रोमकरांस पत्र 2:12-29 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
रोमकरांस पत्र 2:12-29 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण ज्यांना नियमशास्त्र नाही अशा जितक्यांनी पाप केले तितके नियमशास्त्राव्यतिरिक्त नाश पावतील आणि नियमशास्त्र असून जितक्यांनी पाप केले तितक्यांचा न्याय नियमशास्त्रानुसार होईल. कारण नियमशास्त्र श्रवण करणारे देवाच्या दृष्टीने नीतिमान आहेत असे नाही, तर नियमशास्त्राप्रमाणे आचरण करणारे नीतिमान ठरवण्यात येतील. कारण ज्यांना नियमशास्त्र नाही असे परराष्ट्रीय जेव्हा नियमशास्त्रात जे आहे ते स्वभावत: करत असतात, तेव्हा त्यांना नियमशास्त्र नाही, तरी ते स्वत:च आपले नियमशास्त्र आहेत. म्हणजे ते नियमशास्त्रातील आचार आपल्या अंत:करणात लिहिलेला आहे असे दाखवतात; त्यांच्याबरोबर त्यांची सदसद्विवेकबुद्धीही त्यांना साक्ष देते आणि त्यांचे एकमेकां-विषयीचे विचार दोष लावणारे किंवा दोषमुक्त करणारे असे असतात. ज्या दिवशी देव माझ्या सुवार्तेप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या द्वारे माणसांच्या गुप्त गोष्टींचा न्याय करील त्या दिवशी हे दिसून येईल. आता जर तू स्वतःला यहूदी म्हणवत आहेस, आणि नियमशास्त्राचा आधार घेतोस व देवाविषयी अभिमान बाळगतोस, तुला त्याची इच्छा कळते आणि नियमशास्त्रातले शिक्षण मिळाल्यामुळे जे सर्वोत्तम ते तू पसंत करतोस; आणि नियमशास्त्रात आपल्याला ज्ञानाचे व सत्याचे स्वरूप उपलब्ध झाले आहे, म्हणून आपण आंधळ्यांचे वाटाडे, अंधारात असलेल्यांचा प्रकाश, अल्पबुद्धी लोकांचे शिक्षक, बालकांचे गुरू आहोत, अशी तुझी खातरी झाली आहे; तर मग दुसर्याला शिकवणारा तू स्वतःलाच शिकवत नाहीस काय? चोरी करू नये अशी घोषणा करणारा तू स्वतःच चोरी करतोस काय? व्यभिचार करू नये असे सांगणारा तू स्वतःच व्यभिचार करतोस काय? मूर्तींचा विटाळ मानणारा तू स्वतःच देवळे लुटतोस काय? नियमशास्त्राचा अभिमान बाळगणारा तू स्वतःच नियमशास्त्राच्या उल्लंघनाने देवाचा अपमान करतोस काय? “तुमच्यामुळे परराष्ट्रीयांमध्ये देवाच्या नावाची निंदा होत आहे,” असे शास्त्रात लिहिलेले आहे. कारण जर तू नियमशास्त्राप्रमाणे वागत असलास तर सुंतेचा उपयोग आहे खरा; परंतु जर तू नियमशास्त्राचे उल्लंघन करणारा असलास तर तुझी सुंता झालेली असूनही ती न झाल्यासारखीच आहे. तर मग सुंता न झालेल्या माणसाने नियमशास्त्रातील नियम पाळले तर त्याचे सुंता न होणे हे सुंता असे गणण्यात येणार नाही काय? आणि तुला शास्त्रलेख असूनही व तुझी सुंता होऊनही जो तू नियमशास्त्राचे उल्लंघन करणारा आहेस त्या तुझा न्याय, जो शारीरिक सुंता न झालेल्यांपैकी असून नियमशास्त्र पाळतो, तो करील. कारण जो बाह्यात्कारी यहूदी तो यहूदी नव्हे आणि देहाची बाह्यात्कारी सुंता ती सुंता नव्हे; परंतु जो अंतरी यहूदी तो यहूदी होय; आणि लेखाप्रमाणे व्हायची ती सुंता नव्हे तर आध्यात्मिकदृष्ट्या जी अंतःकरणाची व्हायची ती सुंता होय; अशाची प्रशंसा माणसाकडून नव्हे, तर देवाकडून होते.
