YouVersion Logo
Search Icon

प्रेषितांची कृत्ये 8

8
ख्रिस्ती लोकांचा छळ आणि त्यांची पांगापांग
1शौलाला तर त्याचा वध मान्य होता. त्याच दिवशी यरुशलेमेतल्या मंडळीचा फार छळ झाला, म्हणून
प्रेषितांखेरीज त्या सर्वांची यहूदीया व शोमरोन ह्या प्रदेशांत पांगापांग झाली.
2भक्तिमान माणसांनी स्तेफनाला नेऊन पुरले आणि त्याच्यासाठी फार शोक केला.
3इकडे शौल मंडळीस हैराण करू लागला. तो घरोघर जाऊन पुरुषांना व स्त्रियांनाही धरून आणून तुरुंगात टाकत असे.
शोमरोनामध्ये फिलिप्प
4तेव्हा ज्यांची पांगापांग झाली होती ते वचनाची सुवार्ता सांगत चहूकडे फिरले.
5आणि फिलिप्पाने शोमरोन शहरात जाऊन तेथील लोकांपुढे ख्रिस्ताची घोषणा केली.
6तेव्हा फिलिप्पाचे भाषण ऐकून व तो करत असलेली चिन्हे पाहून लोकसमुदायांनी त्याने सांगितलेल्या गोष्टींकडे एकचित्ताने लक्ष दिले.
7कारण ज्यांना अशुद्ध आत्मे लागले होते त्यांच्यातील पुष्कळांतून ते मोठ्याने ओरडून निघून गेले; पुष्कळ पक्षाघाती व पांगळी माणसे बरी झाली.
8आणि त्या नगरात आनंदीआनंद झाला.
शिमोन जादूगार
9त्या नगरात जादूगिरी करून शोमरोनी लोकांना थक्क करणारा असा शिमोन नावाचा एक माणूस होता, आणि आपण कोणीतरी मोठे आहोत असे तो दाखवत असे.
10लहानापासून थोरापर्यंत सर्व जण त्याचे लक्षपूर्वक ऐकत व म्हणत की, “जिला देवाची महाशक्ती म्हणतात ती हा आहे.”
11त्याने त्यांना बर्‍याच दिवसांपासून आपल्या जादूगिरीने थक्क केले होते, म्हणून त्यांचे लक्ष त्याच्याकडे होते.
12तरीपण फिलिप्प देवाचे राज्य व येशू ख्रिस्ताचे नाव ह्यांविषयीची सुवार्ता सांगत असता लोकांचा विश्वास बसला आणि पुरुष व स्त्रिया ह्यांचा बाप्तिस्मा झाला.
13स्वतः शिमोनानेही विश्वास धरला व बाप्तिस्मा घेऊन तो फिलिप्पाच्या सहवासात राहिला; आणि घडत असलेली चिन्हे व महापराक्रमाची कृत्ये पाहून तो थक्क झाला.
शोमरोनामध्ये पेत्र व योहान
14मग शोमरोनाने देवाचे वचन स्वीकारले असे यरुशलेमेतल्या प्रेषितांनी ऐकून त्यांच्याकडे पेत्र व योहान ह्यांना पाठवले;
15ते तेथे आल्यावर त्यांनी त्यांना पवित्र आत्मा मिळावा म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना केली;
16कारण तोपर्यंत त्यांच्यापैकी कोणावरही तो उतरला नव्हता. प्रभू येशूच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा मात्र झाला होता.
17तेव्हा त्यांनी त्यांच्यावर आपले हात ठेवले आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला.
18मग प्रेषितांचे हात ठेवल्याने पवित्र आत्मा मिळतो हे पाहून शिमोनाने त्यांना पैसे देऊ करून म्हटले,
19“ज्या कोणावर मी आपले हात ठेवीन त्याला पवित्र आत्मा मिळावा असा अधिकार मलाही द्या.”
20तेव्हा पेत्र त्याला म्हणाला, “तुझ्या रुप्याचा तुझ्याबरोबर नाश होवो, कारण द्रव्य देऊन देवाचे दान मिळवण्याचा तू विचार केलास.
21ह्या गोष्टीत तुला भाग किंवा वाटा नाही; कारण तुझे अंत:करण देवाच्या दृष्टीने नीट नाही.
