የYouVersion አርማ
የፍለጋ አዶ

लूक 17

17
पाप, विश्वास, कर्तव्य
1येशू आपल्या शिष्यांना म्हणाले, “लोकांना अडखळण होतील अशा गोष्टी निश्चितच येतीलच, परंतु ज्याच्याद्वारे अडखळण येईल, त्याचा धिक्कार असो. 2जो कोणी या लहानातील एकालाही अडखळण करतो, त्याच्या गळ्यात जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात फेकून द्यावे हे त्याच्या अधिक हिताचे ठरेल. 3म्हणूनच तुम्ही स्वतःला सांभाळा.
“तुझ्या भावाने किंवा बहिणीने पाप केले, तर त्यांचा निषेध कर आणि त्यांनी पश्चात्ताप केला, तर त्यांना क्षमा कर. 4त्याने दिवसातून सात वेळा तुझ्याविरुद्ध पाप केले आणि सात वेळा परत क्षमेची याचना करून म्हटले ‘मी पश्चात्ताप केला आहे,’ तर तू त्याला क्षमा कर.”
5एके दिवशी शिष्य प्रभूला म्हणाले, “आमचा विश्वास वाढवा.”
6प्रभू येशूंनी उत्तर दिले, “तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्याएवढा जरी विश्वास असला, तरी या तुतीच्या झाडाला म्हणाल की ‘तू उपटून समुद्रात लावला जा,’ तरी ते तुमची आज्ञा पाळील.
7“समजा, तुमच्यापैकी एकाजवळ शेत नांगरण्यासाठी किंवा मेंढरे राखण्यासाठी एक नोकर आहे. आपला नोकर शेतावरून आल्यानंतर, ‘ये, भोजनास बस,’ असे त्याचा धनी त्याला म्हणेल काय? 8याउलट तो असे म्हणणार नाही का, ‘माझे भोजन तयार कर, स्वतः तयार हो आणि मी खात आणि पीत असताना माझी सेवा कर, त्यानंतर तू खा आणि पी’? 9सांगितलेले काम केल्याबद्दल तो आपल्या दासाचे आभार मानेल काय? 10अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला सांगितलेले सर्व काम केल्यानंतर, ‘आम्ही अपात्र दास आहोत, आम्ही फक्त आमचे कर्तव्य बजावले आहे, असे म्हणा.’ ”
येशू दहा कुष्ठरोग्यांना बरे करतात
11यरुशलेमकडे वाटचाल करत येशू प्रवास करीत गालील प्रांत आणि शोमरोनच्या हद्दीवर आले. 12ते गावात जात असताना, काही अंतरावर उभे असलेले दहा कुष्ठरोगी त्यांना भेटले. 13हे कुष्ठरोगी येशूंना मोठ्याने हाक मारून म्हणत होते, “येशू महाराज, आमच्यावर दया करा!”
14त्यांना पाहून येशू म्हणाले, “तुम्ही याजकाकडे जा आणि त्याला दाखवा.” आणि ते वाटेत जात असतानाच त्यांचा कुष्ठरोग नाहीसा झाला.
15त्यांच्यापैकी एकाने आपण शुद्ध झालो आहोत असे पाहिले, तेव्हा तो उच्चस्वराने परमेश्वराची स्तुती करीत परत आला. 16तो येशूंच्या पायाजवळ पालथा पडला आणि त्याने त्यांचे आभार मानले—तो एक शोमरोनी होता.
17येशूंनी विचारले, “मी दहा लोकांना शुद्ध केले ना? मग बाकीचे नऊ कुठे आहेत? 18परमेश्वराचे गौरव करण्यासाठी हा एकटाच आणि तोही परकीय मनुष्य आला काय?” 19मग येशू त्याला म्हणाले, “ऊठ आणि जा; तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.”
परमेश्वराच्या राज्याचे आगमन
20काही परूश्यांनी विचारले, “परमेश्वराचे राज्य केव्हा येईल?” तेव्हा येशूंनी उत्तर दिले, “दृश्य रूपाने नजरेस पडेल अशा रीतीने परमेश्वराचे राज्य येत नाही, 21परमेश्वराचे राज्य, ‘ते येथे’ किंवा ‘ते तिथे’ आहे, असे लोक म्हणणार नाहीत, कारण परमेश्वराचे राज्य तुम्हामध्ये आहे.”
22ते शिष्यांना म्हणाले, “अशी वेळ येत आहे की, मानवपुत्राच्या राज्याचा एक दिवस पाहावा अशी तुम्हाला उत्कंठा लागेल, परंतु तुम्हाला ते दिसणार नाही. 23लोक तुम्हाला सांगतील, ‘तो येथे आहे’ किंवा ‘तो तिथे आहे’ त्यांच्यामागे धावत इकडे तिकडे जाऊ नका. 24कारण वीज चमकली म्हणजे आकाशाच्या एका सीमेपासून दुसर्‍या सीमेपर्यंत प्रकाशते, तशाच प्रकारे मानवपुत्राच्या दिवसात होईल. 25परंतु प्रथम त्याने अनेक दुःखे सोसणे आणि या पिढीकडून नाकारले जाणे आवश्यक आहे.
26“जसे नोआहच्या दिवसात घडत होते, तसेच मानवपुत्र येण्याच्या दिवसात होईल. 27नोआह प्रत्यक्ष तारवात गेला, त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते. नंतर जलप्रलय आला व त्या सर्वांचा नाश झाला.
28“त्याचप्रमाणे लोटाच्या दिवसातही असेच झाले. लोक खातपीत होते, विकत घेत होते, विकत देत होते, पेरणी करीत होते, घरे बांधत होते. 29ज्या दिवशी लोटाने सदोम शहर सोडले, त्याच दिवशी अग्नी आणि गंधकाचा स्वर्गातून वर्षाव झाला आणि त्या सर्वांचा नाश झाला.
30“मानवपुत्र प्रकट होईल त्या दिवशीही हे अशाच प्रकारे असेल. 31त्या दिवशी जो कोणी घराच्या छपरावर असेल, त्याने सामान घेण्यासाठी घरात जाऊ नये. त्याचप्रमाणे शेतात काम करणार्‍याने कशासाठीही परत जाऊ नये. 32लोटाच्या पत्नीची आठवण ठेवा! 33जो कोणी आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न करेल तो आपल्या जीवाला मुकेल, पण जो कोणी आपल्या जीवाला गमावेल, तो त्याचा जीव वाचवेल. 34मी तुम्हाला सांगतो की, त्या रात्री दोघेजण एका अंथरुणात झोपलेले असतील; एक घेतला जाईल व दुसरा ठेवला जाईल. 35जात्यावर एकत्र धान्य दळीत बसलेल्या दोन स्त्रियांपैकी एकीला घेतले जाईल व दुसरीला ठेवले जाईल. 36दोघेजण शेतात असतील; एकाला घेतले जाईल व दुसर्‍याला ठेवले जाईल.”#17:36 हे वचन काही प्राचीन हस्तलिखितांमध्ये आढळत नाही
37यावर शिष्यांनी त्यांना विचारले, “गुरुजी, त्यांना कुठे नेण्यात येईल?”
येशूंनी उत्तर दिले, “जिथे मृतदेह आहे, तिथे गिधाडे जमतील.”

Currently Selected:

लूक 17: MRCV

ማድመቅ

Share

Copy

None

ያደመቋቸው ምንባቦች በሁሉም መሣሪያዎችዎ ላይ እንዲቀመጡ ይፈልጋሉ? ይመዝገቡ ወይም ይግቡ