योहान 2

2
काना येथील लग्न
1तिसऱ्या दिवशी गालीलमधील काना नगरात एक लग्न होते आणि येशूची आई तेथे होती. 2येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते. 3तेथे द्राक्षारस संपला असता येशूची आई त्याला म्हणाली, “त्यांच्याजवळ द्राक्षारस नाही.”
4येशू तिला म्हणाला, “बाई, त्याच्याशी तुझा माझा काय संबंध? माझी वेळ अजून आली नाही.”
5त्याची आई नोकरांना म्हणाली, “तो तुम्हांला जे काही सांगेल ते करा.”
6यहुदी लोकांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे तेथे पाण्याचे सहा दगडी रांजण ठेवलेले होते. त्या प्रत्येकात सुमारे शंभर लिटर पाणी मावेल इतके ते मोठे होते. 7येशू त्यांना म्हणाला, “रांजण पाण्याने भरा.” ते त्यांनी काठोकाठ भरले. 8नंतर त्याने त्यांना सांगितले, “आता थोडे काढून भोजन-कारभाऱ्याकडे न्या.” तेव्हा त्यांनी ते नेले. 9द्राक्षारस बनलेले ते पाणी भोजन- कारभाऱ्याने जेव्हा चाखले (तो द्राक्षारस कुठला आहे, हे त्याला ठाऊक नव्हते, पण पाणी काढणाऱ्या नोकरांना ठाऊक होते), तेव्हा भोजन-कारभारी वराला बोलावून म्हणाला, 10“प्रत्येक मनुष्य प्रथम उत्तम दर्जाचा द्राक्षारस वाढतो आणि लोक द्राक्षारस यथेच्छ प्याले म्हणजे नंतर साधारण दर्जाचा वाढतो. तू तर उत्तम द्राक्षारस आतापर्यंत ठेवला आहेस.”
11येशूने गालीलमधील काना येथे आपले हे पहिले चिन्ह करून आपले वैभव प्रकट केले आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.
12त्यानंतर तो, त्याची आई, त्याचे भाऊ व त्याचे शिष्य कफर्णहूम येथे गेले व तेथे ते काही दिवस राहिले.
मंदिराचे शुद्धीकरण
13यहुदी लोकांचा ओलांडण सण जवळ आला व येशू यरुशलेमला गेला. 14मंदिरात बैल, मेंढरे व कबुतरे विकणारे आणि पैशाची देवघेव करणारे हे सारे बसलेले त्याला आढळले. 15त्याने दोरांचा एक आसूड वळून बैल व मेंढरे ह्यांच्यासह सर्वांना मंदिरातून हाकलून लावले. सराफांचा खुर्दा फेकून दिला व चौरंग पालथे केले. 16तो कबुतरे विकणाऱ्यांना म्हणाला, “ही येथून काढा. माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका.” 17तेव्हा त्याच्या शिष्यांना आठवले की, ‘तुझ्या घराविषयीचा आवेश, हे परमेश्वरा, मला झपाटून टाकील’, असा धर्मशास्त्रलेख आहे.
18यहुद्यांनी त्याला प्रश्‍न विचारला, “हे तुम्ही करता तर आम्हांला कोणते चिन्ह दाखवता?”
19येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही हे मंदिर पाडून टाका आणि तीन दिवसांत मी ते पुन्हा उभारीन.”
20ह्यावरून यहुदी म्हणाले, “हे मंदिर बांधायला सेहेचाळीस वर्षे लागली आणि तुम्ही हे तीन दिवसांत उभारणार काय?”
21तो तर आपल्या शरीररूपी मंदिराविषयी बोलत होता. 22त्याने असे म्हटले होते, हे तो मेलेल्यांतून उठल्यावर त्याच्या शिष्यांना आठवले आणि त्यांनी धर्मशास्त्रावर व येशूच्या वचनावर विश्वास ठेवला.
23ओलांडण सणात यरुशलेम येथे असताना जी चिन्हे तो करत होता, ती पाहून पुष्कळांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला. 24पण येशूला सर्वांचे ज्ञान असल्यामुळे त्याचा त्यांच्यावर भरवसा नव्हता. 25मनुष्यांविषयी कोणी त्याला काही सांगण्याची जरुरी नव्हती कारण त्यांच्या अंतःकरणात काय आहे, हे त्याला ठाऊक होते.

Märk

Dela

Kopiera

None

Vill du ha dina höjdpunkter sparade på alla dina enheter? Registrera dig eller logga in