उत्पत्ती 8:1-22
उत्पत्ती 8:1-22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग देवाने नोहा व तारवात त्याच्याबरोबर असलेले वनपशू आणि ग्रामपशू ह्या सर्वांची आठवण केली; देवाने पृथ्वीवर वारा वाहवला तेव्हा पाणी ओसरू लागले; जलाशयाचे झरे व आकाशाची दारे बंद झाली, आणि आकाशातून पावसाची झोड थांबली, पृथ्वीवरचे पाणी एकसारखे हटत गेले; दीडशे दिवस संपल्यावर पाणी ओसरत गेले. सातव्या महिन्याच्या सतराव्या दिवशी अरारात पर्वतावर तारू टेकले. दहाव्या महिन्यापर्यंत पाणी एकसारखे ओसरत होते; दहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पर्वताचे माथे दिसू लागले. ह्याला चाळीस दिवस लोटल्यावर नोहाने तारवास जी खिडकी केली होती ती उघडली, आणि एक कावळा बाहेर सोडला; तो पृथ्वीवरील पाणी सुकेपर्यंत इकडेतिकडे फिरत राहिला. पाणी भूपृष्ठावरून आटले किंवा नाही हे पाहण्यासाठी त्याने एक कबुतर बाहेर सोडले. त्या कबुतराला पाय टेकण्यास कोठे आधार न मिळाल्यामुळे ते त्याच्याकडे तारवात परत आले; कारण सगळ्या पृथ्वीच्या पाठीवर अद्यापि पाणी होते; तेव्हा नोहाने हात बाहेर काढून त्याला धरून आपल्याकडे तारवात घेतले. त्याने आणखी सात दिवस वाट पाहून तारवातून त्या कबुतराला पुन: बाहेर सोडले. सायंकाळी ते कबुतर त्याच्याकडे आले, आणि पाहा, त्याच्या चोचीत जैतून झाडाचे नुकतेच खुडलेले पान आहे असे त्याला दिसले; नोहा त्यावरून समजला की आता पृथ्वीवरचे पाणी आटले आहे. त्याने आणखी सात दिवस थांबून त्या कबुतराला सोडले, ते त्याच्याकडे परत आले नाही. सहाशे एकाव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पृथ्वीवरचे पाणी सुकून गेले तेव्हा नोहाने तारवाचे छप्पर काढून पाहिले, तेव्हा पृथ्वीचा पृष्ठभाग वाळला आहे असे त्याला दिसले. दुसर्या महिन्याच्या सत्ताविसाव्या दिवशी जमीन खडखडीत वाळली. मग देव नोहाला म्हणाला, “तू आपली बायको, पुत्र व सुना ह्यांना घेऊन तारवातून बाहेर नीघ. पक्षी, पशू व भूमीवर रांगणारे सर्व ह्यांपैकी जे प्राणी तुझ्याबरोबर आहेत त्या सर्वांना बाहेर आण, म्हणजे पृथ्वीवर त्यांची संतती विपुल होईल, ते फलद्रूप होऊन पृथ्वीवर बहुगुणित होतील.” तेव्हा नोहा आपले पुत्र, बायको व सुना ह्यांना घेऊन बाहेर निघाला. प्रत्येक पशू, प्रत्येक रांगणारा प्राणी, प्रत्येक पक्षी असे पृथ्वीवर संचार करणारे प्राणी जातवारीने तारवातून बाहेर निघाले. नंतर नोहाने परमेश्वरासाठी वेदी बांधली; आणि त्याने सर्व शुद्ध पशू व सर्व शुद्ध पक्षी ह्यांतले काही घेऊन त्या वेदीवर त्यांचे होमार्पण केले. परमेश्वर त्याचा सुवास घेऊन आपल्या मनात म्हणाला, “मानवामुळे मी इत:पर भूमीला कधीही शाप देणार नाही; कारण मानवाच्या मनातल्या कल्पना बाळपणापासून दुष्ट असतात; तर मी आताच्याप्रमाणे पुन्हा अखिल जिवांचा कधीही संहार करणार नाही. पृथ्वी राहील तोवर पेरणी व कापणी, थंडी व ऊन, उन्हाळा व हिवाळा, दिवस व रात्र ही व्हायची राहणार नाहीत.”
