लूक 17:1-10
लूक 17:1-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “ज्यामुळे लोक पाप करतील त्या येतीलच पण ज्याच्यामुळे ती येतात त्याची केवढी दुर्दशा होणार! त्याने या लहानातील एकाला पाप करावयास लावण्यापेक्षा त्याच्या गळ्यात जात्याची तळी बांधून त्यास समुद्रात टाकावे यामध्ये त्याचे हित आहे. स्वतःकडे लक्ष द्या! जर तुमचा भाऊ पाप करतो तर त्यास धमकावा आणि जर तो पश्चात्ताप करतो तर त्यास माफ करा. जर तो दिवसातून सात वेळा तुझ्याविरुद्ध पाप करतो आणि सात वेळा तुझ्याकडे येतो व म्हणतो, मी पश्चात्ताप करतो, तरीही तू त्यास माफ कर.” मग प्रेषित प्रभू येशूला म्हणाले, “आमचा विश्वास वाढव.” प्रभू येशू म्हणाला, “जर तुमचा विश्वास मोहरीच्या दाण्याएवढा असेल तर तुम्ही या तुतीच्या झाडाला म्हणू शकता, मुळासकट उपटून समुद्रात लावली जा. तर ते झाड तुमचे ऐकेल. तुमच्यापैकी असा कोण आहे की, त्याचा नांगरणारा किंवा मेंढरे राखणारा दास शेतातून आल्यावर तो त्यास म्हणेल, ‘आत्ताच येऊन जेवायला बस.’ उलट माझे जेवण तयार कर, ‘माझे खाणेपिणे होईपर्यंत कंबर बांधून माझी सेवा कर आणि मग तू खा व पी,’ असे तो त्यास म्हणणार नाही काय? ज्या गोष्टी करण्याबद्दल तुम्ही नोकराला हुकुम करता ते केल्याबद्दल तुम्ही त्यास धन्यवाद म्हणता का? तुमच्या बाबतीतही तसेच आहे. जेव्हा तुम्हास करण्यास सांगितलेली सर्व कामे केल्यावर तुम्ही असे म्हणले पाहिजे, आम्ही कोणत्याही मानास लायक नसलेले नोकर आहोत आम्ही फक्त आमचे कर्तव्य केले आहे.”
लूक 17:1-10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशू आपल्या शिष्यांना म्हणाले, “लोकांना अडखळण होतील अशा गोष्टी निश्चितच येतीलच, परंतु ज्याच्याद्वारे अडखळण येईल, त्याचा धिक्कार असो. जो कोणी या लहानातील एकालाही अडखळण करतो, त्याच्या गळ्यात जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात फेकून द्यावे हे त्याच्या अधिक हिताचे ठरेल. म्हणूनच तुम्ही स्वतःला सांभाळा. “तुझ्या भावाने किंवा बहिणीने पाप केले, तर त्यांचा निषेध कर आणि त्यांनी पश्चात्ताप केला, तर त्यांना क्षमा कर. त्याने दिवसातून सात वेळा तुझ्याविरुद्ध पाप केले आणि सात वेळा परत क्षमेची याचना करून म्हटले ‘मी पश्चात्ताप केला आहे,’ तर तू त्याला क्षमा कर.” एके दिवशी शिष्य प्रभूला म्हणाले, “आमचा विश्वास वाढवा.” प्रभू येशूंनी उत्तर दिले, “तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्याएवढा जरी विश्वास असला, तरी या तुतीच्या झाडाला म्हणाल की ‘तू उपटून समुद्रात लावला जा,’ तरी ते तुमची आज्ञा पाळील. “समजा, तुमच्यापैकी एकाजवळ शेत नांगरण्यासाठी किंवा मेंढरे राखण्यासाठी एक नोकर आहे. आपला नोकर शेतावरून आल्यानंतर, ‘ये, भोजनास बस,’ असे त्याचा धनी त्याला म्हणेल काय? याउलट तो असे म्हणणार नाही का, ‘माझे भोजन तयार कर, स्वतः तयार हो आणि मी खात आणि पीत असताना माझी सेवा कर, त्यानंतर तू खा आणि पी’? सांगितलेले काम केल्याबद्दल तो आपल्या दासाचे आभार मानेल काय? अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला सांगितलेले सर्व काम केल्यानंतर, ‘आम्ही अपात्र दास आहोत, आम्ही फक्त आमचे कर्तव्य बजावले आहे, असे म्हणा.’ ”
