Biểu trưng YouVersion
Biểu tượng Tìm kiếm

मत्तय 2

2
खगोल शास्त्रज्ञांची ख्रिस्ताशी भेट
1येशूंचा जन्म हेरोद राजाच्या कारकिर्दीत, यहूदीया प्रांतातील बेथलेहेम नावाच्या गावी झाल्यानंतर, पूर्वेकडून खगोलशास्त्रज्ञ#2:1 खगोलशास्त्रज्ञ किंवा ज्ञानी लोक यरुशलेमात आले. 2ते विचारू लागले, “ज्यांचा जन्म झाला आहे ते यहूद्यांचे राजे कुठे आहेत? आम्ही त्यांचा तारा पाहिला आणि त्यांची उपासना करावयास आलो आहोत.”
3हेरोद राजाने हे ऐकले तेव्हा तो अस्वस्थ झाला आणि त्याच्याबरोबरच सर्व यरुशलेमही अस्वस्थ झाले. 4हेरोदाने सर्व यहूदी लोकांचे महायाजक व नियमशास्त्र शिक्षकांना एकत्र बोलाविले आणि विचारले, “ख्रिस्ताचा जन्म कुठे व्हावा?” 5“यहूदीयातील बेथलेहेमात,” त्यांनी उत्तर दिले, “कारण संदेष्ट्याने असे लिहिले आहे:
6“ ‘परंतु तू यहूदीया प्रांतातील बेथलेहेमा,
यहूदीयांच्या शासकांमध्ये तू कोणत्याही प्रकारे कमी नाही,
तुझ्यातून एक शासक उदय पावेल,
तो माझ्या इस्राएली लोकांचा मेंढपाळ होईल.’ ”#2:6 मीखा 5:2, 4
7मग हेरोदाने त्या खगोल शास्त्रज्ञांना खासगी निरोप पाठवून बोलावून घेतले आणि तारा नक्की कोणत्या वेळी प्रकट झाला याची माहिती मिळविली. 8मग हेरोदाने त्यांना बेथलेहेमात पाठविले आणि म्हणाला, “जा आणि त्या बालकाचा बारकाईने शोध करा; तो सापडल्यावर, इकडे परत या आणि मला सांगा, म्हणजे मी सुद्धा जाऊन त्यांची उपासना करेन.”
9राजाचे सर्व बोलणे ऐकल्यानंतर ते शास्त्रज्ञ पुढे निघाले, जो तारा त्यांनी पाहिला होता, तो तारा बालक जिथे होता, तिथे येईपर्यंत त्यांच्यापुढे चालला. 10तो तारा पाहून त्यांना फार आनंद झाला. 11ज्या घरात बालक व त्याची आई मरीया होती, तिथे ते गेले आणि त्यांनी दंडवत घालून त्याला नमन केले. नंतर त्यांनी आपले नजराणे उघडले आणि बालकाला सोने, ऊद व गंधरस हे अर्पण केले. 12पण स्वप्नाद्वारे हेरोदाकडे न जाण्याची सूचना मिळाल्यामुळे ते दुसर्‍या रस्त्याने त्यांच्या देशी परत गेले.
इजिप्तला पलायन
13ते गेल्यानंतर, प्रभूचा एक दूताने योसेफाला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, “ऊठ! बालकाला आणि त्याच्या आईला घेऊन इजिप्त देशात पळून जा आणि मी तुला सांगेपर्यंत तिथेच राहा, कारण हेरोद बालकाचा शोध करून ठार मारण्याचा कट करीत आहे.”
14तेव्हा तो उठला, त्याच रात्री योसेफ बालकाला आणि मरीयेला घेऊन इजिप्त देशात निघून गेला. 15हेरोद राजाचा मृत्यू होईपर्यंत तो तिथेच राहिला आणि अशाप्रकारे, “मी इजिप्तमधून माझ्या पुत्राला बोलाविले!”#2:15 होशे 11:1 असे जे प्रभूने आपल्या संदेष्ट्यांच्याद्वारे सांगितले होते, ते भविष्य पूर्ण झाले.
16शास्त्रज्ञांनी आपल्याला फसविले, हे पाहून हेरोद राजा संतापला आणि शास्त्रज्ञांनी दिलेल्या वेळेनुसार बेथलेहेम आणि आसपासच्या प्रदेशात दोन वर्षे किंवा कमी वय असलेल्या प्रत्येक मुलाला ठार करण्याचा त्याने हुकूम केला. 17संदेष्टा यिर्मयाह याच्याद्वारे जे सांगितले होते, ती भविष्यवाणी खरी ठरली ती अशी:
18“रामाह मधून आवाज ऐकू येत आहे,
आकांत आणि घोर शोक,
राहेल आपल्या लेकरांसाठी रडत आहे.
ती सांत्वन पावण्यास नकार देते,
कारण ते आता राहिले नाहीत.”#2:18 यिर्म 31:15
नासरेथला परतणे
19हेरोद मरण पावल्यानंतर, प्रभूच्या दूताने योसेफाला इजिप्तमध्ये पुन्हा स्वप्नात दर्शन दिले, 20आणि सांगितले, “ऊठ, बालक व त्याच्या आईला घेऊन इस्राएल देशात परत जा, कारण बालकाचा जीव घेण्यास जे पाहत होते, ते मरण पावले आहेत.”
21त्याप्रमाणे तो उठला, बालक व त्याच्या आईला घेऊन इस्राएल देशामध्ये परतला. 22परंतु यहूदीया प्रांतात हेरोदा ऐवजी त्याचा पुत्र अर्खेलाव राज्य करीत आहे हे त्याला समजले, तेव्हा तिकडे जाण्यास त्याला भीती वाटली. मग स्वप्नात त्यांना अशी सूचना मिळाली म्हणून तिकडे न जाता तो गालील प्रांतात गेला. 23आणि ते नासरेथ या गावात राहिले. संदेष्ट्यांनी केलेले भविष्य पूर्ण झाले ते असे: “त्यांना नासरेथकर म्हणतील.”

Tô màu

Chia sẻ

Sao chép

None

Bạn muốn lưu những tô màu trên tất cả các thiết bị của mình? Đăng ký hoặc đăng nhập