प्रेषितांची कृत्ये 21
21
मिलेताहून सोरापर्यंत येणे
1मग असे झाले की, आमचा व त्यांचा वियोग झाल्यानंतर आम्ही तारवातून कोसास नीट गेलो, व दुसर्या दिवशी रुदास व तेथून पातर्यास गेलो.
2नंतर पलीकडे फेनिकेस जाणारे तारू मिळाल्यावर आम्ही त्यात बसून निघालो.
3मग कुप्र दृष्टीस पडले तेव्हा ते डावीकडे टाकून आम्ही सूरियाकडे जाऊन सोरास उतरलो, कारण तेथे तारवातील माल उतरवायचा होता.
4आणि शोध केल्यावर आम्हांला शिष्य भेटले म्हणून आम्ही तेथे सात दिवस राहिलो. त्यांनी आत्म्याच्या द्वारे पौलाला म्हटले, “तुम्ही यरुशलेमेत पाऊल टाकू नका.”
5मग असे झाले की, ते दिवस संपल्यावर आम्ही तेथून निघून मार्गस्थ झालो; तेव्हा स्त्रिया व मुले ह्यांच्यासह सर्वांनी आम्हांला नगराबाहेर पोहचवले. तेथे समुद्राच्या किनार्यावर आम्ही गुडघे टेकून प्रार्थना केली.
6आणि एकमेकांचा निरोप घेतल्यावर आम्ही तारवात बसलो आणि ते आपल्या घरी माघारी गेले.
कैसरीयास येणे
7मग आम्ही आपला सोरापासूनचा जलप्रवास संपवला आणि प्तलमैसास येऊन व बंधुजनांना भेटून त्यांच्या येथे एक दिवस राहिलो.
8मग दुसर्या दिवशी [पौल व त्याचे सोबती] आम्ही निघून कैसरीयास आलो आणि सुवार्तिक फिलिप्प ह्याच्या घरी जाऊन उतरलो; हा सातांपैकी एक होता.
9त्याला चार अविवाहित मुली होत्या. त्या ईश्वरी संदेश देत असत.
10तेथे आम्ही पुष्कळ दिवस राहिलो असता अगब नावाचा कोणीएक संदेष्टा यहूदीयाहून खाली आला.
11त्याने आमच्याकडे येऊन व पौलाचा कमरबंद घेऊन आपले हातपाय बांधून म्हटले, “पवित्र आत्मा असे म्हणतो की, ‘हा कमरबंद ज्या माणसाचा आहे त्याला यरुशलेमेत यहूदी लोक ह्याप्रमाणे बांधून परराष्ट्रीयांच्या हाती देतील.”’
12हे ऐकून आम्ही व तेथल्या लोकांनीही ‘तुम्ही यरुशलेमेस जाऊ नका,’ अशी त्याला गळ घातली.
13तेव्हा पौलाने उत्तर दिले, “तुम्ही रडून माझे मन खचवता, हे काय? मी नुसता बंधनात पडायलाच नाही, तर प्रभू येशूच्या नावासाठी यरुशलेमेत मरायलादेखील तयार आहे.”
14तो ऐकत नाही हे पाहून “प्रभूच्या इच्छेप्रमाणे होवो,” असे म्हणून आम्ही स्वस्थ राहिलो.
यरुशलेमेस येणे
15त्या दिवसांनंतर आम्ही आपली तयारी करून यरुशलेमेस वर गेलो.
16आमच्याबरोबर कैसरीयातील कित्येक शिष्यही आले. त्यांनी आपल्याबरोबर कुप्र येथील म्नासोन ह्या जुन्या शिष्याला आणले; त्याच्या येथे आम्ही राहणार होतो.
यहूद्यांतून ख्रिस्ती झालेल्यांची समजूत घालण्यासाठी पौलाने केलेला नवस
17यरुशलेमेत आल्यावर बंधुजनांनी आनंदाने आमचे आगतस्वागत केले.
18मग दुसर्या दिवशी पौल आमच्यासह याकोबाच्या येथे गेला; आणि सर्व वडीलही तेथे आले.
19तेव्हा त्याने त्यांना भेटून आपल्या सेवेच्या योगे जी कार्ये देवाने परराष्ट्रीयांमध्ये केली होती त्या एकेकाविषयी सविस्तर सांगितले.
20ते ऐकून त्यांनी देवाचा गौरव केला व पौलाला म्हटले, “भाऊ, ज्यांनी विश्वास ठेवला आहे असे हजारो लोक यहूद्यांमध्ये आहेत हे तुम्ही पाहतच आहात; ते सर्व नियमशास्त्राभिमानी आहेत.
21तुमच्याविषयी त्यांना असे कळवण्यात आले आहे की, तुम्ही परराष्ट्रीयांत राहणार्या सर्व यहूद्यांना मोशेचा त्याग करायला शिकवत असता आणि आपल्या मुलांची सुंता करू नये व परिपाठाप्रमाणे चालू नये असेही सांगत असता.
