लूक 20:27-47
लूक 20:27-47 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग पुनरुत्थान नाही असे म्हणणारे काही सदूकी त्याच्याकडे आले. त्यांनी त्यास प्रश्न विचारला. ते म्हणाले, “गुरुजी मोशेने आमच्यासाठी लिहून ठेवले आहे की जर एखाद्याचा भाऊ मरण पावला व त्या भावाला पत्नी आहे पण मूल नाही, तर त्याच्या भावाने त्या विधवेशी लग्न करावे आणि भावासाठी त्यास मुले व्हावीत. सात भाऊ होते. पहिल्या भावाने लग्न केले व तो मूल न होता मरण पावला. नंतर दुसऱ्या भावाने तिच्याशी लग्न केले. नंतर तिसऱ्याने तिच्याशी लग्न केले. सातही भावांबरोबर तीच गोष्ट घडली. कोणालाही मुले न होता ते मरण पावले. नंतर ती स्त्रीही मरण पावली. तर मग पुनरुत्थानाच्या वेळी ती कोणाची पत्नी होईल? कारण त्या सातांनीही तिच्याबरोबर लग्न केले होते.” तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “या युगातले लोक लग्न करून घेतात व लग्न करून देतात. परंतु जे लोक त्या येणाऱ्या युगामध्ये व मृतांच्या पुनरुत्थानामध्ये भाग घेण्यासाठी पात्र ठरतील, ते लग्न करून घेणार नाहीत आणि लग्न करून देणार नाहीत आणि ते मरणार नाहीत, कारण ते देवदूतासारखे आहेत. ते पुनरुत्थानाचे पुत्र असल्यामुळे ते देवाचे पुत्रही आहेत. जळत्या झुडुपाविषयी मोशेने लिहिले, तेव्हा त्याने परमेश्वरास ‘अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव आणि याकोबाचा देव’ असे म्हणले व मरण पावलेलेसुद्धा उठवले जातात हे दाखवून दिले. देव मरण पावलेल्यांचा नाही तर जिवंतांचा देव आहे. सर्व लोक जे त्याचे आहेत ते जिवंत आहेत.” तेव्हा काही नियमशास्त्राचे शिक्षक म्हणाले, “गुरुजी, उत्तम बोललात.” मग त्यास आणखी प्रश्न विचारण्याचे धाडस कोणी केले नाही. परंतु तो त्यांना म्हणाला, “ख्रिस्त दावीदाचा पुत्र आहे असे ते कसे म्हणतात? कारण दावीद स्वतः स्तोत्राच्या पुस्तकात म्हणतो, ‘परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले, मी तुझ्या शत्रूला तुझ्या पादासन करीत नाही तोपर्यंत तू माझ्या उजवीकडे बस,’ अशा रीतिने दावीद त्यास प्रभू म्हणतो, तर मग ख्रिस्त दावीदाचा पुत्र कसा?” सर्व लोक हे ऐकत असतांना तो शिष्यांना म्हणाला, “नियमशास्त्राच्या शिक्षकांविषयी सावध असा, त्यांना लांब झगे घालून फिरणे आवडते, त्यांना बाजारात नमस्कार घेण्यास, सभास्थानात महत्त्वाच्या आसनावर व मेजवानीच्या वेळी मानाच्या जागी बसणे आवडते. ते विधवांची घरे खाऊन फस्त करतात आणि देखाव्यासाठी लांब लांब प्रार्थना करतात. या मनुष्यांना अत्यंत वाईट शिक्षा होईल.”
