Biểu trưng YouVersion
Biểu tượng Tìm kiếm

लूक 21

21
विधवेचे दान
1येशूने दृष्टी वर करून धनवानांना मंदिराच्या दानपेटीत दाने टाकताना पाहिले. 2एका गरीब विधवेलाही तेथे दोन तांब्याची छोटी नाणी टाकताना त्याने पाहिले. 3तेव्हा तो म्हणाला, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, ह्या गरीब विधवेने सर्वांपेक्षा अधिक टाकले आहे. 4कारण त्या सर्वांनी आपल्या समृद्धीतून दानात टाकले. हिने तर तिच्या गरीब अवस्थेत तिच्याकडे उपजीविकेसाठी जे काही होते, ते सर्व टाकले आहे.”
यरुशलेमचा विध्वंस व युगाचा अंत
5सुरेख दगडांनी व देवाला समर्पित केलेल्या भेटवस्तूंनी मंदिर कसे सुशोभित केलेले आहे, ह्याविषयी कित्येक जण बोलत होते. येशू म्हणाला, 6“असे दिवस येतील की, जे तुम्ही पाहत आहात त्यातला पाडला जाणार नाही असा चिऱ्यावर चिरा राहणार नाही.”
7तेव्हा त्यांनी त्याला विचारले, “गुरुवर्य, ह्या गोष्टी केव्हा घडतील? ज्या काळी ह्या गोष्टी घडून येतील, त्या काळाचे चिन्ह काय?”
8तो म्हणाला, “तुम्हांला कोणी बहकवू नये म्हणून सावध राहा. माझ्या नावाने पुष्कळ लोक येऊन मी तो आहे आणि तो काळ जवळ आला आहे, असे म्हणतील. त्यांच्या नादी लागू नका. 9जेव्हा तुम्ही लढाया व बंड यांच्याविषयी ऐकाल तेव्हा घाबरू नका कारण ह्या गोष्टी प्रथम होणे आवश्यक आहे. तथापि एवढ्यात शेवट होत नाही.”
10तो पुढे म्हणाला, “राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल. 11मोठमोठे भूकंप होतील. जागोजागी साथी येतील व दुष्काळ पडतील. भयंकर उत्पात व आकाशात महान चिन्हे घडून येतील. 12परंतु हे सर्व होण्यापूर्वी ते तुमच्यावर हात टाकतील. तुमचा छळ करतील. तुम्हांला चौकशीसाठी सभास्थानांच्या स्वाधीन करतील. तुरुंगात डांबतील. माझ्या नावाकरिता राजे व अधिकारी ह्यांच्यापुढे हजर करतील. 13ह्यामुळे तुम्हांला साक्ष देण्याची संधी मिळेल. 14त्या वेळी उत्तर कसे द्यावे, ह्याविषयी आधीच विचार करायचा नाही, असा मनाचा निर्धार करा. 15मी तुम्हांला अशी वाचा व बुद्धी देईन की, तिला रोखण्यास किंवा तिच्या विरुद्ध बोलण्यास तुमचे कोणीही विरोधक समर्थ होणार नाहीत. 16आईबाप, भाऊबंद, नातलग व मित्र हेदेखील तुम्हांला धरून देतील. तुमच्यांतील कित्येकांना ठार मारतील. 17माझ्या नावामुळे सर्व तुमचा द्वेष करतील. 18तरीदेखील तुमच्या डोक्यावरचा एक केसही गळणार नाही. 19टिकून राहा म्हणजे तुम्ही स्वतःचा बचाव कराल.
20मात्र यरुशलेम नगरीस सैन्यांचा वेढा पडत आहे, असे तुम्ही पाहाल तेव्हा ती ओसाड पडण्याची वेळ जवळ आली आहे, असे समजा. 21त्या समयी जे यहुदियात असतील, त्यांनी डोंगरात पळून जावे. जे यरुशलेममध्ये असतील, त्यांनी बाहेर निघून जावे व जे शिवारात असतील त्यांनी नगराच्या आत येऊ नये. 22धर्मशास्त्रलेखांतल्या सर्व गोष्टी पूर्ण होण्यासाठी हे न्यायनिवाड्याचे दिवस असतील. 23त्या दिवसांत ज्या स्त्रिया गरोदर व अंगावर पाजणाऱ्या असतील, त्यांची केवढी दुर्दशा होणार! देशावर मोठे संकट येईल व ह्या लोकांवर कोप होईल. 24काही तलवारीच्या धारेला बळी पडतील आणि इतरांना बंदिवान करून अन्य राष्ट्रांमध्ये नेण्यात येईल. परराष्ट्रीयांचे वर्चस्व संपुष्टात येईल. तोवर परराष्ट्रीय यरुशलेम नगरास पायांखाली तुडवतील.
25त्या समयी सूर्य, चंद्र व तारे ह्यांत विलक्षण गोष्टी घडून येतील आणि पृथ्वीवर समुद्र व लाटा ह्यांच्या गर्जनेने राष्ट्रे गोंधळून जाऊन पेचात पडतील. 26भयाने व जगावर कोसळणाऱ्या अरिष्टांची धास्ती घेतल्यामुळे माणसे मरणोन्मुख होतील. आकाशातील शक्‍तिस्थाने डळमळतील. 27त्या काळी मनुष्याचा पुत्र सामर्थ्याने व मोठ्या वैभवाने मेघांत येताना लोकांच्या दृष्टीस पडेल. 28ह्या घटनांचा आरंभ होऊ लागेल, तेव्हा न डगमगता उभे राहा आणि आत्मविश्वासाने सामोरे जा कारण तुमचा मुक्तिसमय जवळ आलेला असेल.”
जागृतीची आवश्यकता
29नंतर येशूने त्यांना आणखी एक दाखला सांगितला: “अंजिराचे झाड व इतर सर्व झाडे ह्यांच्याकडे पहा. 30त्यांना पालवी फुटू लागली म्हणजे ते पाहून तुमचे तुम्हीच ओळखता की, आता उन्हाळा जवळ आला आहे. 31तसेच ह्या घडामोडी घडताना पाहाल तेव्हा तुम्ही ओळखाल की, देवाचे राज्य जवळ आले आहे.
32मी निश्चितपणे सांगतो, ही पिढी नष्ट होण्यापूर्वी ह्या सर्व घटना घडतील. 33आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, परंतु माझी वचने नाहीशी होणार नाहीत.
34तुम्ही सांभाळा, नाहीतर कदाचित चैनबाजी, दारुबाजी व संसाराच्या चिंता ह्यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुम्हांला अकस्मात गाठील. 35तो अवघ्या पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व लोकांवर त्याप्रमाणे येईल. 36तुम्ही तर होणाऱ्या ह्या सर्व घडामोडी चुकवायला व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहायला समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा.”
37येशू दिवसा मंदिरात शिक्षण देत असे आणि रात्री बाहेर जाऊन ज्याला ऑलिव्ह डोंगर म्हणतात, तेथे राहात असे 38आणि सर्व लोक त्याचे प्रबोधन ऐकण्यास भल्या पहाटेस त्याच्याकडे मंदिरात येत असत.

Tô màu

Chia sẻ

Sao chép

None

Bạn muốn lưu những tô màu trên tất cả các thiết bị của mình? Đăng ký hoặc đăng nhập