उपदेशक 2
2
1मग मी आपल्या मनात म्हटले, “चल, हास्यविनोदाने मी तुला अजमावून पाहतो; तर आता तू सुख भोगून घे;” पण हेही व्यर्थ.
2मी हास्यास म्हटले, “तू वेडे आहेस;” आणि विनोदास म्हटले, “तुझ्यापासून काय लाभ?”
3मानवपुत्रांनी आपल्या सार्या आयुष्यात ह्या भूतलावर2 काय केले असता त्यांचे हित होईल ह्याचा निर्णय समजावा म्हणून विवेकाने माझ्या मनाचे संयमन करून द्राक्षारसाने माझ्या शरीराची चैन कशी होईल आणि मूर्खपणाच्या आचारांचे अवलंबन कसे करता येईल ह्याचा मी आपल्या मनाशी शोध केला.
4मी मोठमोठी कामे हाती घेतली, आपल्यासाठी घरेदारे बांधली, द्राक्षांचे मळे लावले;
5मी आपल्यासाठी बागा व त्यांत हरतर्हेची फळझाडे लाववली;
6वृक्षांची लागवड केलेल्या वनास पाण्याचा पुरवठा करावा म्हणून मी तलाव करवले;
7मी दासदासी खरेदी केल्या; माझ्या घरात जन्मलेले दास माझे झाले होते; खिल्लारे व कळप ह्यांचे मोठे धन माझ्याजवळ होते, तेवढे माझ्यापूर्वी यरुशलेमेत कोणाजवळ नव्हते.
8मी सोन्यारुप्याचा आणि राजांजवळ असणार्या देशोदेशींच्या बहुमूल्य पदार्थांचा संचय केला; स्वतःसाठी गाणारे व गाणारणी मिळवल्या आणि मानवपुत्रांना रंजवणार्या अशा बहुत उपस्त्रिया मी ठेवल्या.
9असा मी थोर झालो; माझ्यापूर्वी यरुशलेमेत जे होऊन गेले त्यांच्यापेक्षा मी थोर झालो तरी माझा विवेक कायम होता.
10माझे नेत्र ज्याची म्हणून वांच्छा करीत ते मी त्यांच्यापासून वेगळे केले नाही; मी कोणत्याही आनंदाच्या विषयापासून आपले मन आवरले नाही; कारण ह्या सर्व खटाटोपाचा माझ्या मनास हर्ष होत असे; ह्या सर्व खटाटोपापासून माझ्या वाट्यास एवढेच आले.
11मग मी आपल्या हाताने केलेली सर्व कामे आणि परिश्रम ह्यांचे निरीक्षण केले; तर पाहा, सर्वकाही व्यर्थ व वायफळ उद्योग होता; भूतलावर हित असे कशातच नाही.
12मग पाहा, ज्ञान, वेडेपण व मूर्खपण ह्यांकडे मी लक्ष पुरवले; कारण राजाच्या मागून येणार्या पुरुषाच्या हातून काय होणार? आजवर लोक जे करीत आले तेच तो करणार.
13मग माझ्या नजरेस आले की अंधकारापेक्षा प्रकाश जसा श्रेष्ठ तसे मूर्खतेपेक्षा ज्ञान श्रेष्ठ.
14ज्ञान्याचे नेत्र त्याच्या मस्तकात असतात; आणि मूर्ख अंधकारात चालतो; असे असून सर्वांची गती एकच आहे असे माझ्या लक्षात आले.
15मग मी आपल्या मनात म्हटले, “मूर्खाची जी गती तीच माझी, मग मी एवढा ज्ञानी झालो तरी कशाला?” मी आपल्या मनात म्हटले हेही व्यर्थच!
16मूर्खाप्रमाणेच ज्ञान्याची आठवण सदा राहणार नाही, कारण पुढे येणार्या दिवसांत सर्वांचे विस्मरण होणार आहे. तर पाहा, ज्ञानी कसा मरण पावतो तर मूर्खाप्रमाणेच!
17ह्यावरून जीविताचा मला वीट आला; कारण ह्या भूतलावर जे काही मानवी व्यवहार होतात ते मला अनुचित वाटले; एकूण सर्वकाही व्यर्थ व वायफळ उद्योग आहे.
18माझ्या सर्व श्रमाचे फळ माझ्यामागून येणार्याला ठेवून मला जावे लागणार आहे, हे लक्षात येऊन मी ह्या भूतलावर जे काही परिश्रम केले त्या सगळ्यांचा मला वीट आला.
19तो सुज्ञ निघेल की मूर्ख निघेल कोणास ठाऊक? तरी जे काही मी परिश्रम करून व शहाणपण खर्चून ह्या भूतलावर संपादले आहे त्यावर तो ताबा चालवणार; हेही व्यर्थच!
20ह्यास्तव ह्या भूतलावर जे काही परिश्रम मी करीत होतो ते मी सोडून दिले; आणि माझे मन हताश झाले.
21कोणी सुज्ञता, ज्ञान व चतुराई ह्यांनी परिश्रम करून काही संपादावे, आणि त्यासाठी ज्याने परिश्रम केले नाहीत त्याच्या वाट्यास ते ठेवून सोडून जावे; हेही व्यर्थ व मोठे अनिष्ट होय.
22मनुष्य जे काही परिश्रम करतो व आपला जीव उलथापालथा करून ह्या भूतलावर खटाटोप करतो त्याचा त्याला काय लाभ?
23त्याचे सर्व दिवस दुःखमय असतात; त्याची दगदग कष्टमय असते; रात्रीही त्याच्या मनास चैन नसते; हेही व्यर्थच!
24मनुष्याने खावे, प्यावे व श्रम करून आपल्या जिवास सुख द्यावे ह्यापेक्षा त्याला काहीही इष्ट नाही; हेही देवाच्या हातून मिळते असे माझ्या ध्यानात आले.
25कारण त्याच्या प्रसादाशिवाय खाणेपिणे व सुख भोगणे कोणास प्राप्त होणार?
26जो देवाच्या दृष्टीने चांगला त्याला तो बुद्धी, ज्ञान व सुख देतो; धन मिळवून साठवण्याचे कष्ट देव पाप्यावर लादतो, अशासाठी की, देवाच्या दृष्टीने जो चांगला त्याला ते द्यावे; हाही व्यर्थ व वायफळ उद्योग होय.
Currently Selected:
उपदेशक 2: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.