Logoja YouVersion
Ikona e kërkimit

लूक 10

10
बाहत्तर शिष्यांची कामगिरी व त्यांचे पुनरागमन
1ह्यानंतर प्रभूने आणखी बाहत्तर3 जणांना नेमून ज्या ज्या नगरात व ज्या ज्या ठिकाणी तो स्वत: जाणार होता तेथे दोघे-दोघे असे त्यांना आपल्यापुढे पाठवले.
2तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत; ह्यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या पिकासाठी कामकरी पाठवावेत म्हणून त्याची प्रार्थना करा.
3आता जा; पाहा, लांडग्यांमध्ये कोकरे तसे तुम्हांला मी पाठवत आहे.
4पिशवी, झोळी किंवा पायतण बरोबर घेऊ नका; वाटेने कोणाला मुजरा करू नका.
5ज्या कोणत्या घरात जाल तेथे, ‘ह्या घरास शांती असो,’ असे प्रथम म्हणा.
6तेथे कोणी शांतिप्रिय माणूस असला तर तुमची शांती त्याच्यावर राहील; नसला तर तुमच्याकडे ती परत येईल.
7त्याच घरात वस्ती करून ते जे देतील ते खातपीत राहा, कारण कामकरी आपल्या मजुरीला योग्य आहे. घरोघर फिरू नका.
8कोणत्याही नगरात तुम्ही गेलात आणि त्यांनी तुमचे स्वागत केले तर ते जे तुम्हांला वाढतील ते खा.
9त्यात जे दुखणाईत असतील त्यांना बरे करा व त्यांना सांगा की, ‘देवाचे राज्य तुमच्याजवळ आले आहे.’
10तुम्ही कोणत्याही गावात गेलात आणि त्यांनी तुमचे स्वागत केले नाही तर तेथील रस्त्यांवर बाहेर जाऊन असे म्हणा :
11‘आमच्या पायांना लागलेली तुमच्या गावची धूळदेखील तुमची तुम्हांला झाडून टाकतो; तथापि हे लक्षात ठेवा की, देवाचे राज्य जवळ आले आहे.’
12मी तुम्हांला सांगतो, त्या गावापेक्षा सदोमाला त्या दिवशी सोपे जाईल.
13हे खोराजिना, तुझी केवढी दुर्दशा होणार! हे बेथसैदा, तुझी केवढी दुर्दशा होणार! कारण तुमच्यामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सोर व सीदोन ह्यांत घडली असती तर त्यांनी मागेच गोणपाट व राख अंगावर घेऊन बसून पश्‍चात्ताप केला असता.
14ह्यामुळे न्यायाच्या वेळी तुमच्यापेक्षा सोर व सीदोन ह्यांना सोपे जाईल.
15हे कफर्णहूमा, ‘तू आकाशापर्यंत चढवले जाशील काय? तू अधोलोकापर्यंत उतरशील.’
16जो तुमचे ऐकतो तो माझे ऐकतो; जो तुमचा अव्हेर करतो तो माझा अव्हेर करतो; आणि जो माझा अव्हेर करतो तो ज्याने मला पाठवले त्याचा अव्हेर करतो.”
17नंतर ते बाहत्तर1 जण आनंदाने परत येऊन म्हणाले, “प्रभूजी, आपल्या नावाने भुतेदेखील आम्हांला वश होतात.”
18तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “सैतान आकाशातून विजेसारखा पडला हे मी पाहिले.
19पाहा, मी तुम्हांला साप आणि विंचू ह्यांना तुडवण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे, तुम्हांला काहीएक बाधणार नाही.
20तथापि भुते तुम्हांला वश होतात ह्याचा आनंद मानू नका; तर तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहेत ह्याचा आनंद माना.”
येशूने केलेले उपकारस्तवन
21त्याच घटकेस तो पवित्र आत्म्यात उल्लसित होऊन म्हणाला, “हे पित्या, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभू, मी तुझे स्तवन करतो; कारण ज्ञानी आणि विचारवंत ह्यांच्यापासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बालकांना प्रकट केल्या आहेत; होय, पित्या, कारण तुला असेच योग्य दिसले.
22माझ्या पित्याने सर्वकाही माझ्या स्वाधीन केले आहे; पुत्र कोण आहे हे पित्यावाचून कोणाला ठाऊक नाही; आणि पिता कोण आहे हे पुत्रावाचून व ज्याला तो प्रकट करायची पुत्राची इच्छा असेल त्याच्यावाचून कोणाला ठाऊक नाही.”
