यिर्मया 7:1-11
यिर्मया 7:1-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
यिर्मयाला परमेश्वरापासून वचन प्राप्त झाले ते हे : “परमेश्वराच्या मंदिराच्या द्वारात उभा राहा व हे वचन जाहीर कर : यहूदाचे सर्व लोकहो, परमेश्वराचे भजनपूजन करण्यासाठी ह्या द्वारांनी आत जाता ते तुम्ही सर्व परमेश्वराचे वचन ऐका. सेनाधीश परमेश्वर; इस्राएलाचा देव म्हणतो, आपले मार्ग व आपली कृती सुधारा, म्हणजे ह्या स्थळी मी तुमची वस्ती करवीन. ‘हे परमेश्वराचे मंदिर, हे परमेश्वराचे मंदिर, हे परमेश्वराचे मंदिर’ असे बोलून लटक्या भाषणावर भिस्त ठेवू नका. जर तुम्ही आपले मार्ग व आपली कृती पूर्णपणे सुधाराल, माणसामाणसांत खरा न्याय कराल, परका, पोरका व विधवा ह्यांना जाचणार नाही, ह्या स्थळी निर्दोष रक्त पाडणार नाही आणि अन्य दैवतांचे अनुसरण करून आपली हानी करून घेणार नाही, तर जो देश, जे स्थळ तुमच्या पूर्वजांना मी युगानुयुग दिले आहे त्यात तुमची वस्ती होईल असे मी करीन. पाहा, ज्यांच्यापासून काही लाभ नाही असल्या लटक्या वचनांवर तुम्ही श्रद्धा ठेवता. हे काय? तुम्ही चोरी, खून, व्यभिचार करता, खोटी शपथ वाहता, बआलाच्या मूर्तीला धूप दाखवता व ज्यांना तुम्ही ओळखत नाही अशा अन्य देवांच्या मागे लागता आणि मग येऊन ज्या मंदिराला मी आपले नाम दिले आहे त्यात माझ्यासमोर उभे राहता व आमची मुक्ती झाली आहे म्हणून ही सर्व अमंगळ कृत्ये करण्यास आम्हांला हरकत नाही, असे मनात म्हणता. माझे नाम दिलेले हे मंदिर तुमच्या दृष्टीने लुटारूंची गुहा झाले आहे काय? पाहा, हे माझ्या लक्षात येऊन चुकले आहे, असे परमेश्वर म्हणतो.
यिर्मया 7:1-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
यिर्मयासाठी परमेश्वराकडून जे वचन आले ते असे, ते म्हणाले: यिर्मया, परमेश्वराच्या घराच्या दारात उभा राहा आणि हे वचन घोषीत कर! “हे यहूदातील लोकहो, जे तुम्ही सर्व परमेश्वराची उपासना करायला या दारातून आत जाता, ते तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका! सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, ‘तुम्ही आपली वाट नीट करा आणि चांगले ते करण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्ही असे केल्यास मी तुम्हास या ठिकाणी राहू देईन “परमेश्वराचे मंदिर, परमेश्वराचे मंदिर, परमेश्वराचे मंदिर हे आहे. असे खोटे बोलणाऱ्या वाईट गोष्टींस स्वत:स सोपवून देऊ नकोस. कारण जर तू आपला मार्ग नीट केलास आणि चांगले ते केलेस, जर तू शेजारी आणि मनुष्यांमध्ये पुर्णपणे न्याय केला, जर तू देशात राहणाऱ्याचे, अनाथाचे, आणि विधवेचे शोषण करणार नाहीस, आणि या स्थानात निर्दोष रक्त पाडणार नाहीस आणि स्वत:चे नुकसान करून घ्यायला इतर देवतांच्या मागे चालणार नाहीस, तर या स्थानात, जे राष्ट्र पुरातन काळी तुमच्या या पूर्वजांना मी सर्वकाळासाठी दिला होता, त्यामध्ये मी तुला राहू देईन. पाहा! तुम्ही फसव्या गोष्टींवर विश्वास ठेवत आहात, जे तुमची काहीएक मदत करु शकत नाही. तुम्ही चोरी, खून आणि व्यभिचार आणि खोटी शपथ वाहाल आणि बालमुर्तीस धूप जाळाल आणि ज्या देवांना तुम्ही जाणले नाही त्यांच्या मागे चालाल, मग ज्या घरात माझ्या नावाची घोषणा होते, तिथे तुम्ही येऊन माझ्या समोर उभे राहून असे म्हणाल का आम्ही तारले गेलो आहोत? म्हणजे तुम्ही हे सर्व घृणीत काम पुन्हा कराल. ज्या घराला माझे नाव आहे, ते तुमच्या दृष्टीने दुसरे काही नसून लुटारूंना लपण्याची जागा आहे का? पाहा, माझ्या दृष्टीस असे आले आहे, असे परमेश्वर म्हणतो.