उत्पत्ती 1:1-31
उत्पत्ती 1:1-31 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. आणि पृथ्वी आकारविरहित व शून्य होती, जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. तेव्हा देव बोलला, “प्रकाश होवो,” आणि प्रकाश झाला. देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे; आणि देवाने प्रकाश व अंधकार हे एकमेकांपासून वेगळे केले. देवाने प्रकाशाला ‘दिवस’ व अंधकाराला ‘रात्र’ म्हटले; आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा पहिला दिवस. मग देव बोलला, “जलांच्या मध्यभागी अंतराळ होवो, व ते जलांना दुभागणारे होवो.” असे देवाने अंतराळ केले आणि अंतराळाखालच्या व वरच्या जलांना वेगळे केले; आणि तसे झाले. देवाने अंतराळाला ‘आकाश’ म्हटले; आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा दुसरा दिवस. मग देव बोलला, “आकाशाखालच्या जलांचा एका ठिकाणी संचय होवो, व कोरडी जमीन दृष्टीस पडो;” आणि तसे झाले. देवाने कोरड्या जमिनीला ‘भूमी’ म्हटले व जलांच्या संचयाला ‘समुद्र’ म्हटले; देवाने पाहिले की हे चांगले आहे. तेव्हा देव बोलला, “हिरवळ, बीज देणारी वनस्पती आणि आपापल्यापरी सबीज फळे देणारी फळझाडे भूमी आपल्यावर उपजवो;” आणि तसे झाले. हिरवळ, आपापल्यापरी बीज देणारी वनस्पती व आपापल्यापरी सबीज फळे देणारी फळझाडे भूमीने उपजवली; देवाने पाहिले की हे चांगले आहे. आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली हा तिसरा दिवस. मग देव बोलला, “दिवस व रात्र ही भिन्न करण्यासाठी आकाशाच्या अंतराळात ज्योती होवोत; त्या चिन्हे, ऋतू, दिवस व वर्षे दाखवणार्या होवोत; पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी आकाशाच्या अंतराळात त्या ज्योती होवोत;” आणि तसे झाले. देवाने दोन मोठ्या ज्योती केल्या; दिवसावर प्रभुत्व चालवण्यासाठी मोठी ज्योत आणि रात्रीवर प्रभुत्व चालवण्यासाठी लहान ज्योत; आणि त्याने तारेही केले. पृथ्वीवर प्रकाश पाडावा, दिवस व रात्र ह्यांवर प्रभुत्व चालवावे आणि प्रकाश व अंधकार ह्यांना भिन्न करावे, म्हणून देवाने आकाशाच्या अंतराळात त्या ज्योती ठेवल्या; देवाने पाहिले की हे चांगले आहे. आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा चौथा दिवस. मग देव बोलला, “जीवजंतूंच्या थव्यांनी जले भरून जावोत आणि पृथ्वीवरून आकाशाच्या अंतराळात पक्षी उड्डाण करोत.” प्रचंड जलचर, जलांत गजबजणारे व संचार करणारे प्रत्येक जातीचे सर्व जीव आणि प्रत्येक सपक्ष प्राणी देवाने निर्माण केले; देवाने पाहिले की हे चांगले आहे. देवाने त्यांना आशीर्वाद दिला : “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, समुद्रांतील पाणी व्यापून टाका; आणि पृथ्वीवर पक्षी बहुगुणित होवोत.” आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा पाचवा दिवस. मग देव बोलला, “प्रत्येक जातीचे ग्रामपशू, रांगणारे प्राणी व वनपशू असे जीवधारी प्राणी पृथ्वी उपजवो;” आणि तसे झाले. असे प्रत्येक जातीचे वनपशू, ग्रामपशू व जमिनीवर रांगणारे जीव देवाने निर्माण केले; देवाने पाहिले की हे चांगले आहे. मग देव बोलला, “आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशू, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी ह्यांवर ते सत्ता चालवतील.” देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला; देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली. देवाने त्यांना आशीर्वाद दिला; देव त्यांना म्हणाला, “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी ह्यांवर सत्ता चालवा.” देव म्हणाला, “पाहा, अवघ्या भूतलावरील बीज देणारी प्रत्येक वनस्पती व सबीज फळे देणारे प्रत्येक झाड मी तुम्हांला देतो; ही तुमचे अन्न होतील. त्याचप्रमाणे पृथ्वीवरील सर्व पशू, आकाशातील सर्व पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व जीवधारी प्राणी ह्यांना अवघी हिरवळ खाण्यासाठी देतो.” आणि तसे झाले. आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले. संध्याकाळ झाली व सकाळ झाली. हा सहावा दिवस.