लूक 20:27-47 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पुनरुत्थान नाही असे मानणार्या सदूकी लोकांपैकी काहीजण येशूंकडे आले आणि त्यांनी त्यांना विचारले, “गुरुजी, मोशेने आम्हासाठी असे लिहिले आहे की, एखादा मनुष्य मूलबाळ न होता मरण पावला, तर त्याच्या भावाने त्याच्या विधवेशी विवाह करून त्याच्यासाठी संतती वाढवावी. आता एका कुटुंबात सात भाऊ होते. त्यातील पहिल्याने लग्न केले पण काही मूलबाळ न होता, तो मरण पावला. मग दुसर्या आणि तिसर्यानेही तिच्याशी लग्न केले आणि याप्रमाणे ते सातही भाऊ संतान न होताच मरण पावले. शेवटी ती स्त्री मरण पावली. आता पुनरुत्थान होईल त्यावेळी ती स्त्री कोणाची पत्नी होईल, कारण त्या सातही जणांनी तिच्याशी लग्न केले होते?” येशूंनी उत्तर दिले, “लग्न करण्याची रीत या पृथ्वीवरील लोकांसाठीच आहे. तरी, त्या युगात वाटेकरी होण्यासाठी आणि जे मृतांतून पुनरुत्थित होणार आहेत, ते लग्न करत नाही किंवा लग्न करूनही देत नाही. आणि ते मरणार नाहीत, कारण ते देवदूतांसारखे आहेत. ती परमेश्वराची लेकरे आहेत, कारण ती पुनरुत्थानाची लेकरे झाली आहेत. मोशेच्या जळत्या झुडूपांच्या निवेदनात, तो प्रभूला ‘अब्राहामाचा परमेश्वर, इसहाकाचा परमेश्वर आणि याकोब यांचा परमेश्वर आहे’ असे म्हणतो यावरून त्याने हेच दर्शविले आहे की, मेलेले उठविले जातात. कारण ते मृतांचे परमेश्वर नसून, जिवंतांचे परमेश्वर आहेत आणि त्यांच्या दृष्टीने सर्व लोक जिवंत आहेत.” काही नियमशास्त्र शिक्षकांनी प्रतिसाद दिला, “गुरुजी, आपण फार योग्य उत्तर दिले.” मग कोणी त्यांना आणखी प्रश्न विचारावयास धजले नाहीत. नंतर येशूंनी त्यांना एक प्रश्न विचारला, “ख्रिस्त हा दावीदाचा पुत्र आहे असे का म्हटले जाते? कारण दावीदाने स्वतः स्तोत्रांच्या पुस्तकात म्हटले आहे: “ ‘प्रभू माझ्या प्रभूला म्हणाले, “मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायाखाली ठेवीपर्यंत माझ्या उजव्या हाताला बसून राहा.” ’ दावीदच ख्रिस्ताला ‘प्रभू’ म्हणतो तर तो त्याचा पुत्र कसा असू शकेल?” सभोवतालचा लोकसमुदाय हे ऐकत असतानाच ते आपल्या शिष्यांकडे वळून त्यांना म्हणाले, “या नियमशास्त्राच्या शिक्षकांपासून सावध राहा. त्यांना लांब झगे घालून बाजारात लोकांकडून आदरपूर्वक अभिवादन घेणे, सभागृहामध्ये आणि मेजवान्यामध्ये उत्तम व मानाच्या जागा मिळविणे प्रिय आहे. ते देखाव्यासाठी लांबलचक प्रार्थना करतात आणि विधवांची घरे लुबाडतात. अशा लोकांना अधिक शिक्षा होईल.”
लूक 20:27-47 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नंतर, ‘पुनरुत्थान नाही’ असे म्हणणार्या सदूक्यांतून कित्येकांनी जवळ येऊन त्याला विचारले, “गुरूजी, मोशेने आमच्यासाठी असे लिहून ठेवले आहे की, ‘एखाद्याचा भाऊ’ आपली बायको जिवंत असता ‘निःसंतान असा मेला तर त्याच्या भावाने त्या स्त्रीबरोबर विवाह करून आपल्या भावाचा वंश चालवावा.’ बरे, सात भाऊ होते; त्यांच्यातील पहिल्या भावाने बायको केली व तो निःसंतान असा मेला. मग दुसर्याने ती केली व तो निःसंतान असा मेला. मग तिसर्यानेही; ह्याप्रमाणे ते सातही निःसंतान असे मेले; शेवटी ती स्त्रीही मेली. तर पुनरुत्थानसमयी ती त्यांच्यापैकी कोणाची बायको होईल? कारण ती त्या सातांचीही बायको झाली होती.” येशूने त्यांना म्हटले, “ह्या युगातले लोक लग्न करून घेतात व लग्न करून देतात; परंतु ते युग व मेलेल्यांतून पुनरुत्थान हे प्राप्त करून घेण्यास जे योग्य ठरतील ते लग्न करून घेणार नाहीत व लग्न करून देणारही नाहीत; आणि ते पुढे मरणारही नाहीत, कारण ते देवदूतांसमान आहेत आणि पुनरुत्थान पावलेले असल्यामुळे ते देवाचे पुत्र आहेत. पण मोशेनेही झुडपाच्या वृत्तान्तात, परमेश्वराला ‘अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव’ असे म्हणून मेलेले उठवले जातात हे दर्शवले आहे. तो मृतांचा देव नव्हे, तर जिवंतांचा आहे; कारण त्याला सर्वच जिवंत आहेत.” तेव्हा शास्त्र्यांतील कित्येकांनी म्हटले, “गुरूजी, ठीक बोललात.” मग ते त्याला आणखी काहीही विचारण्यास धजले नाहीत. त्यावर त्याने त्यांना म्हटले, “ख्रिस्त दाविदाचा पुत्र आहे असे कसे म्हणतात? कारण दावीद स्वत: स्तोत्रांच्या पुस्तकात म्हणतो, ‘परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले, मी तुझ्या शत्रूंचे तुझ्या पायांसाठी आसन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बस.’ दावीद त्याला प्रभू म्हणतो, मग तो त्याचा पुत्र कसा?” तेव्हा सर्व लोक ऐकत असता त्याने आपल्या शिष्यांना म्हटले, “शास्त्र्यांसंबंधाने सावध असा; त्यांना लांबलांब झगे घालून मिरवण्यास हवे असते; बाजारांत नमस्कार, सभास्थानांत मुख्य आसने व मेजवान्यांत मुख्य मुख्य जागा त्यांना आवडतात; ते विधवांची घरे गिळंकृत करतात आणि ढोंगाने लांबलचक प्रार्थना करतात; त्यांना अधिक शिक्षा होईल.”
