मत्तय 22

22
लग्नाच्या मेजवानीचा दाखला
1येशू पुन्हा त्यांना दाखले देऊ लागला. 2तो म्हणाला, “स्वर्गाचे राज्य एका राजासारखे आहे. त्याने आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी द्यायचे ठरवले. 3लग्नाच्या मेजवानीस ज्यांना आमंत्रण दिले होते, त्यांना बोलावायला त्याने आपले दास पाठवले, परंतु ते येईनात. 4पुन्हा त्याने दुसरे दास पाठवले व त्यांना म्हटले की, आमंत्रितांना असे सांगा, “पाहा, मी मेजवानी तयार केली आहे, माझे बैल व पुष्ट पशू कापले आहेत. सर्व काही तयार आहे. लग्नाच्या मेजवानीस चला.’ 5तरी पण हे मनावर न घेता त्यांच्यापैकी कोणी आपल्या शेतात, तर कोणी व्यापाराला गेले. 6बाकीच्यांनी त्याच्या दासांना धरून त्यांचा अपमान केला व त्यांना ठार मारले. 7हे ऐकून राजा संतापला आणि त्याने आपले सैनिक पाठवून त्या घातक्यांचा नाश केला व त्यांचे शहर जाळून टाकले. 8त्यानंतर तो आपल्या दासांना म्हणाला, “लग्नाची तयारी झाली आहे खरी, परंतु आमंत्रित लायकीचे नव्हते. 9म्हणून तुम्ही चव्हाट्यावर जा. तेथे जितके लोक तुम्हांला आढळतील, तितक्यांना लग्नाच्या मेजवानीला बोलवा.’ 10त्या दासांनी रस्त्यावर जाऊन बरेबाईट असे जितके आढळले, त्या सर्वांना एकत्र जमवले आणि लग्नाचा मंडप लोकांनी भरून गेला.
11परंतु राजा पाहुण्यांना भेटायला आला तेव्हा लग्नसमारंभास साजेसे कपडे न घातलेला असा एक माणूस त्याच्या दृष्टीस पडला. 12तो त्याला म्हणाला, “मित्रा, लग्नाचा पोषाख न घालता तू येथे कसा आलास?’ त्याला काही उत्तर देता येईना. 13नंतर राजाने नोकरांना सांगितले, “ह्याचे हातपाय बांधून ह्याला बाहेरील अंधारात टाका, तेथे आक्रोश केला जाईल व दात ओठ खाणे चालेल.’
14बोलावलेले पुष्कळ आहेत, पण निवडलेले थोडे आहेत.”
कैसराला कर देण्याविषयी
15नंतर येशूला बोलण्यात पकडण्याकरता परुश्यांनी मसलत केली. 16त्यांनी त्यांच्या शिष्यांना व हेरोदच्या पक्षातील काही जणांना त्याच्याकडे पाठवून विचारले, “गुरुजी, आम्हांला ठाऊक आहे की, आपण खरे आहात आणि सत्याला अनुसरून देवाचा मार्ग शिकवता. आपण कोणाची भीड बाळगत नाही आणि व्यक्तीचे तोंड पाहून बोलत नाही. 17आपल्याला काय वाटते, हे आम्हांला सांगा. कैसरला कर देणे कायदेशीर आहे की नाही?”
18येशू त्यांचा दुष्टपणा ओळखून म्हणाला, “ढोंग्यांनो, माझी अशी परीक्षा का पाहता? 19कर भरायचे नाणे मला दाखवा.” तेव्हा त्यांनी त्याच्याजवळ एक नाणे दिले. 20तो त्यांना म्हणाला, “ही मुद्रा व हा लेख कोणाचा?”
21ते म्हणाले, “कैसरचा.” त्याने त्यांना म्हटले, “तर मग कैसरचे ते कैसराला व देवाचे ते देवाला द्या.”
22हे ऐकून ते थक्क झाले व त्याला सोडून निघून गेले.
पुनरुत्थानाविषयी
23पुनरुत्थान नाही, असे म्हणणाऱ्या सदुकी लोकांनी त्याच दिवशी येशूकडे येऊन त्याला विचारले, 24“गुरुजी, मोशेने सांगितले आहे की, जर एखादा मनुष्य मूलबाळ नसता निधन पावला, तर त्याच्या भावाने त्याच्या विधवेबरोबर विवाह करून त्याच्या भावाचा वंश चालवावा. 25आमच्यामध्ये सात भाऊ होते. त्यातला पहिला भाऊ लग्न करून मरण पावला आणि त्याला संतती नसल्यामुळे त्याची बायको त्याच्या भावाची झाली. 26अशा प्रकारे दुसऱ्या मागून तिसरा असे ते सातही जण निधन पावले 27आणि सर्वांच्या शेवटी ती स्त्रीही मरण पावली. 28तर पुनरुत्थान झाल्यावर ती त्या सात जणांपैकी कोणाची बायको होईल? कारण त्या सातही जणांनी तिच्याबरोबर विवाह केला होता.”
29येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही धर्मशास्त्र व देवाचे सामर्थ्य न ओळखल्यामुळे अशी चूक करीत आहात. 30पुनरुत्थान झाल्यावर कोणी लग्न करत नाहीत किंवा लग्न लावून देत नाहीत, तर ते स्वर्गातील देवदूतांसारखे असतात. 31मृतांच्या पुनरुत्थानाविषयी देवाने तुम्हांला जे सांगितले, ते तुम्ही वाचले नाही काय? 32‘मी अब्राहामचा देव, इसहाकचा देव व याकोबचा देव आहे.’ तो मृतांचा नव्हे तर जिवंताचा देव आहे.”
33हे ऐकून लोकसमुदायाला त्याच्या शिकवणीने विस्मय वाटला.
महान आज्ञा
34येशूने सदूकी लोकांना निरुत्तर केले, असे ऐकून परुशी एकत्र जमले. 35त्यांच्यातील एका तज्ज्ञाने त्याची परीक्षा पाहण्याकरता विचारले, 36“गुरुजी, नियमशास्त्रातील महान आज्ञा कोणती?”
37येशूने उत्तर दिले, “‘तू आपला प्रभू परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण जिवाने व संपूर्ण मनाने प्रीती कर.’ 38ही महान व पहिली आज्ञा आहे. 39हिच्यासारखी दुसरी महत्त्वपूर्ण आज्ञा ही आहे, “तू जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर.’ 40ह्या दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेष्ट्यांचे ग्रंथ अवलंबून आहेत.”
ख्रिस्त दावीदचा पुत्र व प्रभू
41परुशी एकत्र जमले असता येशूने त्यांना विचारले, 42“ख्रिस्ताविषयी तुम्हांला काय वाटते? तो कोणाचा वंशज आहे?” ते त्याला म्हणाले, “दावीदचा.”
43त्याने त्यांना म्हटले, “तर मग पवित्र आत्म्याने त्याला प्रभू असे म्हणण्याची प्रेरणा दावीदला कशी दिली? 44दावीद म्हणाला:
परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले,
‘मी तुझ्या शत्रूंना
तुझ्या पायांखाली घालीपर्यंत
तू माझ्या उजवीकडे बसून राहा.’
45दावीद स्वतः जर त्याला प्रभू म्हणतो, तर तो त्याचा पुत्र कसा?”
46कोणीही त्याच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकला नाही आणि त्या दिवसापासून त्याला आणखी प्रश्न विचारायला कोणीही धजला नाही.

Podkreślenie

Udostępnij

Kopiuj

None

Chcesz, aby twoje zakreślenia były zapisywane na wszystkich twoich urządzeniach? Zarejestruj się lub zaloguj