प्रकटी 4:1-11
प्रकटी 4:1-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ह्यानंतर मी पाहिले तो पाहा, स्वर्गात एक दरवाजा माझ्यासमोर उघडलेला दिसला आणि अगोदर जसा आवाज मी माझ्याशी बोलताना ऐकला होता तसाच आवाज मी ऐकला. तो आवाज कर्ण्याच्या आवाजासारखा होता. तो म्हणाला, “इकडे वर ये आणि मी तुला यानंतर जे घडणार आहे ते दाखवितो.” त्याच क्षणी आत्म्याने माझा ताबा घेतला. तेथे स्वर्गात माझ्यासमोर राजासन होते कोणीएक त्यावर बसला होता. त्यावर जो बसला होता तो यास्फे व सार्दी या रत्नांसारखा होता आणि राजासनाभोवती पाचूसारखे दिसणारे मेघधनुष्य होते. राजासनाभोवती चोवीस आसने होती आणि त्या आसनांवर शुभ्र कपडे घातलेले व डोक्यावर सोन्याचा मुकुट असलेले चोवीस वडील बसले होते. राजासनापासून विजा, वाणी व मेघगर्जना निघत होत्या. राजासनासमोर सात दिवे जळत होते. ते देवाचे सात आत्मे होते. तसेच राजासनासमोर काचेच्या समुद्रासारखे काहीतरी दिसत होते. ते स्फटिकासारखे स्पष्ट होते. मध्यभागी व राजासनाभोवती चार जिवंत प्राणी होते आणि ते मागून पुढून डोळ्यांनी पूर्ण भरलेले होते. पहिला जिवंत प्राणी सिंहासारखा होता दुसरा बैलासारखा होता तिसऱ्याचा चेहरा मनुष्यासारखा होता, आणि चौथा उडत्या गरुडासारखा होता. त्या प्रत्येक जिवंत प्राण्याला सहा पंख होते व त्यांना सगळीकडे डोळे होते, त्यांच्या पंखावर आणि आतून डोळे होते, दिवस व रात्र न थांबता ते म्हणत होते. “‘पवित्र, पवित्र, पवित्र, हा प्रभू देव सर्वसमर्थ,’ जो होता, जो आहे आणि जो येणार आहे.” जो राजासनावर बसलेला आहे तो अनंतकाळपर्यंत जिवंत राहणार आहे त्याचे जेव्हा जेव्हा ते चार जिवंत प्राणी गौरव, सन्मान व उपकारस्तुती करीत होते, तेव्हा तेव्हा ते चोवीस वडील जो राजासनावर बसला आहे त्याच्यापुढे पालथे पडतात आणि जो युगानुयुग जिवंत आहे त्यास नमन करतात आणि आपले मुकुट राजासनासमोर ठेवून म्हणतात “हे प्रभू, आमच्या देवा, तू गौरव, सन्मान आणि सामर्थ्य प्राप्त करून घेण्यास योग्य आहेस, तू सर्व गोष्टी उत्पन्न केल्यास, कारण तू सर्वकाही अस्तित्वात आणले आणि तुझ्या इच्छेमुळे ते झाले आणि उत्पन्न केले.”
