YouVersion Logo
Search Icon

अनुवाद 20

20
युद्धनीती
1तू आपल्या शत्रूंशी युद्ध करायला जाशील तेव्हा घोडे, रथ व तुझ्यापेक्षा मोठे सैन्य तुझ्या दृष्टीस पडल्यास त्यांना भिऊ नकोस, कारण तुझा देव परमेश्वर ज्याने तुला मिसर देशातून आणले तो तुझ्याबरोबर आहे.
2तुम्ही रणांगणावर जाल तेव्हा याजकाने लोकांकडे येऊन त्यांच्याशी बोलावे;
3त्याने त्यांना म्हणावे, ‘इस्राएल लोकहो, ऐका; युद्ध करण्यास आज तुम्ही आपल्या शत्रूंच्या जवळ आला आहात; तुमचे मन कचरू देऊ नका, भिऊ नका, थरथर कापू नका, आणि त्यांना पाहून घाबरू नका;
4कारण तुमच्यासाठी तुमच्या शत्रूंशी युद्ध करायला व तुमचा बचाव करायला तुमच्याबरोबर जाणारा तुमचा देव परमेश्वर आहे.’ 5मग अंमलदारांनी लोकांना म्हणावे, ‘ज्याने नवे घर बांधून त्यात प्रवेश केला नाही असा कोण आहे? त्याने घरी परत जावे, कारण तो युद्धात मेल्यास दुसरा कोणी गृहप्रवेश करील.
6द्राक्षमळा लावून त्याचे प्रथमफळ खाल्ले नाही असा कोण आहे? त्याने घरी परत जावे, कारण तो युद्धात मेल्यास दुसरा कोणी त्याचे फळ खाईल.
7एखाद्या स्त्रीची मागणी करून तिच्याशी लग्न केले नाही असा कोण आहे? त्याने घरी परत जावे, कारण तो युद्धात मेल्यास दुसरा कोणी तिच्याशी लग्न करील.’
8अंमलदारांनी सैनिकांना आणखी म्हणावे की, ‘भित्रा व भ्याड मनाचा कोण आहे? त्याने घरी परत जावे, नाहीतर त्याच्या सोबत्याच्या हृदयांचेही त्याच्यासारखेच पाणीपाणी होईल.’ 9अंमलदारांचे लोकांशी हे बोलणे संपल्यावर त्यांनी लोकांवर सेनानायक नेमावेत.
10युद्ध करायला तू एखाद्या नगरावर स्वारी करशील तेव्हा त्याच्याशी तहाचे बोलणे करून पाहा.
11त्या नगराने तहाचे बोलणे कबूल करून वेस उघडली तर त्या नगरात जे लोक सापडतील ते तुझे वेठबिगार करणारे व दास होतील.
12पण त्याने तह न करता ते तुमच्याशी लढू लागले तर त्या नगराला वेढा घालावा.
13तुझा देव परमेश्वर ते नगर तुझ्या हाती देईल तेव्हा त्यातल्या प्रत्येक पुरुषाला तलवारीने मारून टाकावे;
14पण त्या नगरातील स्त्रिया, मुले, जनावरे इत्यादी लूट आपल्यासाठी घ्यावी; तुझा देव परमेश्वर तुला तुझ्या शत्रूंकडील जी लूट देईल तिचा उपभोग घे.
15जी नगरे तुझ्यापासून फार दूर असून ह्या येथल्या राष्ट्रांची नसतील त्यांच्या बाबतीत असेच करावे;
16पण तुझा देव परमेश्वर ह्या राष्ट्रांची जी नगरे तुला वतन म्हणून देत आहे त्यांतला कोणताही प्राणी जिवंत ठेवू नकोस.
17तुझा देव परमेश्वर ह्याने तुला आज्ञा केल्याप्रमाणे हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी व यबूसी ह्यांचा समूळ नाश कर.
18न केल्यास ते आपापल्या देवांची पूजा करताना जी अमंगल कृत्ये करतात त्यांसारखी करायला ते तुम्हांला शिकवतील आणि तेणेकडून तुमचा देव परमेश्वर ह्याच्याविरुद्ध तुम्ही पाप कराल.
19युद्ध करीत असताना एखादे नगर काबीज करण्यासाठी तू बरेच दिवस वेढा घालून राहिलास तर त्या नगराच्या झाडांवर कुर्‍हाड चालवून त्यांचा नाश करू नकोस, त्यांची फळे तुला खायला मिळतील म्हणून ती तोडू नकोस. मैदानातल्या झाडांना वेढा द्यायला ती काय माणसे आहेत?
20जी झाडे खाद्य म्हणून उपयोगाची नाहीत तीच तोडून त्यांचा नाश करावा. जे नगर तुझ्याशी युद्ध करीत असेल ते पडेपर्यंत त्या झाडांचे मोर्चे बनवून त्यावर लावावे.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in