रोमकरांस पत्र 2:12-29 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण, नियमशास्त्राशिवाय असलेल्या जितक्यांनी पाप केले असेल ते नियमशास्त्राशिवाय नाश पावतील आणि नियमशास्त्राखाली असलेल्या जितक्यांनी पाप केले असेल त्यांचा नियमशास्त्रानुसार न्याय होईल. कारण नियमशास्त्राचे श्रवण करणारे देवापुढे नीतिमान आहेत असे नाही, पण नियमशास्त्राचे आचरण करणारे नीतिमान ठरतील. कारण ज्यांना नियमशास्त्र नाही असे परराष्ट्रीय जेव्हा स्वभावतः नियमशास्त्रातील गोष्टी करतात तेव्हा त्यांना नियमशास्त्र नाही तरी ते स्वतः स्वतःसाठी नियमशास्त्र होतात. आणि एकमेकांतील त्यांचे विचार जेव्हा एकमेकांवर आरोप करतात किंवा एकमेकांचे समर्थन करतात आणि त्यांचे विवेकही त्यांच्या जोडीला साक्ष देतात तेव्हा ते त्यांच्या हृदयावर लिहिलेल्या नियमशास्त्राचा परिणाम दाखवितात. देव, माझ्या सुवार्तेप्रमाणे जेव्हा मनुष्यांच्या गुप्त गोष्टींचा ख्रिस्त येशूकडून न्याय करील त्यादिवशी हे दिसून येईल. आता जर तू स्वतःला यहूदी म्हणतोस, नियमशास्त्राचा आधार घेतोस आणि देवाचा अभिमान मिरवतोस; तू त्याची इच्छा जाणतोस आणि चांगल्या गोष्टी पसंत करतोस, कारण तुला नियमशास्त्रातून शिक्षण मिळाले आहे; आणि तुझी खातरी आहे की तूच अंधळ्यांचा वाटाड्या आहेस जे अंधारात आहेत त्यांचा प्रकाश, अल्पबुद्धी लोकांचे शिक्षक आणि लहान बाळांचा गुरु आहेस; कारण तुझ्याजवळ नियमशास्त्रात ज्ञानाचे व सत्याचे स्वरूप आहे; तर मग जो तू दुसर्याला शिकवतोस तो तू स्वतःला शिकवीत नाहीस काय? चोरी करू नये, असे जो तू घोषणा करतोस तो तू चोरी करतो काय? व्यभिचार करू नये, असे जो तू सांगतोस तो तू व्यभिचार करतोस काय? जो तू मूर्तींचा विटाळ मानतोस तो तू देवळे लुटतोस काय? जो तू नियमशास्त्राचा अभिमान मिरवतोस तो तू नियमशास्त्राचे उल्लंघन करून देवाचा अपमान करतोस काय? कारण शास्त्रलेखात लिहिल्याप्रमाणे देवाच्या नावाची परराष्ट्रीयात तुझ्यामुळे निंदा होत आहे. कारण जर तू नियमशास्त्राचे आचरण केलेस तर सुंता खरोखर उपयोगी आहे; पण जर तू नियमशास्त्राचे उल्लंघन करतोस तर तुझी सुंता झालेली असूनही ती न झाल्यासारखीच आहे. म्हणून कोणी मनुष्य जर सुंता न झालेला असूनही, नियमशास्त्राचे नियम पाळील तर त्याची सुंता न होणे हे सुंता असे गणण्यात येणार नाही काय? आणि देहाने सुंता न झालेला कोणी जर नियमशास्त्राचे पालन करीत असेल, तर ज्या तुला शास्त्रलेख व सुंताविधी मिळाले असूनही तू नियमशास्त्राचे उल्लंघन करतोस त्या तुझा तो न्याय करणार नाही काय? कारण बाहेरून यहूदी आहे तो यहूदी नाही किंवा बाहेरून देहात सुंता आहे ती खरोखर सुंता नाही. कारण जो अंतरी यहूदी आहे तो यहूदी होय आणि जी आध्यात्मिक अनुसरून आहे, शास्त्रलेखाला अनुसरून नाही, अशी जी अंतःकरणाची सुंता आहे ती सुंता होय आणि त्याची प्रशंसा मनुष्याकडून नाही परंतु देवाकडून होईल.