प्रकटी 4:1-11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
यानंतर मी पाहिले, आणि माझ्यापुढे स्वर्गात एक दार उघडलेले मला दिसले आणि जी वाणी मी प्रथम ऐकली होती व जी रणशिंग ध्वनीसारखी होती, ती म्हणाली, “इकडे वर ये, म्हणजे ज्यागोष्टी यानंतर घडणार आहेत त्या मी तुला दाखवेन” मी लगेच आत्म्यात संचारलो, आणि माझ्यापुढे स्वर्गात एक राजासन ठेवलेले होते व त्यावर एकजण बसला होता. आणि जो तिथे बसला होता तो हिर्यासारखा व माणकाच्या रत्नासारखा दिसत होता; त्या राजासनाच्या सभोवताली एक पाचूसारखे दिसणारे मेघधनुष्य होते; राजासनाभोवती चोवीस सिंहासने होती आणि त्यावर शुभ्र वस्त्रे परिधान केलेले व डोक्यावर सोन्याचे मुकुट घातलेले चोवीस वडीलजन बसलेले होते. राजासनापासून विजा चमकत होत्या. आणि मेघगर्जनांचा आवाज ऐकू येत होता. राजासनासमोर परमेश्वराच्या सात आत्म्यांचे प्रतीक असलेले सात दीप तेवत होते. त्याचप्रमाणे राजासनापुढे स्फटिकासारखे स्वच्छ आणि काचेच्या समुद्रासारखे दिसणारे असे काहीतरी होते. राजासनाच्या मध्यभागी व राजासनाच्या भोवताली चार जिवंत प्राणी होते; त्यांना पुढे आणि मागे अंगभर डोळे होते. या प्राण्यांपैकी पहिला प्राणी सिंहासारखा, दुसरा बैलासारखा, तिसरा जो होता त्याचा चेहरा मनुष्याच्या मुखासारखा व चौथा प्राणी उडत्या गरुडासारखा होता. त्या चारही सजीव प्राण्यांना प्रत्येकाला सहा पंख होते. त्यांच्या पंखांभोवती आतून बाहेरून सर्वत्र डोळे होते. ते अहोरात्र अखंडपणे बोलत होते: “पवित्र, पवित्र, पवित्र, ते सर्वसमर्थ प्रभू परमेश्वर आहेत! जे होते, जे आहेत आणि जे येणार आहेत.” जे राजासनावर बसलेले आहेत आणि जे युगानुयुग जिवंत आहेत, त्यांचा त्या सजीव प्राण्यांनी ज्या ज्यावेळी गौरव केला, त्यांना बहुमान दिला आणि त्यांची उपकारस्तुती केली, त्या त्यावेळी त्या चोवीस वडीलजनांनी त्या सर्वकाळ जिवंत असलेल्या परमेश्वरापुढे दंडवत घातले, त्यांची उपासना केली आणि आपले मुकुट राजासनापुढे ठेऊन म्हटले: “हे आमच्या प्रभू आणि परमेश्वरा, गौरव, आदर, सामर्थ्य स्वीकारण्यास तुम्ही पात्र आहात; कारण तुम्ही सर्व निर्माण केले. तुमच्याच इच्छेने सर्वकाही अस्तित्वात आले.”
प्रकटी 4:1-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्यानंतर मी पाहिले तो पाहा, स्वर्गात एक दार उघडलेले मला दिसले आणि जी वाणी मी प्रथम ऐकली होती ती माझ्याबरोबर बोलणार्या ‘कर्ण्याच्या’ ध्वनीसारखी होती; ती म्हणाली, “इकडे ‘वर ये’ म्हणजे ‘ज्या गोष्टी’ ह्यानंतर ‘घडून आल्या पाहिजेत’ त्या मी तुला दाखवीन.” लगेचच मी आत्म्याने संचरित झालो, तेव्हा पाहा, स्वर्गात राजासन मांडलेले होते, आणि ‘त्या राजासनावर कोणीएक बसलेला होता.’ जो बसलेला होता तो दिसण्यात यास्फे व सार्दि ह्या रत्नांसारखा होता. ‘राजासनाभोवती’ दिसण्यात पाचूसारखे ‘मेघधनुष्य होते.’ राजासनाभोवती चोवीस आसने होती; आणि त्या आसनांवर शुभ्र वस्त्रे परिधान केलेले व डोक्यांवर सोन्याचे मुकुट घातलेले चोवीस वडील बसलेले होते. राजासनाच्या आतून ‘विजा, वाणी व मेघगर्जना निघत होत्या’ आणि पेटलेल्या सात मशाली राजासनापुडे जळत होत्या; त्या देवाचे सात आत्मे आहेत. राजासनापुढे ‘स्फटिकासारखा’ जणू काय काचेचा समुद्र होता; ‘आणि राजासनाच्या मध्यभागी व राजासनाच्या चार बाजूंना’ पुढे व मागे ‘अंगभर डोळे असलेले चार प्राणी’ होते. ‘पहिला प्राणी सिंहा’सारखा, ‘दुसरा गोर्ह्या’सारखा, ‘तिसरा माणसाच्या तोंडा’सारखा व ‘चौथा प्राणी उडत्या गरुडा’सारखा होता. त्या चारही प्राण्यांना ‘प्रत्येकी सहा-सहा पंख असून ते प्राणी’ आतून ‘बाहेरून सर्वांगी, डोळ्यांनी भरलेले’ होते; आणि, “पवित्र, पवित्र, पवित्र, जो होता, ‘जो आहे’ व जो येणार तो ‘सर्वसमर्थ प्रभू देव,”’ असे ते रात्रंदिवस म्हणतात, ते कधीच थांबत नाहीत. ‘राजासनावर बसलेला जो युगानुयुग जिवंत आहे’ त्याचे जेव्हा जेव्हा ते प्राणी गौरव, सन्मान व उपकारस्तुती करतात, तेव्हा तेव्हा ते चोवीस वडील ‘राजासनावर जो बसलेला’ त्याच्या पाया पडतात; जो ‘युगानुयुग जिवंत’ त्याला नमन करतात; आणि आपले मुकुट राजासनापुढे ठेवून म्हणतात, “हे प्रभो, आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य ह्यांचा स्वीकार करण्यास तू योग्य आहेस; कारण तू सर्वकाही निर्माण केलेस, तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले.”
