YouVersion Logo
Search Icon

1 थेस्सल 2

2
आपल्या सुवार्ताप्रसाराच्या कार्याचे पौल समर्थन करतो
1बंधुजनहो, तुमच्यामध्ये आमचे येणे व्यर्थ झाले नाही, हे तुम्हा स्वत:लाही माहीत आहे.
2परंतु पूर्वी फिलिप्पैत आम्ही दु:ख भोगून व उपमर्द सोसून, (हे तुम्हांला माहीतच आहे,) मोठ्या कष्टात असता देवाची सुवार्ता तुम्हांला सांगण्याचे धैर्य आपल्या देवाकडून आम्हांला मिळाले.
3कारण आमचा बोध भ्रांती अथवा अमंगलपणा ह्यांतून निर्माण झालेला नसून कपटाचा नव्हता;
4तर सुवार्ता आमच्यावर सोपवून देण्यास देवाने आम्हांला पारखून पसंत केल्यामुळे आम्ही ती सांगतो; आम्ही माणसांना खूश करण्यासारखे न बोलता आमची अंतःकरणे पारखणारा देव हा ज्यामुळे खूश होईल असे बोलतो.
5कारण आम्ही आर्जवाचे भाषण कधी करत नव्हतो, हे तुम्हांला माहीत आहे; तसेच लोभाने कपटवेष धारण करत नव्हतो, देव साक्षी आहे;
6आम्ही ख्रिस्ताचे प्रेषित असल्यामुळे जरी आमचे वजन पडण्यासारखे होते तरी माणसांपासून म्हणजे तुमच्यापासून किंवा दुसर्‍यांपासून गौरव मिळवण्याची खटपट आम्ही करत नव्हतो.
7तर आपल्या मुलाबाळांचे लालनपालन करणार्‍या दाईसारखे आम्ही तुमच्यामध्ये सौम्य वृत्तीचे होतो.
8आम्हांला तुमच्याविषयी कळकळ वाटत असल्यामुळे आम्ही तुम्हांला केवळ देवाच्या सुवार्तेचे दानच देण्यास नव्हे, तर तुमच्यावरील आमच्या अत्यंत प्रीतीमुळे तुमच्याकरता आपला जीवही देण्यास राजी होतो.
9बंधूंनो, आमचे श्रम व कष्ट ह्यांची आठवण तुम्हांला आहे; तुमच्यातील कोणाला आमचा भार होऊ नये म्हणून आम्ही रात्रं-दिवस कामधंदा करून तुमच्यापुढे देवाच्या सुवार्तेची घोषणा केली.
10तुम्हा विश्वास ठेवणार्‍यांत आम्ही पवित्रतेने, नीतीने व निर्दोषतेने कसे वागलो ह्याविषयी तुम्ही साक्षी आहात, व देवही आहे.
11तुम्हांला ठाऊकच आहे की, बाप आपल्या मुलांना करतो तसे आम्ही तुमच्यापैकी प्रत्येकाला बोध करत, धीर देत व आग्रहपूर्वक विनंती करत सांगत होतो की,
12जो देव आपल्या राज्यात व गौरवात तुम्हांला पाचारण करत आहे त्याला शोभेल असे तुम्ही चालावे.
छळ
13ह्या कारणांमुळे आम्हीही देवाची निरंतर उपकारस्तुती ह्यामुळे करतो की, तुम्ही आमच्यापासून ऐकलेले देवाचे वचन स्वीकारले ते माणसांचे म्हणून नव्हे तर देवाचे म्हणून स्वीकारले, आणि वास्तविक ते तसेच आहे; ते तुम्हा विश्वास ठेवणार्‍यांत कार्य करत आहे.
14बंधूंनो, यहूदीयातील देवाच्या ज्या मंडळ्या ख्रिस्त येशूच्या ठायी आहेत त्यांचे तुम्ही अनुकरण करणारे झालात, म्हणजे त्यांनी यहूद्यांच्या हातून जी दु:खे सोसली तीच तुम्हीही आपल्या देशबांधवांच्या हातून सोसली.
15त्या यहूद्यांनी प्रभू येशूला व संदेष्ट्यांनाही जिवे मारले आणि आमचा छळ करून आम्हांला बाहेर घालवले; देवाला जे प्रिय ते, ते करत नाहीत व ते सर्व माणसांचेही विरोधी झाले आहेत.
16परराष्ट्रीयांचे तारण व्हावे म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर बोलतो, ते बोलण्याची ते मनाई करतात; हे ह्यासाठी की, त्यांनी आपल्या पापांचे माप सर्वदा भरत राहावे. त्यांच्यावरील क्रोधाची परिसीमा झाली आहे.
पौलाचे आपल्या वाचकांकडे लक्ष
17बंधुजनहो, आम्ही हृदयाने नव्हे तर देहाने तुमच्यापासून थोडा वेळ वेगळे झाल्याने आम्हांला विरहदुःख होऊन तुमचे तोंड पाहण्याचा आम्ही फार उत्कंठेने विशेष प्रयत्न केला;
18ह्यामुळे आम्ही तुमच्याकडे येण्याचे इच्छिले; मी पौलाने एकदा नाही तर दोनदा इच्छिले; परंतु सैतानाने आम्हांला अडवले.
19कारण आमची आशा किंवा आमचा आनंद किंवा आमच्या अभिमानाचा मुकुट काय आहे? आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनसमयी त्याच्यासमोर तुम्हीच आहात ना?
20कारण तुम्ही आमचा गौरव व आमचा आनंद आहात.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in