Biểu trưng YouVersion
Biểu tượng Tìm kiếm

लूक 17

17
येशूची काही वचने
1येशूने शिष्यांना म्हटले, “लोकांना पापाला प्रवृत्त करण्याऱ्या गोष्टी घडणार, पण ज्याच्यामुळे त्या घडतात त्याला केवढे क्लेश होणार! 2त्याने ह्या लहानांतील एकाला पापासाठी प्रवृत्त करावे, ह्यापेक्षा त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात फेकावे, ह्यात त्याचे हित आहे. 3तू स्वतःला सांभाळ. तुझ्या भावाने अपराध केला, तर त्याचा दोष त्याला दाखवून त्याची कानउघाडणी कर आणि त्याने पश्चात्ताप केला तर त्याला क्षमा कर. 4त्याने दिवसातून सात वेळा तुझ्याविरुद्ध अपराध केला आणि सात वेळा तुझ्याकडे परत येऊन, मला पश्चात्ताप झाला आहे, असे म्हटले, तरी तू त्याला क्षमा करायला हवी.”
5प्रेषित प्रभूला म्हणाले, “आमचा विश्वास वाढव.”
6प्रभू म्हणाला, “तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असेल, तर ह्या तुतीच्या झाडाला ‘तू मुळासकट उपटून समुद्रात लावले जा’, असे तुम्ही सांगताच ते तुमचे ऐकेल.
7तुमच्यापैकी असा कोण आहे की, त्याचा नांगरणारा किंवा मेंढरे राखणारा नोकर शेतातून आल्यावर तो त्याला म्हणेल, ‘लवकर येऊन जेवायला बस?’ 8किंबहुना ‘माझे जेवण तयार कर. माझे खाणेपिणे होईपर्यंत कमरेभोवती बाह्यवस्त्र बांधून माझी सेवा कर आणि मग तू खा व पी’, असे तो त्याला म्हणणार नाही काय? 9सांगितलेली कामे नोकराने केली म्हणून तो त्याचे आभार मानतो काय? 10त्याप्रमाणे तुम्हांला सांगितलेली सर्व कामे केल्यावर, ‘आम्ही अपात्र नोकर आहोत, आम्ही फक्त आमचे कर्तव्य केले आहे’, असे म्हणा.”
दहा कुष्ठरोगी
11येशू यरुशलेमकडे जात असता शोमरोन व गालीलच्या सरहद्दीवरून गेला. 12तो एका गावात जात असता कुष्ठरोग झालेले दहा पुरुष त्याला दूरू न भेटले. 13ते ओरडून म्हणाले, “अहो येशू, प्रभो, आमच्यावर दया करा.”
14त्याने त्यांना पाहून म्हटले, “तुम्ही जाऊन स्वतःला याजकांना दाखवा.” त्यानंतर असे झाले की, ते जाता जाता शुद्ध झाले. 15त्यांतील एक जण आपण बरे झालो आहोत, असे पाहून उच्च स्वराने देवाचा महिमा वर्णन करीत परत आला. 16येशूचे आभार मानून तो त्याच्या चरणांवर पालथा पडला. हा तर शोमरोनी होता. 17येशूने म्हटले, “दहा जण शुद्ध झाले होते ना? इतर नऊ जण कुठे आहेत? 18हा परका एकटाच देवाचा गौरव करायला परत आला, हे कसे काय?” 19येशूने त्याला म्हटले, “ऊठ, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.”
देवाच्या राज्याचे आगमन
20देवाचे राज्य केव्हा येईल, असे परुश्यांनी त्याला विचारले असता त्याने त्यांना उत्तर दिले, “देवाचे राज्य दृश्य रूपात येत नाही. 21‘पाहा, ते येथे आहे’ किंवा ‘ते तेथे आहे’ असे म्हणता येत नाही. पाहा, देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे.”
22पुढे त्याने शिष्यांना म्हटले, “असे दिवस येणार आहेत की, मनुष्याच्या पुत्राच्या दिवसांपैकी एक दिवस पाहण्याची तुम्ही इच्छा बाळगाल, पण तो दिवस तुम्हांला दिसणार नाही. 23काही जण तुम्हांला म्हणतील, ‘पाहा, तो तेथे आहे! पाहा, तो येथे आहे!’ तर तुम्ही जाऊ नका व त्यांच्यामागे लागू नका. 24वीज जशी आकाशाच्या एका बाजूपासून दुसऱ्या बाजूपर्यंत चमकते, तसेच मनुष्याच्या पुत्राचेही त्याच्या दिवशी होईल. 25तथापि त्याने प्रथम फार दुःख भोगावे व ह्या पिढीकडून नाकारले जावे, हे क्रमप्राप्त आहे. 26नोहाच्या दिवसांत झाले, तसे मनुष्याच्या पुत्राच्या दिवसांतही होईल. 27नोहा तारवात गेला आणि जलप्रलय येऊन सर्वांचा नाश केला. त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करत होते व लग्न लावून देत होते. 28तसेच ज्याप्रमाणे लोटच्या दिवसांत झाले, त्याप्रमाणे होईल, म्हणजे ते लोक खातपीत होते, खरेदी करत होते, विकत होते, लागवड करत होते, घरे बांधत होते. 29परंतु ज्या दिवशी लोट सदोमातून निघाला त्याच दिवशी आकाशातून अग्नी व गंधक ह्यांची वृष्टी होऊन सर्वांचा नाश झाला. 30मनुष्याचा पुत्र प्रकट होईल, त्या दिवशी असेच होईल.
31त्या दिवशी जो छपरावर असेल, त्याने आपले सामान नेण्याकरिता खाली घरात जाऊ नये. तसेच जो शेतात असेल त्याने आपल्या सामानासाठी घराकडे परत जायला निघू नये. 32लोटच्या पत्नीची आठवण करा. 33जो कोणी आपला जीव वाचवायचा प्रयत्न करील, तो आपल्या जिवाला मुकेल आणि जो कोणी आपल्या जिवाला मुकेल, तो आपला जीव वाचवील. 34मी तुम्हांला सांगतो, त्या रात्री एका खाटेवर दोघे असतील. एक घेतला जाईल व दुसरा तेथेच ठेवला जाईल. 35दोघी मिळून दळत असतील. एक घेतली जाईल व दुसरी तेथेच ठेवली जाईल. 36[दोन पुरुष शेतात असतील. एक घेतला जाईल, दुसरा तेथेच ठेवला जाईल.]”
37त्यांनी त्याला म्हटले, “प्रभो, कुठे?” त्याने त्यांना म्हटले, “जेथे मढे तेथे गिधाडे.”

Tô màu

Chia sẻ

Sao chép

None

Bạn muốn lưu những tô màu trên tất cả các thiết bị của mình? Đăng ký hoặc đăng nhập