प्रकटी 4:1-11 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ह्यानंतर मी पाहिले तो काय आश्चर्य! स्वर्गात एक दार उघडलेले मला दिसले आणि जी वाणी मी प्रथम ऐकली होती व जी कर्ण्याच्या ध्वनीसारखी होती, ती म्हणाली, “इकडे वर ये, म्हणजे ज्या गोष्टी ह्यानंतर घडून आल्या पाहिजेत त्या मी तुला दाखवीन.” लगेच पवित्र आत्म्याने माझा ताबा घेतला. तो पाहा, स्वर्गात राजासन मांडलेले होते आणि त्या राजासनावर कोणी एक बसलेला होता. त्याचे मुख सूर्यकांत व सादा रत्नांसारखे चमकत होते. राजासनाभोवती सर्वत्र पाचूच्या रंगासारखे मेघधनुष्य होते. राजासनाभोवती आणखी चोवीस आसने होती आणि त्या आसनांवर शुभ्र वस्त्रे परिधान केलेले व डोक्यावर सोन्याचे मुकुट घातलेले चोवीस वडीलजन बसलेले होते. राजासनाकडून विजा, गडगडाट व मेघगर्जना निघत होत्या. पेटलेल्या सात मशाली राजासनापुढे जळत होत्या, त्या मशाली म्हणजे देवाचे सात आत्मे आहेत. तसेच राजासनापुढे स्फटिकासारखा जणू काय काचेचा समुद्र होता. राजासनाभोवती चार बाजूंस चार प्राणी होते. त्यांना पुढे व मागे अंगभर डोळे होते. पहिला प्राणी सिंहासारखा, दुसरा बैलासारखा, तिसरा माणसाच्या तोंडासारखा व चौथा प्राणी उडत्या गरुडासारखा होता. त्या चारही प्राण्यांना प्रत्येकी सहा पंख होते व ते प्राणी आतून बाहेरून सर्वांगी डोळ्यांनी भरलेले होते. “सर्वसमर्थ प्रभू देव पवित्र, पवित्र, पवित्र आहे. तो होता, तो आहे व तो येणार आहे”, असे ते रात्रंदिवस गातात; ते कधीच थांबत नाहीत. राजासनावर बसलेला जो युगानुयुगे जिवंत आहे, त्याला जेव्हा जेव्हा ते प्राणी गौरव, सन्मान व आभार व्यक्त करणारी गाणी गातात, तेव्हा तेव्हा ते चोवीस वडीलजन राजासनावर जो बसलेला आहे, त्याच्या पाया पडतात. जो युगानुयुगे जिवंत आहे, त्याची आराधना करतात, आणि आपले मुकुट राजासनापुढे ठेवून म्हणतात, “प्रभो, आमच्या देवा ! गौरव, सन्मान व सामर्थ्य ह्यांचा स्वीकार करावयास तू पात्र आहेस कारण तू सर्वांना निर्माण केले व तुझ्या इच्छेने त्यांना अस्तित्व आणि जीवन मिळाले.”