लूक 17:1-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग त्याने शिष्यांना म्हटले, “अडखळणे येऊ नयेत हे अशक्य आहे; परंतु ज्याच्यामुळे ती येतात त्याची केवढी दुर्दशा होणार! त्याने ह्या लहानांतील एकाला अडखळण करावे ह्यापेक्षा त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात टाकावे ह्यात त्याचे हित आहे. तुम्ही स्वत: सांभाळा. तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर त्याचा दोष त्याला दाखव आणि त्याने पश्चात्ताप केला तर त्याला क्षमा कर. त्याने दिवसातून सात वेळा तुझा अपराध केला आणि सात वेळा तुझ्याकडे परत येऊन, ‘मला पश्चात्ताप झाला आहे,’ असे म्हटले तरी त्याला क्षमा कर.” मग प्रेषित प्रभूला म्हणाले, “आमचा विश्वास वाढवा.” प्रभू म्हणाला, “तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असेल, तर ह्या तुतीला, ‘तू मुळांसकट उपटून समुद्रात लावली जा,’ असे तुम्ही सांगताच ती तुमचे ऐकेल. तुमच्यापैकी असा कोण आहे की, त्याचा नांगरणारा किंवा मेंढरे राखणारा दास शेतातून आल्यावर तो त्याला म्हणेल, ‘आताच येऊन जेवायला बस.’ उलट ‘माझे जेवण तयार कर, माझे खाणेपिणे होईपर्यंत कंबर बांधून माझी सेवा कर, आणि मग तू खा व पी,’ असे तो त्याला म्हणणार नाही काय? सांगितलेली कामे दासाने केली म्हणून तो त्याचे उपकार मानतो काय? त्याप्रमाणे तुम्हांला सांगितलेली सर्व कामे केल्यावर आम्ही निरुपयोगी दास आहोत, आम्ही आमचे कर्तव्य केले आहे, असे म्हणा.”
लूक 17:1-10 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
येशूने शिष्यांना म्हटले, “लोकांना पापाला प्रवृत्त करण्याऱ्या गोष्टी घडणार, पण ज्याच्यामुळे त्या घडतात त्याला केवढे क्लेश होणार! त्याने ह्या लहानांतील एकाला पापासाठी प्रवृत्त करावे, ह्यापेक्षा त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात फेकावे, ह्यात त्याचे हित आहे. तू स्वतःला सांभाळ. तुझ्या भावाने अपराध केला, तर त्याचा दोष त्याला दाखवून त्याची कानउघाडणी कर आणि त्याने पश्चात्ताप केला तर त्याला क्षमा कर. त्याने दिवसातून सात वेळा तुझ्याविरुद्ध अपराध केला आणि सात वेळा तुझ्याकडे परत येऊन, मला पश्चात्ताप झाला आहे, असे म्हटले, तरी तू त्याला क्षमा करायला हवी.” प्रेषित प्रभूला म्हणाले, “आमचा विश्वास वाढव.” प्रभू म्हणाला, “तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असेल, तर ह्या तुतीच्या झाडाला ‘तू मुळासकट उपटून समुद्रात लावले जा’, असे तुम्ही सांगताच ते तुमचे ऐकेल. तुमच्यापैकी असा कोण आहे की, त्याचा नांगरणारा किंवा मेंढरे राखणारा नोकर शेतातून आल्यावर तो त्याला म्हणेल, ‘लवकर येऊन जेवायला बस?’ किंबहुना ‘माझे जेवण तयार कर. माझे खाणेपिणे होईपर्यंत कमरेभोवती बाह्यवस्त्र बांधून माझी सेवा कर आणि मग तू खा व पी’, असे तो त्याला म्हणणार नाही काय? सांगितलेली कामे नोकराने केली म्हणून तो त्याचे आभार मानतो काय? त्याप्रमाणे तुम्हांला सांगितलेली सर्व कामे केल्यावर, ‘आम्ही अपात्र नोकर आहोत, आम्ही फक्त आमचे कर्तव्य केले आहे’, असे म्हणा.”