उत्पत्ती 1:1-31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही निर्माण केली. पृथ्वी अंदाधुंद व रिकामी होती. जलाशयावर अंधकार होता, देवाचा आत्मा पाण्यावर पाखर घालत होता. देव बोलला, “प्रकाश होवो” आणि प्रकाश झाला. देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे. देवाने अंधकारापासून प्रकाश वेगळा केला. देवाने प्रकाशाला “दिवस” व अंधकाराला “रात्र” असे नाव दिले. संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा पहिला दिवस. देव बोलला, “जलांच्या मध्यभागी अंतराळ होवो व ते जलापासून जलांची विभागणी करो.” देवाने अंतराळ केले आणि अंतराळावरच्या व अंतराळाखालच्या जलांची विभागणी केली व तसे झाले. देवाने अंतराळास आकाश असे म्हटले. संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा दुसरा दिवस. नंतर देव बोलला, “आकाशाखालील पाणी एकाजागी एकत्र जमा होवो व कोरडी जमीन दिसून येवो,” आणि तसे झाले. देवाने कोरड्या जमिनीस भूमी आणि एकत्र झालेल्या पाण्याच्या संचयास समुद्र असे म्हटले. त्याने पाहिले की हे चांगले आहे. देव बोलला, “हिरवळ, बीज देणाऱ्या वनस्पती, आणि आपआपल्या जातीप्रमाणे, ज्यात त्याचे बीज आहे अशी फळे देणारी फळझाडे, ही पृथ्वीवर येवोत.” आणि तसेच झाले. पृथ्वीने हिरवळ, आपापल्या जातीचे बीज देणाऱ्या वनस्पती आणि आपापल्या जातीची फळे देणारी व त्या फळातच आपापल्या जातीचे बीज असणारी फळझाडे भूमीने उत्पन्न केली. देवाने पाहिले की हे चांगले आहे. संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा तिसरा दिवस. मग देव बोलला, “दिवस व रात्र ही वेगळी करण्यासाठी आकाशात ज्योति होवोत व त्या चिन्हे, ऋतू, दिवस, आणि वर्षे दाखविणाऱ्या होवोत. पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी आकाशात त्या दीपाप्रमाणे होवोत,” आणि तसे झाले. दिवसावर सत्ता चालविण्यासाठी मोठी ज्योत आणि रात्रीवर सत्ता चालविण्यासाठी लहान ज्योत, अशा दोन मोठ्या ज्योती देवाने निर्माण केल्या. त्याने तारेही निर्माण केले. पृथ्वीवर प्रकाश देण्यासाठी, दिवसावर व रात्रीवर सत्ता चालविण्यासाठी, प्रकाश व अंधकार वेगळे करण्यासाठी देवाने त्यांना अंतराळात ठेवले. देवाने पाहिले की हे चांगले आहे. संध्याकाळ झाली व सकाळ झाली. हा चौथा दिवस. देव बोलला, “जले जीवजंतूनी भरून जावोत, आणि पृथ्वीच्या वर आकाशाच्या अंतराळात पक्षी उडोत.” समुद्रातील फार मोठे जलचर व अनेक प्रकारचे जलप्राणी त्यांच्या त्यांच्या जातींप्रमाणे देवाने उत्पन्न केले. तसेच पंख असलेल्या प्रत्येक पक्षाला त्याच्या जातीप्रमाणे देवाने उत्पन्न केले. देवाने पाहिले की हे चांगले आहे. देवाने त्यांना आशीर्वाद देऊन म्हटले, “फलद्रूप व्हा आणि बहुगुणित व्हा, समुद्रातील पाणी व्यापून टाका. पृथ्वीवर पक्षी बहुगुणित होवोत.” संध्याकाळ झाली व सकाळ झाली हा पाचवा दिवस. देव बोलला, “आपापल्या जातीचे सजीव प्राणी, गुरेढोरे, सरपटणारे प्राणी व वनपशू पृथ्वी उपजवो.” आणि तसे झाले. देवाने पृथ्वीवरील जनावरे, गुरेढोरे, वनपशू, आणि सरपटणारा प्रत्येक जीव त्याच्या त्याच्या जाती प्रमाणे निर्माण केला. देवाने पाहिले