बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 4:13-22 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 4:13-22 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

आणि नासरेथ सोडून जबुलून व नफताली ह्यांच्या हद्दीत असलेल्या समुद्रकिनार्‍यावरील कफर्णहूमास जाऊन राहिला; हे अशासाठी की, यशया संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे; ते असे की, “जबुलून प्रांत व नफताली प्रांत, समुद्रकिनार्‍यावरचा, यार्देनेच्या पलीकडचा, परराष्ट्रीयांचा गालील - अंधकारात बसलेल्यांवर प्रकाशाचा उदय झाला आहे आणि मृत्यूच्या प्रदेशात व छायेत बसलेल्यांवर ज्योती उगवली आहे.” तेव्हापासून येशू घोषणा करत सांगू लागला की, “पश्‍चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.” नंतर गालील समुद्राजवळून येशू चालला असताना त्याने पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया ह्या दोघा भावांना समुद्रात पाग टाकताना पाहिले; कारण ते मासे धरणारे होते. त्याने त्यांना म्हटले, “माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हांला माणसे धरणारे करीन.” लगेच ते जाळी सोडून देऊन त्याला अनुसरले. तेथून पुढे गेल्यावर त्याने दुसरे दोघे भाऊ म्हणजे जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान ह्यांना आपला बाप जब्दी ह्याच्याबरोबर तारवात आपली जाळी नीट करताना पाहिले, आणि त्याने त्यांना बोलावले. मग लगेच ते तारू व आपला बाप ह्यांना मागे सोडून त्याला अनुसरले.

सामायिक करा
मत्तय 4 MARVBSI

मत्तय 4:13-22 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

नासरेथ सोडून जबुलून व नफताली यांच्या सीमेतील, गालीलच्या सरोवराच्या कफर्णहूमात तो जाऊन राहिला. यशया संदेष्ट्याने पूर्वी जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे यासाठी हे झाले. ते असे होते की, “जबुलून आणि नफताली हा प्रांत, सरोवराच्या किनाऱ्यावरील, यार्देनेच्या पलीकडील प्रदेश व परराष्ट्रीय गालील जे लोक काळोखांत बसत होते त्यांनी, मोठा प्रकाश पाहिला. मरणाचे सावट असलेल्या सावलीत दव प्रदेशात राहणाऱ्या लोकांवर, ज्योति उदय पावली आहे.” तेव्हापासून येशूने उपदेश करणे सुरु केले व तो म्हणू लागला की; “पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य तुमच्या जवळ आले आहे.” नंतर तो गालीलच्या सरोवराजवळून जात असता, पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया या दोघांना त्याने जाळे टाकतांना पाहिले कारण ते मासे पकडणारे होते. येशू त्यांना म्हणाला, “माझ्यामागे या, म्हणजे मी तुम्हास माणसे धरणारे करीन.” मग ते लगेचच जाळे सोडून देऊन त्याच्यामागे चालू लागले. येशू तेथून पुढे चालत जात असता त्याने दुसरे दोघे भाऊ; जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान यांना त्यांचे वडील जब्दी याच्याबरोबर होडीत पाहीले. ते जाळे नीट करत होते. त्याने त्यांना बोलावले, तेव्हा ते दोघेही लगेचच आपली होडी व आपले वडील यांना सोडून त्याच्यामागे गेले.

सामायिक करा
मत्तय 4 IRVMAR

मत्तय 4:13-22 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

आणि नासरेथ सोडून जबलून व नफताली ह्यांच्या हद्दीत असलेल्या समुद्रकिनाऱ्यावरील कफर्णहूमास जाऊन राहिला. हे अशासाठी झाले की, यशया संदेष्ट्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. ते असे: जबलून प्रांत व नफताली प्रांत, समुद्रकिनाऱ्यावरचा, यार्देनच्या पलीकडचा, परराष्ट्रीयांचा गालील! अंधकारात बसलेल्यांनी महान प्रकाश पाहिला आहे आणि मृत्यूच्या प्रदेशात व छायेत वस्ती करणाऱ्या लोकांवर प्रकाश उदय पावला आहे. तेव्हापासून येशू त्याच्या संदेशाची घोषणा करू लागला, “पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.” येशू गालील समुद्राजवळून चालला असताना त्याने पेत्र ऊर्फ शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया ह्या दोघा भावांना समुद्रात जाळे टाकताना पाहिले. कारण ते कोळी होते. त्याने त्यांना म्हटले, “माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हांला माणसे धरणारे करीन.” ते लगेच त्यांची जाळी सोडून त्याच्यामागे निघाले. तेथून पुढे गेल्यावर त्याने दुसरे दोघे भाऊ म्हणजे, जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान ह्यांना त्यांच्या वडिलांबरोबर तारवात त्यांची जाळी नीट करताना पाहिले. येशूने त्यांनाही बोलावले. त्यांच्या वडिलांना तारवात सोडून ते येशूच्या मागे गेले.

सामायिक करा
मत्तय 4 MACLBSI

मत्तय 4:13-22 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

नासरेथ सोडल्यानंतर जबुलून व नफताली या प्रांताजवळ असलेल्या सरोवराच्या किनार्‍यावरील कफर्णहूम येथे गेले. या घटनेने संदेष्टा यशायाह याने केलेले भाकीत पूर्ण झाले. ते असे: “जबुलून प्रांत आणि नफताली प्रांत, समुद्राच्या मार्गावरचा आणि यार्देनेच्या पलीकडचा प्रांत, गैरयहूदीयांचा गालील प्रांत— अंधारात राहणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला; मृत्युछायेच्या दरीत बसलेल्यांवर प्रकाश उदय पावला आहे.” तेव्हापासून येशूंनी उपदेश करण्यास सुरुवात केली, “पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.” येशू गालील सरोवराच्या जवळून चालत असताना, त्यांनी शिमोन ज्याचे नाव पेत्र असेही होते आणि त्याचा भाऊ आंद्रिया यांना पाहिले. ते सरोवरात जाळे टाकीत होते, कारण ते मासे धरणारे होते. येशू त्यांना म्हणाले, “चला माझ्यामागे या, म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करेन.” लगेच त्यांनी त्यांची जाळी सोडली आणि ते त्यांच्यामागे गेले. किनार्‍यावरून पुढे गेल्यावर त्यांनी आणखी दोन भाऊ, म्हणजे जब्दीचे पुत्र, याकोब आणि त्याचा भाऊ योहानला पाहिले. ते आपल्या वडिलांसह होडीत बसून आपली जाळी तयार करत होते. येशूंनी त्यांनाही हाक मारून बोलाविले, आणि ताबडतोब त्यांनी नाव व आपला पिता यांना सोडून त्यांच्यामागे गेले.

सामायिक करा
मत्तय 4 MRCV