उत्पत्ती 8:1-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
देवाने नोहा, त्याच्यासोबत तारवात असलेले सर्व वन्यप्राणी आणि सर्व गुरेढोरे यांची आठवण केली. देवाने पृथ्वीवर वारा वाहण्यास लावला, आणि पाणी मागे हटण्यास सुरवात झाली. पाण्याचे खोल झरे आणि आकाशाच्या खिडक्या बंद झाल्या, आणि पाऊस पडण्याचा थांबला. पृथ्वीवरून पुराचे पाणी एकसारखे मागे हटत गेले. आणि दीडशे दिवसाच्या अखेरीस पुष्कळ पाणी कमी झाले. सातव्या महिन्याच्या सतराव्या दिवशी तारू अरारात पर्वतावर थांबले. दहाव्या महिन्यापर्यंत पाणी एकसारखे हटत गेले. दहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पर्वतांचे माथे दिसू लागले. चाळीस दिवसानंतर नोहाने तयार केलेली तारवाची खिडकी उघडली त्याने एक कावळा बाहेर सोडला आणि पृथ्वीवरील पाणी सुकून जाईपर्यंत तो इकडे तिकडे उडत राहिला. नंतर जमिनीच्या वरील भागावरून पाणी मागे हटले आहे की नाही हे पाहण्याकरिता नोहाने एक कबुतर बाहेर सोडले, परंतु कबुतराला पाय टेकण्यास जागा मिळाली नाही आणि ते त्याच्याकडे तारवात परत आले, कारण सर्व पृथ्वी पाण्याने झाकली होती. तेव्हा त्याने हात बाहेर काढून त्यास आपल्याबरोबर तारवात घेतले. तो आणखी सात दिवस थांबला. आणि त्याने पुन्हा कबुतराला तारवाबाहेर सोडले; ते कबुतर संध्याकाळी त्याच्याकडे परत आले. आणि पाहा, त्याच्या चोचीत जैतून झाडाचे नुकतेच तोडलेले पान होते. यावरुन पृथ्वीवरील पाणी कमी झाले असल्याचे नोहाला समजले. नोहा आणखी सात दिवस थांबला आणि त्याने कबुतरास पुन्हा बाहेर सोडले. ते परत त्याच्याकडे आले नाही. असे झाले की, सहाशे एकाव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याचा पहिल्या दिवशी पृथ्वीवरील पाणी सुकून गेले, तेव्हा नोहाने तारवाचे आच्छादन काढून बाहेर पाहिले, तो पाहा, जमिनीचा वरील भाग कोरडा झालेला होता. दुसऱ्या महिन्याच्या सत्ताविसाव्या दिवसापर्यंत पृथ्वी कोरडी झाली होती. देव नोहाला म्हणाला, “तू, तुझी पत्नी, तुझी मुले व तुझ्या मुलांच्या स्त्रिया यांना तुझ्याबरोबर घेऊन तारवाच्या बाहेर ये. तुझ्या बरोबर पक्षी, गुरेढोरे आणि पृथ्वीवर रांगणारा प्रत्येक प्राणी यांसह प्रत्येक जिवंत देहधारी प्राणी बाहेर आण. यासाठी की, त्यांची संपूर्ण पृथ्वीभर सर्वत्र असंख्य पट भरभराट व्हावी आणि पृथ्वीवर ते बहुगुणित व्हावेत.” तेव्हा नोहा, त्याची पत्नी, मुले व मुलांच्या स्त्रिया यांच्यासह तारवातून बाहेर आला; त्याच्या बरोबरचा प्रत्येक जिवंत प्राणी, प्रत्येक रांगणारा प्राणी व प्रत्येक पक्षी, पृथ्वीवर हालचाल करणारा प्रत्येक जीव, आपापल्या जातीप्रमाणे तारवातून बाहेर आले. नोहाने परमेश्वराकरता एक वेदी बांधली. त्याने शुद्ध पक्ष्यांतून काही आणि शुद्ध पशुंतून काही घेतले, आणि त्यांचे वेदीवर होमार्पण केले. परमेश्वराने तो सुखकारक सुगंध घेतला आणि आपल्या मनात म्हटले, “मानवामुळे मी पुन्हा भूमीला शाप देणार नाही; मानवाच्या मनातील योजना बालपणापासूनच वाईट आहेत. मी आता केले आहे त्याप्रमाणे मी पुन्हा कधीही सर्व जिवांचा नाश करणार नाही. जोपर्यंत पृथ्वी राहील तोपर्यंत पेरणी व कापणी, थंडी व ऊन, हिवाळा व उन्हाळा, दिवस व रात्र व्हावयाची थांबणार नाहीत.”
