऊ देऊ नका. तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवा; आणि माझ्यावरसुद्धा विश्वास ठेवा. 2माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या अनेक खोल्या आहेत आणि तसे नसते तर, मी तुमच्यासाठी जागा तयार करण्यासाठी जात आहे असे तुम्हाला सांगितले असते का? 3आणि जर मी गेलो व तुमच्यासाठी जागा तयार केली की, मी पुन्हा येईन व तुम्हाला बरोबर घेऊन जाईन, म्हणजे जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. 4मी ज्या ठिकाणी जाणार आहे, तेथे जाण्याचा मार्ग तुम्हाला ठाऊक आहे.”
पित्याकडे जाण्याचा मार्ग येशू
5थोमा त्यांना म्हणाला, “प्रभुजी, आपण कोठे जात आहात, हे आम्हास माहीत नाही, तर मार्ग आम्हास कसा माहीत असणार?”
6येशूंनी उत्तर दिले, “मार्ग आणि सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणीही येऊ शकत नाही. 7जर तुम्ही मला खरोखर ओळखले असते, तर माझ्या पित्यालाही ओळखले#14:7 काही मूळप्रतींमध्ये जर तुम्ही मला खरोखर ओळखले असते तर माझ्या. असते. आता यापुढे तुम्ही त्यांना ओळखता व त्यांना पाहिलेही आहे.”
8फिलिप्प म्हणाला, “प्रभुजी, आम्हाला पिता दाखवा म्हणजे पुरे आहे.”
9येशूंनी उत्तर दिले: “फिलिप्पा, मी इतका काळ तुम्हाजवळ असूनही तू मला ओळखत नाही काय? ज्याने मला पाहिले आहे, त्याने पित्यालाही पाहिले आहे. तर मग, ‘पिता दाखवा असे तू कसे म्हणतोस’? 10मी पित्यामध्ये आहे व पिता मजमध्ये आहे, यावर तुझा विश्वास नाही काय? जी वचने मी तुला सांगतो, ते मी माझ्या स्वतःच्या अधिकाराने सांगत नाही. खरेतर, माझ्यामध्ये वसणारा पिताच हे कार्य करीत आहे. 11फक्त विश्वास ठेवा की मी पित्यामध्ये आहे आणि पिता मजमध्ये आहे; अथवा प्रत्यक्ष कार्याच्या पुराव्यावर तरी विश्वास ठेवा. 12मी तुम्हाला निश्चित सांगतो, मी जी कृत्ये करतो ती मजवर विश्वास ठेवणाराही करील, किंबहुना त्यापेक्षाही मोठी करील, कारण मी पित्याकडे जात आहे. 13आणि तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन, यासाठी की पुत्रामध्ये पित्याचे गौरव व्हावे. 14तुम्ही माझ्या नावाने मजजवळ जे काहीही मागाल, ते मी तुम्हासाठी करीन.
येशूंचे पवित्र आत्मा देण्याबद्दल अभिवचन
15“जर तुमची मजवर प्रीती असेल, तर माझ्या आज्ञा पाळा. 16आणि मी पित्याजवळ मागेन, ते तुम्हाला मदत करण्यासाठी दुसरा कैवारी देतील, जो तुम्हाबरोबर सर्वकाळ राहील— 17सत्याचा आत्मा. त्याला जग स्वीकारणार नाही, कारण जग त्याला पाहत नाही व ओळखत नाही. परंतु तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुम्हाबरोबर राहतो आणि तुम्हामध्ये#14:17 काही जुन्या प्रतींमध्ये आणि आहे राहील. 18मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही; मी तुमच्याकडे येईन. 19आता थोड्याच वेळात, जग मला आणखी पाहणार नाही, परंतु तुम्ही मला पाहाल. मी जिवंत आहे, म्हणून तुम्हीही जिवंत राहाल. 20त्या दिवशी तुम्हाला समजेल की मी पित्यामध्ये आहे, व तुम्ही मजमध्ये आहात, व मी तुम्हामध्ये आहे. 21ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळतो तोच मजवर प्रीती करतो. जो मजवर प्रीती करतो त्यावर माझा पिताही प्रीती करील आणि मी देखील त्याजवर प्रीती करीन व स्वतः त्यांना प्रकट होईन.”
22नंतर यहूदा (यहूदा इस्कर्योत नव्हे) म्हणाला, “पण प्रभुजी, आपण फक्त आम्हाला प्रकट होणार पण जगाला का प्रकट होणार नाही?”
23येशूंनी उत्तर दिले, “कारण जो कोणी मजवर प्रीती करतो तो माझे शिक्षण आचरणात आणेल. माझा पितादेखील त्यांच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्यांच्याकडे येऊ व त्यांच्याबरोबर वस्ती करू. 24जो कोणी माझ्यावर प्रीती करीत नाही, तो माझे शिक्षण पाळीत नाही. माझी जी वचने तुम्ही ऐकत आहात ती माझी स्वतःची नाहीत; तर ज्याने मला पाठविले त्या पित्याची आहेत.
25“मी तुमच्याबरोबर असताना, हे सर्व तुम्हाला सांगितले आहे. 26परंतु तो कैवारी, पवित्र आत्मा, ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील, तो तुम्हाला सर्वकाही शिकवेल आणि मी सांगितलेल्या सर्व गोष्टींची आठवण करून देईल. 27शांती मी तुम्हासाठी ठेऊन जातो; माझी शांती मी तुम्हाला देतो. ज्याप्रमाणे जग देते त्याप्रमाणे मी तुम्हाला देत नाही. तुमची मने अस्वस्थ होऊ देऊ नका व भिऊ नका.
28“मी तुम्हाला सांगितले ते तुम्ही ऐकले आहे की, ‘मी जात आहे, परंतु मी तुम्हाकडे परत येईन.’ जर तुमची मजवर प्रीती असती, तर मी पित्याकडे जातो म्हणून तुम्हाला आनंद वाटला असता, कारण माझा पिता मजपेक्षा थोर आहे. 29आता हे घडून येण्यापूर्वीच मी तुम्हाला सांगितले आहे, यासाठी की ते घडून आले म्हणजे, तुम्ही विश्वास ठेवावा. 30आता मी तुम्हाला यापेक्षा अधिक सांगणार नाही, कारण या जगाचा अधिपती येत आहे. त्याची मजवर कसलीही सत्ता नाही, 31परंतु तो यासाठी आला की जगाने ओळखावे की मी पित्यावर प्रीती करतो आणि पित्याने जशी मला आज्ञा दिली तसेच तंतोतंत करतो.
“आता उठा; आपण येथून जाऊ.”