की हे चांगले आहे. देव बोलला, “आपण आपल्या प्रतिरूपाचा आपल्या सारखा मनुष्य निर्माण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, सर्व वनपशू, मोठी जनावरे व जमिनीवर सरपटणारे सर्व लहान प्राणी यांच्यावर त्यांना सत्ता चालवू देऊ.” देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. त्याच्या स्वतःच्या प्रतिरूपाचा असा देवाने तो निर्माण केला. नर व नारी असे त्यांना निर्माण केले. देवाने त्यांना आशीर्वाद दिला, आणि त्यांना म्हटले, “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका. ती आपल्या सत्तेखाली आणा; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवर फिरणारा प्रत्येक सजीव प्राणी यांवर सत्ता चालवा.” देव म्हणाला, पाहा, सर्व पृथ्वीच्या पृष्ठभागावर असलेली बीज देणारी प्रत्येक वनस्पती आणि ज्यामध्ये बीज देणाऱ्या झाडाचे फळ आहे ते प्रत्येक झाड, ही मी तुम्हास दिली आहेत. ही तुम्हाकरिता अन्न असे होतील. तसेच पृथ्वीवरील प्रत्येक पशू, आकाशातील प्रत्येक पक्षी आणि पृथ्वीच्या पाठीवर ज्यामध्ये जीव आहे त्या प्रत्येक सरपटणाऱ्या प्राण्याकरता अन्न म्हणून मी प्रत्येक हिरवी वनस्पती दिली आहे. आणि सर्व तसे झाले. देवाने आपण जे केले होते ते सर्व पाहिले. पाहा, ते फार चांगले होते. संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली, हा सहावा दिवस.
उत्पत्ती 1:1-31 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परमेश्वराने प्रथम आकाश व पृथ्वी निर्माण केली. आता पृथ्वी निराकार आणि रिकामी होती, खोलवर अंधार पसरला होता आणि परमेश्वराचा आत्मा पाण्यावर पाखर घालीत होता. नंतर परमेश्वराने म्हटले: “प्रकाश होवो” आणि प्रकाश झाला. परमेश्वराने पाहिले की, प्रकाश चांगला आहे आणि त्यांनी अंधारापासून प्रकाश वेगळा केला. परमेश्वराने प्रकाशाला “दिवस” आणि अंधाराला “रात्र” असे नाव दिले आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा पहिला दिवस. पुन्हा परमेश्वराने म्हटले, “जलाशयाच्या मध्यभागी अंतराळ होवो आणि ते जलापासून जलांची विभागणी करो.” परमेश्वराने अंतराळ निर्माण केले व अंतराळाच्या वरचे जल आणि खालचे जल अशी विभागणी केली आणि तसे घडून आले. परमेश्वराने अंतराळास “आकाश” असे नाव दिले आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा दुसरा दिवस. नंतर परमेश्वराने म्हटले: “अंतराळाखालील जले एकत्र येवो व कोरडी जमीन दृष्टीस पडो” आणि तसे घडून आले. परमेश्वराने कोरड्या जमिनीस “भूमी” व जलांच्या संचयास “सागर” अशी नावे दिली. परमेश्वराने पाहिले की, हे चांगले आहे. मग परमेश्वराने म्हटले, “भूमीतून वनस्पतीचा उपज होवो: निरनिराळी रोपे व झाडे, फळे देणारी व त्या फळातच स्वजातीचे बीज असणार्या फळझाडांचा भूमीतून उपज होवो” आणि तसे घडून आले. भूमीने वनस्पतीचा उपज केला: फळे देणारी व त्या फळातच स्वजातीचे बीज असणारी फळझाडे भूमीने उपजविली. परमेश्वराने पाहिले की हे चांगले आहे. आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा तिसरा दिवस. त्यानंतर परमेश्वराने म्हटले: “दिवस आणि रात्र वेगळी करण्यासाठी आकाशात ज्योती होवोत