रोमकरांस पत्र 2:12-29 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ज्यांच्याकडे नियमशास्त्र नाही, अशा जितक्यांनी पाप केले तितके नियमशास्त्राव्यतिरिक्त नाश पावतील आणि नियमशास्त्र असून जितक्यांनी पाप केले, तितक्यांचा न्याय नियमशास्त्रानुसार होईल. नियमशास्त्र श्रवण करणारे देवाच्या दृष्टीने नीतिमान आहेत असे नाही, तर नियमशास्त्राप्रमाणे आचरण करणारे नीतिमान ठरविण्यात येतात. ज्यांच्याकडे नियमशास्त्र नाही, असे यहुदीतर जेव्हा नियमशास्त्रात जे आहे, ते स्वभावतः करत असतात तेव्हा, त्यांच्याकडे नियमशास्त्र नसले तरी, ते स्वतःच आपले नियमशास्त्र आहेत. म्हणजे नियमशास्त्रातील आचार आपल्या अंतःकरणात लिहिलेला आहे, असे ते दाखवतात, शिवाय त्यांची सदसद्विवेकबुद्धीही साक्ष देते कारण त्यांचे मन त्यांना दोषी किंवा निर्दोष ठरवते. मी घोषित करीत असलेल्या शुभवर्तमानानुसार असे होणार आहे. माणसांच्या गुप्त विचारांचा न्याय ज्या दिवशी देव येशू ख्रिस्ताद्वारे करील, त्या दिवशी हे उघड होईल. आता ज्याअर्थी तू स्वतःला यहुदी म्हणवतोस आणि नियमशास्त्राचा आधार घेतोस व देवाविषयी अभिमान बाळगतोस, तुला त्याची इच्छा कळते आणि नियमशास्त्रातले शिक्षण मिळाल्यामुळे जे सर्वोत्तम ते तू पसंत करतोस आणि नियमशास्त्रात आपल्याला ज्ञानाचे व सत्याचे स्वरूप उपलब्ध झाले आहे, म्हणून आपण आंधळ्याचा वाटाड्या, अंधारात असलेल्यांचा प्रकाश, अल्पबुद्धी लोकांचे शिक्षक व अजाण लोकांचे गुरू आहोत, अशी तुझी खातरी झाली आहे, त्याअर्थी दुसऱ्याला शिकवणारा तू स्वतःलाच का शिकवत नाहीस? चोरी करू नये असे सांगणारा तू स्वतःच चोरी करतोस काय? व्यभिचार करू नये, असे सांगणारा तू स्वतःच व्यभिचार करतोस काय? मूर्तीचा विटाळ मानणारा तू स्वतःच देवळे लुटतोस काय? नियमशास्त्राचा अभिमान बाळगणारा तू स्वतःच नियमशास्त्राच्या उ्रंघनाने देवाचा अपमान करतोस काय? ‘तुमच्यामुळे यहुदीतरांमध्ये देवाच्या नावाची निंदा होत आहे,’ असे धर्मशास्त्रात लिहिलेले आहे. जर तू नियमशास्त्राप्रमाणे वागत असलास, तर सुंतेचा उपयोग आहे खरा, परंतु जर तू नियमशास्त्राचे उ्रंघन करणारा असलास तर तुझी सुंता झालेली असूनही ती न झाल्यासारखीच आहे. तर मग सुंता न झालेल्या माणसाने नियमशास्त्रातील नियम पाळले तर परमेश्वर त्या माणसाला सुंता झाल्यासारखा नाही का मानणार? आणि तुझ्याकडे धर्मशास्त्रलेख असूनही व तुझी सुंता होऊनही जो तू नियमशास्त्राचे उ्रंघन करणारा आहेस त्या तुझा न्याय, जो शारीरिक सुंता न झालेल्यांपैकी असून नियमशास्त्र पाळतो, तो करील. जो बाह्यस्वरूपाने यहुदी तो खरा यहुदी नव्हे आणि बाह्यस्वरूपाची सुंता ही खरी सुंता नव्हे. किंबहुना जो अंतरी यहुदी तो खरा यहुदी होय. अंतःकरणाची सुंता ही खरी सुंता होय. अशी सुंता लेखी नियमशास्त्रानुसार नव्हे तर देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे होत असते. अशा व्यक्तीची प्रशंसा माणसाकडून नव्हे, तर देवाकडून होते.
