रोमकरांस पत्र 2:2-11 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
रोमकरांस पत्र 2:2-11 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण अशा गोष्टी करणार्यांविरुद्ध देवाचा न्याय सत्यानुसार आहे हे आपल्याला ठाऊक आहे. तर हे मानवा, अशा गोष्टी करणार्यांना जो तू दोष लावतोस व स्वतः त्याच करतोस, तो तू देवाच्या न्यायातून सुटशील असे तुला वाटते काय? किंवा देवाची ममता तुला पश्चात्तापाकडे नेणारी आहे हे न समजून तू त्याची ममता, क्षमा व सहनशीलता ह्यांच्या विपुलतेचा अनादर करतोस काय? की, आपल्या हटवादीपणाने पश्चात्तापहीन अंतःकरणाने देवाचा क्रोध व यथोचित न्याय ह्यांच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठी स्वतःकरता क्रोध साठवून ठेवतोस? तो प्रत्येकाला ज्याच्या-त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ देईल. म्हणजे जे कोणी धीराने सत्कर्मे करत राहून गौरव, सन्मान व अक्षयता ही मिळवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना तो सार्वकालिक जीवन देईलच; परंतु जे तट पाडणारे आहेत व सत्याला न मानता अनीतीला मानतात त्यांच्यावर क्रोध व कोप, संकट व क्लेश येतील. म्हणजे दुष्कृत्य करणारा मनुष्य, प्रथम यहूदी आणि मग हेल्लेणी अशा प्रत्येकाच्या जिवावर ती येतील; पण सत्कृत्य करणारा प्रत्येक, प्रथम यहूदी आणि मग हेल्लेणी, ह्यांना गौरव, सन्मान व शांती ही मिळतील. कारण देवाजवळ पक्षपात नाही.
रोमकरांस पत्र 2:2-11 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण आपल्याला माहीत आहे की, अशा गोष्टी करणार्यांविरुद्ध, देवाचा सत्यानुसार न्यायनिवाडा आहे. तर अशा गोष्टी करणार्यांना दोष लावणार्या आणि आपण स्वतः त्याच गोष्टी करणार्या, अरे बंधू, तू स्वतः देवाच्या न्यायनिवाड्यातून सुटशील असे मानतोस काय? किंवा देवाची दया तुला पश्चात्तापाकडे घेऊन जात आहे हे न ओळखून तू त्याच्या ममतेचे, क्षमाशीलतेचे आणि सहनशीलतेचे धन तुच्छ मानतोस काय? पण तू आपल्या हटवादीपणाने व आपल्या पश्चात्तापहीन मनाने आपल्या स्वतःसाठी देवाच्या क्रोधाच्या व यथोचित न्यायाच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठी क्रोध साठवून ठेवत आहेस. तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे प्रतिफळ देईल. म्हणजे जे धीराने सत्कर्मे करीत राहून गौरव, सन्मान व अक्षयता ही मिळवू पाहतात त्यांना तो सार्वकालिक जीवन देईलच; परंतु जे तट पाडणारे सत्याला न मानता अनीतीला मानतात त्यांना भयानक क्रोध व भयानक कोप. संकट व क्लेश हे येतील. म्हणजे दुष्कृत्य करणारा मनुष्य प्रथम यहूदी आणि मग हेल्लेणी अशा प्रत्येकाच्या जीवावर ती येतील. पण प्रत्येक चांगले करणार्या प्रथम यहूद्याला आणि मग ग्रीकास गौरव, शांती व सन्मान ही मिळतील. कारण देवाजवळ पक्षपात नाही.
रोमकरांस पत्र 2:2-11 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
अशा गोष्टी करणाऱ्यांविरुद्ध देवाचा न्याय सत्यानुसार असतो, हे आपल्याला ठाऊक आहे. परंतु माझ्या मित्रा, अशा गोष्टी करणाऱ्यांना तू दोष लावतोस व स्वतः त्याच करतोस! तू देवाच्या न्यायातून सुटशील असे तुला वाटते काय? किंवा देवाचा चांगुलपणा तुला पश्चात्ताप करायला लावणारा आहे हे न समजून तू त्याचा चांगुलपणा व सहनशीलता ह्यांच्या विपुलतेचा अनादर करतोस काय? परंतु ज्या दिवशी परमेश्वराचा यथोचित न्याय प्रकट होईल त्या क्रोधाच्या दिवसासाठी तुझ्या दुराग्रही व पश्चात्तापहीन अंतःकरणाने, तू देवाचा क्रोध साठवून ठेवतोस काय? ‘तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ देईल.’ जे कोणी धीराने सत्कर्मे करत राहून गौरव, सन्मान व अमरत्व हे सारे मिळविण्याचा प्रयत्न करतात, त्यांना तो शाश्वत जीवन देईल. परंतु जे स्वार्थी आहेत व सत्याला न मानता अनीतीला मानतात त्यांच्यावर क्रोध व कोप हे येतील. दुष्कृत्य करणारा मनुष्य, प्रथम यहुदी आणि मग यहुदीतर, अशा प्रत्येकाच्या जिवाला वेदना व क्लेश होतील. मात्र सत्कृत्य करणारा प्रत्येक, प्रथम यहुदी आणि मग यहुदीतर ह्यांना गौरव, सन्मान व शांती ही मिळतील. कारण देव पक्षपाती नाही.
रोमकरांस पत्र 2:2-11 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आपल्याला माहीत आहे की, अशा गोष्टी करणार्यांविरूद्ध परमेश्वराचा न्याय सत्यावर आधारलेला आहे. तुम्ही सर्वसाधारण मनुष्य असून न्याय करता, पण तीच कृत्ये स्वतः करता तर, तुम्ही परमेश्वराच्या न्यायातून सुटाल असे तुम्हाला वाटते का? त्यांचा विपुल दयाळूपणा, धीर आणि सहनशीलता यांचा अवमान करून परमेश्वराची दया तुला पश्चात्तापाकडे नेणारी आहे हे तुला समजत नाही का? तुमच्या हट्टीपणामुळे आणि पश्चात्ताप विरोधी अंतःकरणामुळे, तुम्ही आपल्यासाठी परमेश्वराच्या क्रोधाचा दिवस व नीतीचा न्याय प्रकट होईल तोपर्यंत क्रोध साठवून ठेवीत आहात. परमेश्वर “प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे योग्य ते प्रतिफळ देतील.” जे धीराने चांगले कार्य करीत राहून गौरव, सन्मान व अविनाशीतेसाठी खटपट करतात, त्यांना ते सार्वकालिक जीवन देतील. पण जे स्वार्थी आणि सत्याचा नकार करणारे आणि दुष्ट मार्गांनी चालतात, त्यांच्यावर कोप व क्रोध राहील. वाईट करणार्या प्रत्येक मनुष्यावर; प्रथम यहूदीयावर आणि मग गैरयहूदीयांवर क्लेश आणि संकटे येतील. परंतु सर्व चांगले काम करणार्यांना; प्रथम यहूदी, नंतर गैरयहूदीयांना परमेश्वराकडून गौरव, सन्मान व शांती ही लाभतील. कारण परमेश्वर पक्षपात करीत नाहीत.