उत्पत्ती 8:1-22 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परमेश्वराने नोआह आणि तारवातील सर्व पाळीव व वन्यप्राण्यांचे स्मरण केले. त्यांनी पृथ्वीवरून वाहण्यासाठी वारा पाठविला आणि पुराचे पाणी ओसरू लागले. पृथ्वीतलातील पाण्याचे झरे उफाळण्याचे थांबले आणि आकाशातील जलप्रलयाची दारे बंद झाली, आकाशातून पडणारा पाऊसही थांबला. पृथ्वीवरून पाणी सतत कमी होत गेले. दीडशे दिवस उलटल्यानंतर पाणी ओसरले. आणि सातव्या महिन्याच्या सतराव्या दिवशी तारू अरारात पर्वतावर स्थिरावले. पाणी ओसरू लागले व दहाव्या महिन्यापर्यंत पाणी सतत ओसरत होते आणि दहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पर्वतांची शिखरे दिसू लागली. आणखी चाळीस दिवसानंतर नोआहने तारवात बनविलेली खिडकी उघडली आणि त्याने एक कावळा बाहेर सोडला. तो पृथ्वीवरील सर्व पाणी ओसरेपर्यंत तारवातून येणे जाणे करीत होता. दरम्यान नोआहने एका कबुतराला, पृथ्वीवरील पाणी ओसरले की नाही हे पाहण्यासाठी बाहेर सोडले. परंतु ते कबुतर त्याच्याकडे परत आले, कारण अजूनही पाणी पृथ्वीवर बरेच वर असल्यामुळे त्याला उतरावयाला कुठेही जागा मिळाली नाही. म्हणून नोआहने आपला हात बाहेर काढून कबुतराला परत तारवात घेतले. आणखी सात दिवस थांबून नोआहने तारवातून ते कबुतर पुन्हा बाहेर सोडले. संध्याकाळी कबुतर जेव्हा त्याच्याकडे परत आले, तेव्हा त्याच्या चोचीत एक ताजे जैतुनाचे पान होते! मग नोआहला समजले की पृथ्वीवरून पाणी ओसरले आहे. मग आणखी सात दिवस थांबून त्याने ते कबुतर पुन्हा बाहेर सोडले, परंतु यावेळी ते परत आले नाही. नोआहच्या सहाशे एकाव्या वर्षी, पहिल्या वर्षाच्या, पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, पृथ्वीवरील पाणी वाळले. मग नोआहने तारवाचे दार उघडून बाहेर पाहिले, तेव्हा पृथ्वी कोरडी झाल्याचे त्याला दिसून आले. दुसर्या महिन्याच्या सत्ताविसाव्या दिवसापर्यंत पृथ्वी पूर्णपणे कोरडी झाली. मग परमेश्वराने नोआहला सांगितले, “तू आणि तुझी पत्नी, तुझे पुत्र व त्यांच्या पत्नी असे सर्वांनी तारवाच्या बाहेर यावे. प्रत्येक प्रकारचा सजीव प्राणी—पक्षी, पशू, सरपटणारे सर्व प्राणी—यांनाही बाहेर आणावे, म्हणजे त्यांची भरभराट होईल आणि ते फलद्रूप होऊन पृथ्वीवर बहुगुणित होतील.” मग नोआह, त्याचे पुत्र व त्याची पत्नी आणि पुत्रांच्या पत्नी हे तारूच्या बाहेर आले. यांच्याबरोबर पशू, सरपटणारे प्राणी व पक्षी—भूमीवर वावरणारे सर्वप्रकारचे प्राणी तारवातून उतरले. मग नोआहने याहवेहसाठी एक वेदी बांधली आणि त्याने शुद्ध पक्ष्यांतून काही आणि शुद्ध पशूतून काही घेतले आणि त्यांचे वेदीवर होमार्पण केले. तेव्हा याहवेह अर्पणाच्या सुगंधाने संतुष्ट झाले आणि आपल्या अंतःकरणात म्हणाले: “जरी लहानपणापासून मानवी हृदयाची प्रत्येक प्रवृत्ती वाईट आहे तरी मी मनुष्यामुळे जमिनीला पुन्हा कधी शाप देणार नाही आणि जसा मी केला आहे, तसा सर्व जिवंत प्राण्यांचा नाश यापुढे कधीही करणार नाही. “पृथ्वी अस्तित्वात आहे, तोपर्यंत वसंतॠतू व हंगामाचा काळ, थंडी व उष्णता, हिवाळा व उन्हाळा, दिवस व रात्र ही व्हावयाची थांबणार नाहीत.”