22तर आता काय करावे? तुम्ही आला आहात हे ते खचीत ऐकतील.
23म्हणून आम्ही तुम्हांला जे सांगतो ते करा. ज्यांनी नवस केला आहे असे आमच्यात चौघे जण आहेत;
24त्यांना घेऊन त्यांच्यासह तुम्ही व्रतस्थ व्हा, आणि त्यांनी मुंडण करावे म्हणून त्यांचा खर्च तुम्ही भरा म्हणजे तुमच्याविषयी जे कळवण्यात आले आहे त्यात काही अर्थ नसून तुम्ही स्वतः नियमशास्त्र पाळून व्यवस्थित वागता हे सर्वांना कळून येईल.
25परंतु ज्यांनी विश्वास ठेवला आहे अशा परराष्ट्रीयांसंबंधाने आम्ही निर्णय करून लिहून पाठवले आहे की, त्यांनी [असा काही नियम पाळू नये फक्त] मूर्तीला अर्पण केलेले पदार्थ, रक्त, गळा दाबून मारलेले प्राणी व जारकर्म ह्यांपासून अलिप्त राहावे.”
26तेव्हा पौल त्या माणसांना घेऊन दुसर्या दिवशी त्यांच्याबरोबर व्रतस्थ होऊन मंदिरात गेला, आणि ज्या दिवशी त्यांच्यातील एकेकासाठी अर्पण करायचे त्या दिवसापर्यंत व्रताचे दिवस आपण पूर्ण करत आहोत असे त्याने दाखवले.
यरुशलेमेतला दंगा व पौलाला अटक
27ते सात दिवस पूर्ण होण्याच्या सुमारास आशिया प्रांतातल्या यहूद्यांनी त्याला मंदिरात पाहून सर्व लोकसमुदायाला चिथवले, आणि त्याच्यावर हात टाकून
28आरोळी मारून म्हटले, “अहो इस्राएल लोकांनो, धावा हो धावा; आपले लोक, नियमशास्त्र व हे स्थळ ह्यांच्याविरुद्ध जो चहूकडे सर्वांना शिकवतो तोच हा आहे; शिवाय ह्याने हेल्लेण्यांस मंदिरात आणून हे पवित्रस्थान विटाळवले आहे.”
29त्यांनी इफिसकर त्रफिम ह्याला पूर्वी त्याच्याबरोबर शहरात पाहिले होते; त्याला पौलाने मंदिरात आणले असावे, अशी त्यांची कल्पना होती.
30तेव्हा सर्व शहर गजबजून उठले व लोकांची एकच गर्दी झाली; आणि त्यांनी पौलाला धरून मंदिरातून बाहेर ओढून काढले; आणि लगेच दरवाजे बंद करण्यात आले.
31मग ते त्याला जिवे मारू पाहत असता पलटणीच्या सरदाराकडे बातमी लागली की, सबंध यरुशलेमेत गडबड उडाली आहे.
32तत्काळ तो शिपाई व शताधिपती ह्यांना घेऊन त्यांच्याकडे खाली धावत गेला. सरदार व शिपाई ह्यांना पाहून त्यांनी पौलाला मारायचे थांबवले.
33तेव्हा सरदाराने जवळ येऊन त्याला धरले आणि दोन साखळ्यांनी बांधण्याचा हुकूम केला; मग ‘हा कोण व ह्याने काय केले’ असे तो विचारू लागला.
34तेव्हा लोकांतून कोणी काही, कोणी काही ओरडू लागले; ह्या गलबल्यामुळे त्याला खातरीलायक असे काही कळेना, म्हणून त्याने त्याला गढीत नेण्याचा हुकूम केला.
35तो पायर्यांवर आला तेव्हा असे झाले की, लोकांच्या दांडगाईमुळे शिपायांनी त्याला उचलून नेले;
36कारण लोकांचा समुदाय मागे चालत असून, “त्याची वाट लावा,” असे ओरडत होता.
37मग पौलाला गढीत नेणार इतक्यात त्याने सरदाराला म्हटले, “मला आपल्याबरोबर काही बोलायची परवानगी मिळेल का?” तो म्हणाला, “हेल्लेणी भाषा तुला येते काय?
38ज्या मिसर्याने थोड्या दिवसांमागे बंड उठवून त्या चार हजार मारेकर्यांना रानात नेले तोच तू आहेस की नाही?”
39तेव्हा पौलाने म्हटले, “मी किलिकियातील तार्सकर यहूदी आहे; हलक्यासलक्या नगराचा राहणारा नव्हे. मी आपल्याला विनंती करतो की, लोकांबरोबर बोलण्याची मला परवानगी द्या.”
40त्याने परवानगी दिल्यावर पौलाने पायर्यांवर उभे राहून लोकांना हाताने खुणावले; आणि अगदी शांत झाल्यावर तो त्यांच्याबरोबर इब्री भाषेत येणेप्रमाणे बोलला :
Currently Selected:
प्रेषितांची कृत्ये 21: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.