लूक 18:1-8
लूक 18:1-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
निराश न होता नेहमी प्रार्थना कशी करावी हे शिष्यांनी शिकावे म्हणून त्याने त्यांना एक दाखला सांगितला. तो म्हणाला, “एका नगरात एक न्यायाधीश होता. तो देवाला भीत नसे व लोकांचीही भीड धरीत नसे. त्या नगरात एक विधवा होती. ती नेहमी येऊन न्यायधिशाला म्हणत असे, ‘माझ्या विरोधकांविरुद्ध माझा न्याय करा!’ त्याची इच्छा काही काळ नव्हती पण शेवटी तो मनात म्हणाला, ‘मी जरी देवाला भीत नाही व लोकांस मान देत नाही, तरीही विधवा मला त्रास देते म्हणून मी तिचा न्याय करीन, नाही तर ती नेहमी येऊन मला अगदी त्रासून सोडेल.” मग प्रभू म्हणाला, “लक्ष्य द्या अन्यायी न्यायाधीश काय म्हणाला. आणि मग जे देवाचे निवडलेले लोक दिवसरात्र त्याचा धावा करतात त्यांचा तो न्याय करणार नाही काय? तो त्यांना मदत करण्यास वेळ लावेल का? मी तुम्हास सांगतो, तो त्यांचा न्याय लवकर करील, तरीही जेव्हा मनुष्याचा पुत्र येईल, तेव्हा त्यास पृथ्वीवर विश्वास आढळेल काय?”
लूक 18:1-8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
नंतर येशूंनी आपल्या शिष्यांना सतत प्रार्थना करावी व ती ही चिकाटीने करावी यासाठी एक दाखला सांगितला. येशू म्हणाले, “एका शहरात परमेश्वराचे भय न बाळगणारा आणि कोणाची पर्वा न करणारा एक न्यायाधीश होता. त्या शहरातील एक विधवा आपली विनंती घेऊन वारंवार त्या न्यायाधीशाकडे येऊन म्हणत असे, ‘माझ्या शत्रूपासून मला न्याय द्या.’ “त्याने काही काळ लक्ष दिले नाही, परंतु शेवटी तो स्वतःशीच म्हणाला, ‘मी परमेश्वराला भीत नाही किंवा लोक काय म्हणतील याची काळजी करीत नाही, पण ही विधवा मला एकसारखी त्रास देत आहे. म्हणून तिला न्याय मिळाला पाहिजे, कारण ती सारखी येऊन मला त्रास करीत आहे!’ ” नंतर प्रभू म्हणाले, “अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका. तर परमेश्वराचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्यांना विनवण्या करतात, त्या लोकांना ते न्याय देणार नाहीत काय? ते त्यांच्यासंबंधी उशीर करतील काय? मी तुम्हाला सांगतो, ते त्यांना लवकर न्याय मिळेल याकडे लक्ष लावतील. यासाठी, जेव्हा मानवपुत्र परत येईल त्यावेळी त्यांना या पृथ्वीवर विश्वास आढळेल का?”
लूक 18:1-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये, ह्याविषयी त्याने त्यांना एक दाखला सांगितला. तो म्हणाला, “एका नगरात कोणीएक न्यायाधीश होता, तो देवाला भीत नसे व माणसाला जुमानत नसे; आणि त्याच नगरात एक विधवा होती, ती त्याच्याकडे वारंवार येऊन म्हणत असे की, ‘माझी दाद घ्या व माझ्या प्रतिवाद्यांविरुद्ध न्याय करा.’ पण काही काळपर्यंत तो ते करीना; परंतु नंतर त्याने मनात म्हटले, ‘जरी मी देवाला भीत नाही व माणसाला जुमानत नाही, तरी ही विधवा मला त्रास देते म्हणून मी तिचा न्याय करीन, नाहीतर ती नेहमी येऊन मला अगदी रंजीस आणील.”’ तेव्हा प्रभूने म्हटले, “अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका. तर देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात त्यांचा तो न्याय करणार नाही काय? आणि त्यांच्याविषयी तो विलंब लावील काय? मी तुम्हांला सांगतो, तो त्यांचा न्याय लवकर करील; तरी मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय?”
लूक 18:1-8 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
शिष्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये, ह्याविषयी येशूने त्यांना एक दाखला सांगितला. तो असा: ‘एका नगरात एक न्यायाधीश होता, तो देवाला भीत नसे व माणसाला जुमानीत नसे. त्याच नगरात एक विधवा होती. ती त्याच्याकडे वारंवार येऊन आर्जवून विनंती करत असे, ‘माझ्याकडे लक्ष द्या; माझ्या प्रतिवाद्याविरुद्ध न्याय करा.’ काही काळपर्यंत तो ते करीना, परंतु नंतर त्याने मनात म्हटले, ‘जरी मी देवाला भीत नाही व माणसाला जुमानीत नाही, तरी ही विधवा मला भंडावून सोडते म्हणून मी तिचा न्याय करीन, नाही तर ती नेहमी येऊन माझा जीव खाईल.’” प्रभूने म्हटले, “दुष्ट न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका. तर मग देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात, त्यांचा तो न्याय करणार नाही काय? त्यांच्याविषयी तो विलंब लावील काय? मी तुम्हांला सांगतो, तो त्यांचा न्याय लवकर करील. तथापि मनुष्याचा पुत्र येईल, तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय?”