23मग शिष्यांकडे वळून तो त्यांना एकान्तात म्हणाला, “तुम्ही जे पाहत आहात ते पाहणारे डोळे धन्य होत!
24मी तुम्हांला सांगतो, तुम्ही जे पाहत आहात ते पाहण्याची पुष्कळ संदेष्ट्यांनी व राजांनी इच्छा बाळगली तरी त्यांना पाहायला मिळाले नाही; आणि जे तुम्ही ऐकत आहात ते ऐकण्याची इच्छा बाळगली तरी त्यांना ऐकायला मिळाले नाही.”
शाश्वत जीवनप्राप्ती कशी करून घ्यावी?
25मग पाहा, कोणीएक शास्त्री उभा राहिला आणि त्याची परीक्षा पाहण्याकरता म्हणाला, “गुरूजी, काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल?”
26त्याने त्याला म्हटले, “नियमशास्त्रात काय लिहिले आहे? तुझ्या वाचनात काय आले आहे?”
27त्याने उत्तर दिले, “तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण शक्तीने व संपूर्ण बुद्धीने ‘प्रीती कर;’ आणि ‘जशी आपणावर तशी आपल्या शेजार्‍यावर प्रीती कर.”’
28त्याने त्याला म्हटले, “ठीक उत्तर दिलेस; हेच कर म्हणजे जगशील.”
29परंतु स्वतःस नीतिमान ठरवून घ्यावे अशी इच्छा धरून तो येशूला म्हणाला, “पण माझा शेजारी कोण?”
चांगल्या शोमरोन्याचा दृष्टान्त
30येशूने उत्तर दिले, “एक मनुष्य यरुशलेमेहून खाली यरीहोस जात असताना लुटारूंच्या हाती सापडला; त्यांनी त्याचे कपडे काढून घेऊन त्याला मारही दिला आणि त्याला अर्धमेला टाकून ते निघून गेले.
31मग एक याजक सहज त्याच वाटेने खाली जात होता; तो त्याला पाहून दुसर्‍या बाजूने चालता झाला.
32तसाच एक लेवीही त्या ठिकाणी आला आणि त्याला पाहून दुसर्‍या बाजूने चालता झाला.
33मग एक शोमरोनी त्या वाटेने चालला असता, तो होता तेथे आला आणि त्याला पाहून त्याला त्याचा कळवळा आला;
34त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमांना तेल व द्राक्षारस लावून त्या बांधल्या आणि त्याला आपल्या जनावरावर बसवून उतारशाळेत आणले व त्याची काळजी घेतली.
35दुसर्‍या दिवशी त्याने दोन रुपये काढून उतारशाळेच्या रक्षकाला देऊन म्हटले, ‘ह्याची काळजी घ्या; आणि ह्यापेक्षा जे काही अधिक खर्चाल ते मी परत आल्यावर तुम्हांला देईन.’
36तर लुटारूंच्या हाती सापडलेल्या माणसाचा शेजारी ह्या तिघांपैकी तुझ्या मते कोण झाला?”
37तो म्हणाला, “त्याच्यावर दया करणारा तो.” येशूने त्याला म्हटले, “जा आणि तूही तसेच कर.”
मार्था आणि मरीया
38मग ते पुढे जात असता तो एका गावात आला; तेव्हा मार्था नावाच्या एका स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले.
39तिला मरीया नावाची एक बहीण होती; तीही प्रभूच्या चरणांजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली.
40तेव्हा मार्थेला फार काम पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली आणि ती पुढे येऊन म्हणाली, “प्रभूजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे, ह्याची आपल्याला पर्वा नाही काय? मला साहाय्य करायला तिला सांगा.”
41प्रभूने तिला उत्तर दिले, “मार्थे, मार्थे, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करतेस;
42परंतु थोडक्याच गोष्टींचे, किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे; मरीयेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही.”

Aktualisht i përzgjedhur:

लूक 10: MARVBSI

Thekso

Ndaje

Copy

None

A doni që theksimet tuaja të jenë të ruajtura në të gjitha pajisjet që keni? Regjistrohu ose hyr