रोमकरांस पत्र 2:12-29 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नियमशास्त्राशिवाय ज्या सर्वांनी पाप केले त्यांचा नाश नियमशास्त्राशिवाय होईल, आणि ज्यांनी नियमशास्त्राधीन असून पाप केले असेल त्यांचा न्याय नियमशास्त्रानुसार केला जाईल. नियमशास्त्र केवळ ऐकणारे परमेश्वराच्या दृष्टीने नीतिमान ठरत नाहीत, परंतु जे नियमशास्त्र पाळणारे आहेत, त्यांना नीतिमान म्हणून घोषित केले जाईल. निश्चितच, जेव्हा गैरयहूदी लोकांजवळ नियमशास्त्र नव्हते, तरी जे नियमशास्त्रात आहे ते नैसर्गिकरित्या पाळीत होते, त्यांच्याजवळ नियम नव्हते तरी ते स्वतः नियम असे झाले. ते प्रदर्शित करतात की नियम त्यांच्या अंतःकरणात लिहिलेले आहे; त्यांची विवेकबुद्धीच त्यांना साक्ष देते आणि त्यांचेच विचार त्यांना दोषी किंवा निर्दोष ठरवितात. हे त्या दिवशी घडेल जेव्हा माझ्या शुभवार्तेनुसार परमेश्वर येशू ख्रिस्ताद्वारे प्रत्येकाच्या गुप्त रहस्यांचा न्याय करतील. आता, जर तुम्ही स्वतःला यहूदी समजता व नियमशास्त्रावर अवलंबून राहता आणि परमेश्वरामध्ये प्रौढी मिरवता; तुम्हाला परमेश्वराच्या नियमांचे शिक्षण मिळाले आहे, म्हणून तुम्ही त्यांची इच्छा ओळखता आणि श्रेष्ठ ते पसंत करता; तुम्हाला खात्री आहे की, तुम्ही एखाद्या आंधळ्याला मार्गदर्शक व्हाल व अंधारात इतरांना प्रकाश असे व्हाल. नियमांचे दृश्य स्वरूप ज्ञान व सत्य यामध्ये आहे, आणि म्हणून आपण मूर्खाचे मार्गदर्शक, लहान मुलांचे शिक्षक आहोत असे तुम्हाला वाटते. जे तुम्ही, इतरांना शिकविणारे, ते तुम्ही स्वतःला का शिकवीत नाही? चोरी करू नका म्हणून संदेश सांगणारे, तुम्ही चोरी का करता? जे तुम्ही लोकांनी व्यभिचार करू नये, असे म्हणता ते तुम्ही व्यभिचार करता का? जे तुम्ही मूर्तीचा विटाळ मानणारे, तुम्ही मंदिर का लुटता? जे तुम्ही नियमशास्त्राचा गर्व असणारे, ते तुम्ही नियम मोडून परमेश्वराचा अपमान का करता? मग नियमशास्त्र म्हणते: “तुमच्यामुळेच गैरयहूदी लोकांमध्ये परमेश्वराच्या नावाची निंदा होत आहे.” नियम पाळत असाल तर सुंतेला काही मोल आहे; पण तुम्ही नियम पाळीत नसाल, तर सुंता न झाल्यासारखे आहात. जर ज्यांची सुंता झाली नाही ते नियमशास्त्राचे पालन करतात, तर त्यांची सुंता न होणे, हे सुंता झाल्यासारखे होणार नाही काय? ज्यांच्या शरीराची सुंता झालेली नसून नियम पाळतात ते तुम्हाला दोषी ठरवतील, कारण तुमच्याजवळ लेखी नियम आहेत आणि सुंता झालेली असतानाही तुम्ही नियम तोडता. कारण केवळ बाह्य स्वरूपाने कोणी यहूदी होत नाही, सुंता ही केवळ शारीरिक आणि बाह्य नाही. तोच खरा यहूदी, जो मनाने यहूदी आहे आणि सुंता ही अंतःकरणाची सुंता आहे व ती आत्म्याद्वारे आहे, लेखी व्यवस्थेप्रमाणे नाही. अशा व्यक्तीची प्रशंसा इतर लोकांकडून नव्हे, तर परमेश्वरापासून होईल.