YouVersion Logo
Search Icon

१ करिंथ 8

8
मूर्तीला दाखवलेले नैवेद्य
1आता मूर्तीला दाखवलेल्या नैवेद्यांविषयी : “आपल्या सर्वांना ज्ञान आहे” हे आपल्याला ठाऊक आहे. “ज्ञान” फुगवते, प्रीती उन्नत्ती करते.
2जर कोणाला वाटत असेल की, आपल्याला एखादी गोष्ट कळते तर ज्याप्रमाणे कळले पाहिजे त्याप्रमाणे त्याला अद्याप कळत नाही.
3जर कोणी देवावर प्रीती करत असेल तर देवाला त्याची ओळख झालेली आहे.1
4आता मूर्तीला दाखवलेले नैवेद्य खाण्यासंबंधाने आपल्याला ठाऊक आहे की, “जगात (देवाची) म्हणून मूर्तीच नाही;”2 आणि “एकाखेरीज दुसरा देव नाही.”
5कारण ज्यांना देव म्हणून म्हणतात असे स्वर्गात किंवा पृथ्वीवर जरी असले, आणि अशी बरीच “दैवते” व बरेच “प्रभू” आहेतच,
6तरी आपला एकच देव म्हणजे पिता आहे, त्याच्यापासून अवघे झाले व आपण त्याच्यासाठी आहोत; आणि आपला एकच प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याच्या द्वारे अवघे झाले व आपण त्याच्या द्वारे आहोत.
दुर्बळ बंधूच्या मनाची चलबिचल होऊ नये म्हणून खबरदारी
7तथापि हे ज्ञान सर्वांच्या ठायी असते असे नाही; तर कित्येकांवर मूर्तिपूजेच्या सवयीचा संस्कार अजून राहिल्यामुळे ते मूर्तीला दाखवलेला नैवेद्य म्हणून खातात; तेव्हा त्यांची सदसद्विवेकबुद्धी दुर्बळ असल्यामुळे ती विटाळते.
8देवापुढे आपली योग्यायोग्यता अन्नाने ठरत नाही; न खाण्याने आपण कमी होत नाही, आणि खाण्याने आपण अधिक होत नाही.
9तरी ही तुमची मोकळीक दुर्बळांना ठेच लागण्याचे कारण होऊ नये म्हणून जपा.
10कारण सुज्ञ असा जो तू त्या तुला मूर्तीच्या देवळात जेवायला बसलेले कोणी पाहिले, तर तो दुर्बळ असल्यास, मूर्तीला दाखवलेले नैवेद्य खाण्यास त्याच्या सदसद्विवेकबुद्धीला चालना मिळेल ना?
11ह्याप्रमाणे ज्याच्यासाठी ख्रिस्त मरण पावला असा जो दुर्बळ बंधू, त्याचा तुझ्या ह्या ज्ञानाच्या योगे नाश होतो.
12बंधूंविरुद्ध असे पाप करून व त्यांच्या दुर्बळ सदसद्विवेकबुद्धीला धक्का देऊन तुम्ही ख्रिस्ताविरुद्ध पाप करता.
13म्हणून अन्नामुळे माझ्या बंधूला अडखळण होत असेल तर मी आपल्या बंधूला अडखळवू नये म्हणून मी मांस कधीच खाणार नाही.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in