उत्पत्ती 4

4
काइन आणि हाबेल
1आदामाने आपली स्त्री हव्वा हिला जाणले; ती गर्भवती होऊन तिने काइनाला जन्म दिला; ती म्हणाली, “परमेश्वराच्या साहाय्याने मला पुरुषसंतान लाभले आहे.”
2नंतर तिने त्याचा भाऊ हाबेल ह्याला जन्म दिला. हाबेल मेंढपाळ झाला पण काइन शेतकरी झाला.
3काही काळ लोटल्यावर असे झाले की काइनाने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण आणले.
4हाबेलानेही आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यांतून म्हणजे त्यांच्यातल्या पुष्ट मेंढरांतून काही अर्पण आणले. परमेश्वराने हाबेल व त्याचे अर्पण ह्यांचा आदर केला;
5पण काइन व त्याचे अर्पण ह्यांचा त्याने आदर केला नाही; म्हणून काइन संतापला व त्याचे तोंड उतरले.
6तेव्हा परमेश्वर काइनाला म्हणाला, “तू का संतापलास? आणि तुझे तोंड का उतरले?
7तू बरे केलेस तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पण तू बरे केले नाहीस तर दाराशी पाप टपूनच आहे; त्याचा रोख तुझ्यावर आहे. ह्याकरता तू त्याला दाबात ठेव.”
8मग काइनाचे त्याचा भाऊ हाबेल ह्याच्याशी बोलणे झाले; आणि असे झाले की ते शेतात असता काइनाने आपला भाऊ हाबेल ह्याच्यावर चालून जाऊन त्याला ठार केले.
9मग परमेश्वराने काइनाला विचारले, “तुझा भाऊ हाबेल कोठे आहे?” तो म्हणाला, “मला ठाऊक नाही; मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे?”
10तो म्हणाला, “तू हे काय केलेस? ऐक! तुझ्या भावाचे रक्त भूमीतून माझ्याकडे ओरड करत आहे.
11तर आता तुझ्या हातून तुझ्या भावाचे पडलेले रक्त प्राशन करण्यास ज्या भूमीने तोंड उघडले आहे, तिचा तुला शाप आहे;
12तू जमिनीची मशागत करशील तेव्हा ती ह्यापुढे तुला आपले सत्त्व देणार नाही, तू पृथ्वीवर परागंदा व भटकणारा होशील.”
13तेव्हा काइन परमेश्वराला म्हणाला, “हा माझा दंड मला सोसवणार नाही इतका भारी आहे.
14पाहा, ह्या जमिनीवरून तू मला आज हाकून दिले आहे; मी तुझ्या दृष्टीपुढून लपलेला असेन, मी पृथ्वीवर परागंदा व भटकणारा होणार; आणि ज्या कोणाला मी सापडेन तो मला ठार करील, असे होईल.”
15परमेश्वर त्याला म्हणाला, “तर मग जो कोणी काइनाला ठार मारील त्याचा सातपट सूड घेण्यात येईल.” आणि काइन कोणाला सापडल्यास त्याने त्याला मारू नये म्हणून त्याला परमेश्वराने खूण नेमून दिली.
काइनाचे वंशज
16काइन परमेश्वरापुढून निघाला आणि एदेनाच्या पूर्वेस नोद देशात वस्ती करून राहिला.
17काइनाने आपल्या बायकोस जाणले, आणि ती गर्भवती होऊन तिला हनोख झाला; काइनाने एक नगर बांधले; त्याचे नाव त्याने आपल्या मुलाच्या नावावरून हनोख असे ठेवले.
18हनोखाला इराद झाला; इरादाला महूयाएल झाला; महूयाएलास मथुशाएल झाला आणि मथुशाएलास लामेख झाला.
19लामेखाने दोन बायका केल्या; पहिलीचे नाव आदा व दुसरीचे नाव सिल्ला.
20आदा हिला याबाल झाला; तो पाल देऊन राहणारे व गुरेढोरे पाळणारे ह्यांचा मूळ पुरुष झाला.
21त्याच्या भावाचे नाव युबाल असे होते; तो तंतुवाद्ये व वायुवाद्ये वाजवणार्‍या सर्वांचा मूळ पुरुष झाला.
22सिल्ला हिलाही तुबल-काइन झाला; तो तांब्याची, लोखंडाची व सर्व प्रकारची धारदार हत्यारे घडवणारा झाला; आणि तुबल-काइनास नामा नावाची बहीण होती.
23लामेख आपल्या बायकांना म्हणाला,
“आदा आणि सिल्ला, तुम्ही माझी वाणी ऐका, लामेखाच्या बायकांनो, माझ्या भाषणाकडे कान द्या; एका पुरुषाने मला घाय केला, एका तरुणाने मला प्रहार केला, म्हणून मी त्याला ठार मारले.
24काइनाबद्दल सातपट सूड घ्यायचा तर लामेखाबद्दल सत्त्याहत्तरपट घेण्यात येईल.”
शेथाचे वंशज
25आदामाने आपल्या बायकोस पुन: जाणले, आणि तिला मुलगा झाला; त्याचे नाव तिने शेथ ठेवले; ती म्हणाली, “काइनाने हाबेलाचा घात केला म्हणून देवाने त्याच्या जागी मला दुसरे अपत्य दिले आहे.”
26शेथ ह्याला मुलगा झाला, त्याचे नाव त्याने अनोश असे ठेवले; त्या काळापासून लोक परमेश्वराच्या नावाने प्रार्थना करू लागले.

Markering

Deel

Kopiëren

None

Wil je jouw markerkingen op al je apparaten opslaan? Meld je aan of log in