YouVersion Logo
Search Icon

२ करिंथ 13

13
येत्या भेटीकरता आत्मिक तयारी करण्यासंबंधी केलेले इशारे
1ही माझी तुमच्याकडे येण्याची तिसरी खेप. ‘दोघा अथवा तिघा साक्षीदारांच्या मुखाने प्रत्येक गोष्ट प्रस्थापित होते.’
2ज्यांनी पूर्वी पाप केले त्यांना व दुसर्‍या सर्वांना मी पूर्वी सांगितले होते, व दुसर्‍यांदा तुमच्याजवळ असताना सांगितले तेच आता दूर असतानाही अगोदर सांगून ठेवतो की, मी फिरून आलो तर गय करणार नाही;
3ख्रिस्त माझ्या द्वारे बोलतो आहे ह्याचे प्रमाण तुम्हांला पाहिजे ते हेच; तो तुमच्यासंबंधाने शक्तिहीन नाही, तर तुमच्यामध्ये शक्तिमान आहे;
4कारण त्याला अशक्तपणात वधस्तंभावर खिळण्यात आले तरी तो देवाच्या सामर्थ्याने जिवंत झाला आहे. तसे आम्हीही त्याच्यामध्ये शक्तिहीन आहोत, तरी देवाच्या सामर्थ्याने आम्ही त्याच्याबरोबर तुमच्याबाबत जिवंत असे राहू.
5तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही ह्याविषयी आपली परीक्षा करा; आपली प्रतीती पाहा, येशू ख्रिस्त तुमच्या ठायी आहे असे तुम्ही स्वतःसंबंधाने समजता ना? नाहीतर तुम्ही पसंतीस1 उतरलेले नाही.
6पसंतीस न उतरलेले असे आम्ही नाही हे तुम्ही ओळखाल अशी माझी आशा आहे.
7आम्ही देवाजवळ अशी प्रार्थना करतो की, तुम्ही काही वाईट करू नये; आम्ही पसंतीस उतरलेले दिसावे म्हणून नव्हे, तर आम्ही पसंतीस न उतरलेले असे असलो तरी तुम्ही चांगले करावे म्हणून.
8कारण सत्याविरुद्ध आम्हांला काही करता येत नाही, तर सत्यासाठी करता येते.
9जेव्हा आम्ही दुर्बळ असून तुम्ही सबळ असता तेव्हा आम्ही आनंद करतो; व तुम्ही परिपूर्ण व्हावे ह्यासाठीही प्रार्थना करतो.
10ह्यामुळे मी जवळ नसताना हे लिहितो, ते ह्यासाठी की, जो अधिकार प्रभूने पाडण्यासाठी नव्हे तर उभारण्यासाठी मला दिला, त्या अधिकाराप्रमाणे जवळ आल्यावर मी कडकपणाने वागू नये.
समाप्ती
11बंधुजनहो, आता इतकेच म्हणतो, तुमचे कल्याण असो; तुम्हांला पूर्णता लाभो; समाधान मिळो; तुम्ही एकचित्त व्हा; शांतीने राहा म्हणजे प्रीतीचा व शांतीचा देव तुमच्यासह राहील.
12पवित्र चुंबन घेऊन एकमेकांना सलाम करा.
13सर्व पवित्र जन तुम्हांला सलाम सांगतात.
14प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसह असो.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in