व त्या ॠतू, दिवस आणि वर्षे दाखविणारी चिन्हे होवोत. पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी त्या ज्योती आकाशमंडळात दीप होवोत” आणि तसे घडून आले. परमेश्वराने दोन मोठ्या ज्योती निर्माण केल्या—दिवसावर प्रभुत्व चालविण्यासाठी प्रखर आणि रात्रीवर प्रभुत्व चालविण्यासाठी सौम्य प्रकाश. त्यांनी तारेही निर्माण केले. परमेश्वराने त्या ज्योती पृथ्वीवर प्रकाश पाडण्यासाठी आकाशमंडळात ठेवल्या, दिवसावर व रात्रीवर प्रभुत्व चालविण्यासाठी आणि प्रकाश व अंधार वेगळे करण्यासाठी या ज्योती त्यांनी निर्माण केल्या. परमेश्वराने पाहिले की हे चांगले आहे. आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा चौथा दिवस. आणि परमेश्वराने म्हटले, “जलांमध्ये विपुल प्रमाणात जीवजंतू उत्पन्न होवोत आणि पक्षी पृथ्वीवर आकाशमंडळात विहार करोत.” सागरांमधील महाकाय प्राणी, तसेच जलांमध्ये संचार करणारे व सर्व जातीचे प्राणी त्यांनी उत्पन्न केले. तसेच पंख असलेले सर्व जातीचे पक्षीही त्यांनी उत्पन्न केले. परमेश्वराने पाहिले की हे चांगले आहे. परमेश्वराने त्यांना आशीर्वाद दिला आणि ते म्हणाले, “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, समुद्रातील जले भरून टाका आणि पृथ्वीवर पक्ष्यांची वृद्धी होवो.” आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा पाचवा दिवस. मग परमेश्वराने म्हटले, “प्रत्येक जातीच्या जिवंत प्राण्याची निर्मिती होवो: गुरे, जमिनीवरील सरपटणारे प्राणी, वनपशू यांच्या सर्व जाती पृथ्वीवर अस्तित्वात येवोत” आणि तसे घडून आले. परमेश्वराने वन्यप्राणी, पाळीव जनावरे, जमिनीवर सरपटत जाणारे सर्व प्राणी, त्यांच्या जाती प्रमाणे त्यांनी निर्माण केले आणि परमेश्वराने पाहिले की ते चांगले आहे. मग परमेश्वराने म्हटले: “आपल्यासारखी, आपल्या प्रतिरूपाची मानवजात आपण निर्माण करू या. समुद्रातील मासे आणि आकाशातील पक्षी, गुरे, सर्व वनपशू आणि जमिनीवर सरपटणार्या प्रत्येक प्राण्यांवर त्यांनी सत्ता चालवावी.” याप्रमाणे परमेश्वराने आपल्या प्रतिरूपाची मानवजात निर्माण केली. त्यांनी आपल्या प्रतिरूपातच त्यांना निर्माण केले. पुरुष व स्त्री असे त्यांनी निर्माण केले. मग परमेश्वराने त्यांना आशीर्वाद दिला आणि ते त्यांना म्हणाले, “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका; ती आपल्या सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवर संचार करणार्या प्रत्येक सजीव प्राण्यावर अधिकार गाजवा.” मग परमेश्वर म्हणाले, “पाहा, भूतलावर बीज देणारी प्रत्येक वनस्पती आणि फळांमध्येच वृक्ष निर्माण करणारे बीज असलेले प्रत्येक फळझाड मी तुम्हाला दिले आहे. ती तुमचे अन्न होतील. त्याप्रमाणे पृथ्वीतलावरील सर्व पशू, आकाशातील प्रत्येक पक्षी, तसेच जमिनीवर सरपटत जाणारा, जीवनाचा श्वास असलेला प्रत्येक प्राणी—यांना अन्न म्हणून मी हिरवी वनस्पती देत आहे” आणि तसे घडून आले. परमेश्वराने आपण निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट पाहिली आणि ती अतिशय चांगली होती आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा सहावा दिवस.