22तू ह्या आपल्या दुष्टतेचा पश्‍चात्ताप करून प्रभूजवळ विनंती कर म्हणजे तुझ्या अंत:करणातल्या कल्पनेची तुला कदाचित क्षमा होईल.
23कारण तू अतिशय कटुतेत व अनीतीच्या बंधनात आहेस असे मला दिसते.”
24तेव्हा शिमोनाने म्हटले, “तुम्ही सांगितलेल्या गोष्टींपैकी काही माझ्यावर येऊ नये म्हणून माझ्यासाठी तुम्ही प्रभूजवळ विनंती करा.”
25नंतर त्यांनी साक्ष देऊन प्रभूचे वचन गाजवल्यावर ते यरुशलेमेत परत आले, आणि येताना त्यांनी शोमरोनी लोकांच्या पुष्कळशा गावांतून सुवार्ता सांगितली.
फिलिप्प व हबशी षंढ
26इकडे प्रभूच्या दूताने फिलिप्पाला म्हटले, “ऊठ, जी वाट यरुशलेमेपासून गज्जाकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा; ती ओसाड आहे.”
27मग तो उठला व निघाला; आणि पाहा, एक कूशी1 षंढ, कूशी1 लोकांची राणी कांदके हिचा मोठा अधिकारी होता व त्याच्या हाती तिचे सर्व भांडार होते; तो यरुशलेमेत उपासनेसाठी आला होता.
28तो परत जाताना आपल्या रथात बसून यशया संदेष्ट्याचा ग्रंथ वाचत होता.
29तेव्हा आत्म्याने फिलिप्पाला सांगितले, “जा, त्याचा रथ गाठ.”
30फिलिप्प धावत गेला आणि त्याने त्याला यशया संदेष्ट्याचा ग्रंथ वाचताना ऐकले; त्यावर तो म्हणाला, “आपण जे वाचत आहात ते आपल्याला समजते काय?”
31त्याने म्हटले, “कोणी मार्ग दाखवल्याखेरीज मला कसे समजणार?” मग त्याने फिलिप्पाला आपल्याजवळ येऊन बसण्यास वर बोलावले.
32तो जो शास्त्रलेख वाचत होता तो असा :
“त्याला मेंढरासारखे वधासाठी नेले;
आणि जसे कोकरू कातरणार्‍याच्या पुढे
गप्प असते,
तसा तो आपले तोंड उघडत नाही.
33त्याच्या लीन अवस्थेत
त्याला न्याय मिळाला नाही.
त्याच्या पिढीचे वर्णन कोण करील?
कारण त्याचा जीव पृथ्वीवरून घेतला गेला.”
34तेव्हा षंढाने फिलिप्पाला म्हटले, “मला कृपा करून सांगा, संदेष्टा कोणाविषयी असे म्हणतो, स्वतःविषयी किंवा दुसर्‍या कोणाविषयी?”
35तेव्हा फिलिप्पाने बोलण्यास आरंभ केला व ह्या शास्त्रलेखापासून सुरुवात करून येशूविषयीची सुवार्ता त्याला सांगितली.
36मग वाटेने जात असता ते पाणवठ्याजवळ आले, तेव्हा षंढ म्हणाला, “पाहा हे पाणी; मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे?”
37(फिलिप्पाने म्हटले, “जर आपण आपल्या सर्व अंतःकरणाने विश्वास धरता तर योग्य आहे.” त्याने उत्तर दिले, “येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे असा मी विश्वास धरतो.”)2
38तेव्हा त्याने रथ उभा करण्यास सांगितले आणि फिलिप्प व षंढ असे ते दोघे पाण्यात उतरले; आणि त्याने त्याला बाप्तिस्मा दिला.
39मग ते पाण्यातून वर आले तोच प्रभूचा आत्मा फिलिप्पाला घेऊन गेला म्हणून तो पुन्हा षंढाच्या दृष्टीस पडला नाही; नंतर तो आपल्या वाटेने हर्ष करत चालला.
40इकडे फिलिप्प अजोत नगरात आढळला आणि कैसरीया येथे येईपर्यंत त्याला वाटेत जी जी गावे लागली त्यांतून जाताना त्याने सुवार्ता सांगितली.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Video for प्रेषितांची कृत्ये 8