YouVersion Logo
Search Icon

इफिसकरांस पत्र 2

2
तारणप्राप्ती देवाच्या कृपेने होते
1तुम्ही आपले अपराध व आपली पातके ह्यांमुळे मृत झालेले होता;
2त्या पातकांमध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, अर्थात ह्या जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षातील राज्याचा अधिपती म्हणजे आज्ञा मोडणार्‍या लोकांत आता कार्य करणार्‍या आत्म्याचा अधिपती ह्याच्या धोरणाप्रमाणे चालत होता.
3त्या लोकांत आपणही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छांप्रमाणे करत होतो व स्वभावतः इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो.
4तरी देव दयासंपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे,
5ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले, (कृपेने तुमचे तारण झालेले आहे);
6आणि ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्याचबरोबर उठवले व त्याच्याचबरोबर स्वर्गात2 बसवले;
7ह्यासाठी की, ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्या तुमच्या-आमच्यावरील ममतेच्या द्वारे येणार्‍या युगात त्याने आपल्या कृपेची अपार समृद्धी दाखवावी.
8कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे;
9कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही.
10आपण सत्कृत्ये करावीत म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत; ती सत्कृत्ये आचरत आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली.
यहूदी व यहूदीतरांचे ख्रिस्ती मंडळीत ऐक्य झाले आहे
11म्हणून आठवण करा की, तुम्ही पूर्वी देहाने परराष्ट्रीय आणि ज्यांची सुंता हाताने केलेली म्हणजे देहाची आहे अशा स्वतःला सुंती म्हणवणार्‍या लोकांकडून बेसुंती म्हणवले जाणारे होता;
12ते तुम्ही त्या वेळेस ख्रिस्तविरहित, इस्राएलाच्या राष्ट्राबाहेरचे, वचनाच्या करारांना परके, आशाहीन व देवविरहित असे जगात होता.
13परंतु जे तुम्ही पूर्वी ‘दूर’ होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठायी ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे ‘जवळचे’ झाला आहात.
14कारण तोच आमची शांती आहे; त्याने दोघांना एक केले आणि मधली आडभिंत पाडली;
15त्याने आपल्या देहाने वैर, म्हणजे आज्ञाविधींचे नियमशास्त्र नाहीसे केले; ह्यासाठी की, स्वत:च्या ठायी दोघांचा एक नवा मानव निर्माण करून त्याने शांती प्रस्थापित करावी;
16आणि त्यांचे एक शरीर करून आपण वधस्तंभावर वैरभाव जिवे मारून त्याच्या द्वारे दोघांचा देवाशी समेट करावा.
17आणि त्याने येऊन जे तुम्ही ‘दूर होता’ त्या तुम्हांला ‘शांतीची सुवार्ता सांगितली व जे जवळ होते त्यांनाही शांतीची सुवार्ता सांगितली;
18कारण त्याच्या द्वारे आत्म्याच्या योगे आपणा उभयतांचा पित्याजवळ प्रवेश होतो.
19तर ह्यावरून तुम्ही आतापासून परके व उपरे नाहीत; पण पवित्र जनांच्या बरोबरीचे नागरिक व देवाच्या घरचे आहात;
20प्रेषित व संदेष्टे ह्या पायावर तुम्ही रचलेले आहात; स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कोनशिला आहे;
21त्याच्यामध्ये सबंध इमारत जोडून रचली असता प्रभूच्या ठायी वाढत वाढत पवित्र मंदिर होते;
22प्रभूच्या ठायी तुम्हीही आत्म्याच्या द्वारे देवाच्या वस्तीसाठी एकत्र रचले जात आहात.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in