लूक 20:27-47 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
पुनरुत्थान नाही, असे म्हणणाऱ्या सदुक्यांतून कित्येकांनी जवळ येऊन येशूला विचारले, ‘गुरुवर्य, मोशेने आमच्यासाठी असे लिहून ठेवले आहे की, एखाद्याचा भाऊ त्याची पत्नी जिवंत असता निःसंतान निधन पावला तर त्याच्या भावाने त्या स्त्रीबरोबर विवाह करून त्याच्या भावाचा वंश चालवावा. एके ठिकाणी सात भाऊ राहत होते, त्यांच्यातील पहिल्या भावाने लग्न केले व तो निःसंतान मरण पावला. मग दुसऱ्याने तिच्याबरोबर विवाह केला व तिसऱ्यानेदेखील. ह्याप्रमाणे ते सातही निःसंतान असे निधन पावले. शेवटी ती स्त्रीदेखील देवाघरी गेली. तर पुनरुत्थानसमयी ती त्यांच्यापैकी कोणाची पत्नी होईल; ती तर त्या सातांचीही पत्नी झाली होती.” येशूने त्यांना म्हटले, “ह्या युगातले लोक लग्न करून घेतात व लग्न लावून देतात. परंतु त्या युगासाठी व मेलेल्यांतून पुनरुत्थान प्राप्त करून घेण्यासाठी जे योग्य ठरतील, ते लग्न करणार नाहीत व लग्न लावून देणार नाहीत. खरे म्हणजे ते पुढे मरू शकत नाहीत कारण ते देवदूतांसमान आहेत आणि पुनरुत्थान पावलेले असल्यामुळे ते देवाचे पुत्र आहेत. मोशेनेदेखील झुडुपांच्या गोष्टीत प्रभूला अब्राहामचा परमेश्वर, इसहाकचा परमेश्वर याकोबचा परमेश्वर असे म्हणून मेलेले उठवले जातात, हे दर्शविले आहे. तो मृतांचा नव्हे, तर जिवंतांचा परमेश्वर आहे कारण त्याला सर्वच जिवंत आहेत.” हे ऐकून शास्त्र्यांतील कित्येकांनी म्हटले, “गुरुजी, आपण ठीक बोललात.” त्यानंतर ते त्याला आणखी काहीही विचारायला धजले नाहीत. त्यानंतर येशूने त्यांना विचारले, “लोक ख्रिस्त दावीदचा पुत्र आहे, असे कसे म्हणतात? कारण दावीद स्वतः स्तोत्रांच्या पुस्तकात म्हणतो: प्रभूने माझ्या प्रभूला सांगितले, ‘मी तुझ्या शत्रूंचे तुझ्या पायांसाठी आसन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बस.’ दावीद अशा प्रकारे त्याला प्रभू म्हणतो, मग तो त्याचा पुत्र कसा?” सर्व लोक ऐकत असता त्याने त्याच्या शिष्यांना म्हटले, “शास्त्री लोकांविषयी सावध असा, त्यांना लांब लांब झगे घालून मिरवायची हौस असते. बाजारात नमस्कार, सभास्थानांत मुख्य आसने व मेजवानीत सन्मानाच्या जागा त्यांना आवडतात. ते विधवांची घरे गिळंकृत करतात. लोकांना दाखवण्याच्या उद्देशाने लांबलचक प्रार्थना करतात. त्यांना अधिक शिक्षा होईल.”