14
याहवेह येतात आणि राज्य करतात
1याहवेहचा दिवस येत आहे, ज्या दिवशी तुमची संपत्ती लुटली जाईल आणि तुमच्याच भिंतीच्या आत त्याची वाटणी केली जाईल.
2मी यरुशलेमविरुद्ध युद्ध करण्यास सर्व राष्ट्रांना एकत्र करेन; नगर हस्तगत केले जाईल आणि घरे लुटली जातील, स्त्रियांवर बलात्कार करण्यात येईल. नगरीतील अर्धे लोक बंदिवासात जातील, परंतु उरलेले लोक नगरीतच राहतील. 3मग याहवेह बाहेर पडून लढाईच्या दिवशी करतात तसे, त्या राष्ट्रांशी युद्ध करतील. 4त्या दिवशी त्यांचे पाय यरुशलेमच्या पूर्वेस असलेल्या जैतुनाच्या पर्वतावर उभे राहतील आणि जैतूनांचा पर्वत पूर्वपश्चिम दुभागून मध्ये एक मोठे खोरे निर्माण होईल, अर्धा पर्वत उत्तरेकडे व अर्धा पर्वत दक्षिणेकडे सरेल. 5तुम्ही माझ्या खोर्यातून पळ काढाल, कारण ते खोरे आझल नगरीच्या वेशीपर्यंत भिडेल. ज्याप्रमाणे अनेक शतकांपूर्वी तुमचे लोक, यहूदीयाचा राजा उज्जीयाहच्या काळात भूकंप#14:5 किंवा भूकंपामुळे होते त्याप्रमाणे पर्वताची खोरे अडविली जातील झाला होता तेव्हा निसटून गेले होते, त्याचप्रमाणे तुम्हीही निसटून जाल आणि मग याहवेह, माझे परमेश्वर येतील आणि त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व पवित्रजनही येतील.
6त्या दिवशी सूर्यप्रकाश नसेल व थंड, धुक्याचा अंधकारही नसेल. 7तो एक अद्वितीय दिवस असेल—फक्त याहवेहलाच माहीत असलेला तो दिवस असेल—दिवस व रात्रीत फरक राहणार नाही. संध्याकाळ झाली, तरीही प्रकाश असेल.
8त्या दिवशी जीवनजल यरुशलेमातून बाहेर वाहील, त्यातील अर्धे पूर्व दिशेला मृत समुद्राकडे व अर्धे पश्चिम दिशेला भूमध्यसुमद्राकडे वाहतील, उन्हाळ्यात व हिवाळ्यात ते निरंतर वाहत राहतील.
9तेव्हा याहवेह सर्व पृथ्वीचे राजा होतील. त्या दिवशी फक्त एकच याहवेह असतील व केवळ त्यांच्याच नामाची उपासना होईल.
10यहूदीयाच्या उत्तरेकडील सीमेपासून म्हणजे गेबापासून ते दक्षिणेकडील सीमेपर्यंतची म्हणजे रिम्मोन पर्यंतची सर्व भूमी अराबासारखी शुष्क होईल, परंतु यरुशलेम उंचावल्या जाईल, बिन्यामीनच्या वेशीपासून पहिल्या वेशीपर्यंत व कोपर्याच्या वेशीपर्यंत आणि हनानेलाच्या बुरुजापासून शाही द्राक्षकुंडांपर्यंत असेल व या स्थानावर ते अचल राहील. 11तिच्यात लोकवस्ती होईल; पुन्हा कधीही तिचा नाश होणार नाही. यरुशलेम सुरक्षित होईल.
12जे लोक यरुशलेमविरुद्ध लढले, त्या सर्व लोकांवर याहवेह ही मरी पाठवतील: स्वतःच्या पायावर उभे असतानाच त्यांचे मांस सडत जाईल; त्यांचे डोळे त्यांच्या खाचेत सडतील, आणि त्यांच्या जिभा त्यांच्या तोंडातच सडतील. 13याहवेहकडून आलेल्या भयंकर भीतीने त्यांना धडकी भरेल. त्यांची त्रेधा उडून ते एकमेकांवर हल्ला करतील. 14यहूदीयाही यरुशलेमात लढेल. शेजारच्या सर्व राष्ट्रांची संपत्ती—सोने आणि रुपे व तलम कपडे यांचे मोठमोठे साठे जप्त केले जातील. 15अशीच मरी घोडे, खेचरे, उंट, गाढवे यावर आणि शत्रूच्या ठाण्यातील इतर सर्व प्राण्यांवर पसरेल.
16मग ज्यांनी यरुशलेमवर आक्रमण केले त्या सर्व राष्ट्रातून वाचलेले अवशिष्ट लोक प्रत्येक वर्षी वर यरुशलेमला राजाधिराज सर्वसमर्थ याहवेहची भक्ती करण्यास, मंडपाचा सण पाळण्यास व आराधना करण्यास जातील. 17आणि या संपूर्ण जगातील एखाद्या राष्ट्रातील लोकांनी यरुशलेमला येण्याचे व राजाधिराज सर्वसमर्थ याहवेहची आराधना करण्याचे नाकारले, तर त्यावर पर्जन्यवृष्टी होणार नाही. 18जर इजिप्तच्या लोकांनी येण्याचे नाकारले तर त्यांना पर्जन्यवृष्टी मिळणार नाही. याहवेह त्यांच्यावर मरी पाठवतील, जे मंडपाचा सण पाळण्यास यरुशलेमला येण्याचे नाकारतात. 19म्हणून इजिप्त व इतर राष्ट्रे जे मंडपाचा सण पाळण्यास यरुशलेमला येण्याचे नाकारतील, त्या सर्वांना ही शिक्षा करण्यात येईल.
20त्या दिवशी घोड्यांच्या गळ्यात घातलेल्या घंटावर “याहवेहसाठी पवित्र” असे लिहिलेले असेल आणि याहवेहच्या भवनातील सर्व स्वयंपाकाची भांडी वेदीपुढे ठेवावयाच्या पवित्र कटोर्यांसारखी होतील. 21यरुशलेम व यहूदीयातील प्रत्येक पातेले सर्वसमर्थ याहवेहला पवित्र वाटेल; आराधना करण्यासाठी येणारे लोक त्यातील पात्र घेऊन व त्यात त्यांची अर्पणे शिजवतील. यापुढे सर्वसमर्थ याहवेहच्या भवनात कोणीही कनानी#14:21 किंवा व्यापारी नसतील.