YouVersion Logo
Search Icon

निर्गम 5

5
फारोपुढे मोशे व अहरोन
1नंतर मोशे व अहरोन फारोकडे जाऊन म्हणाले, “इस्राएलाचा देव परमेश्वर सांगत आहे की, माझ्या लोकांनी माझ्याप्रीत्यर्थ रानात उत्सव1 करावा म्हणून त्यांना जाऊ द्यावे.”
2तेव्हा फारो म्हणाला, “हा कोण परमेश्वर की ज्याचे ऐकून मी इस्राएलास जाऊ द्यावे? मी त्या परमेश्वराला जाणत नाही, आणि इस्राएलास काही जाऊ देणार नाही.”
3ते म्हणाले, “इब्र्यांच्या देवाने आम्हांला भेट दिली; तर आता आम्हांला तीन दिवसांच्या वाटेवर रानात जाऊ द्यावे आणि आमचा देव परमेश्वर ह्याला यज्ञ करू द्यावा; असे न केल्यास तो कदाचित पटकीने अथवा तलवारीने आमचा समाचार घेईल.”
4मिसराचा राजा त्यांना म्हणाला, “हे मोशे, हे अहरोना, तुम्ही लोकांना काम सोडून जायला का लावता? तुम्ही आपल्या बिगारकामावर चालते व्हा.”
5फारो आणखी म्हणाला, “पाहा, देशातले लोक आता पुष्कळ आहेत, आणि तुम्ही त्यांना बिगारकाम सोडून जायला लावणार.”
6त्याच दिवशी फारोने त्या लोकांचे मुकादम व त्यांचे नायक ह्यांना आज्ञा केली की, 7विटा करण्यासाठी तुम्ही ह्या लोकांना आजवर गवत देत आलात तसे ह्यापुढे देऊ नका; त्यांनी स्वत: जाऊन गवत मिळवावे.
8तरी आजवर जेवढ्या विटा त्यांना कराव्या लागत होत्या तेवढ्या त्यांच्याकडून करवून घ्या, त्यात काही कमी करू नका; ते आळशी आहेत, म्हणून ते ओरड करीत आहेत की आम्हांला जाऊ द्या, आमच्या देवाला यज्ञ करू द्या.
9त्या लोकांवर अधिक काम लादा, म्हणजे त्यांच्यावर कामाचा बोजा पडून ते ह्या खोट्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाहीत.”
10मग लोकांचे मुकादम व नायक बाहेर जाऊन त्यांना म्हणाले, “फारो म्हणतो, मी तुम्हांला गवत पुरवणार नाही.
11तुम्हीच जा आणि मिळेल तेथून गवत आणा; तरी तुमचे काम काही कमी होणार नाही.”
12तेव्हा ते लोक गवताऐवजी धान्याचे सड जमा करण्यासाठी सर्व मिसर देशभर पांगले.
13त्यांच्यामागे मुकादमांचा असा तगादा असे की, “तुम्हांला गवत पुरवण्यात येत होते तेव्हाच्या इतके तुमचे रोजचे काम पुरे करा.”
14इस्राएल लोकांवर त्यांच्यापैकी जे नायक नेमले होते त्यांना फारोच्या मुकादमांनी मार देऊन विचारले की, “तुम्ही पूर्वी जितक्या विटा करीत होता, तितक्या काल व आज का केल्या नाहीत?”
15तेव्हा इस्राएल लोकांचे नायक फारोकडे जाऊन ओरड करून म्हणाले, “आपण आपल्या दासांशी असे का वागता?
16आपल्या दासांना गवत देत नाहीत तरी ते आम्हांला म्हणतात, विटा करा; पाहा, आपल्या दासांना मार मिळत आहे; पण दोष आपल्या लोकांचा आहे.”
17तो म्हणाला, “तुम्ही आळशी आहात आळशी, म्हणूनच तुम्ही म्हणता, आम्हांला जाऊ द्यावे, आमच्या परमेश्वराप्रीत्यर्थ आम्हांला यज्ञ करू द्यावा.
18आता जा आणि आपले काम करा; तुम्हांला गवत काही मिळायचे नाही, आणि विटा तर नेहमीच्या इतक्याच करून दिल्या पाहिजेत.
19विटा व रोजचे काम ह्यांत तुम्ही काही कमी करता कामा नये.” असे इस्राएलांच्या नायकांना बजावण्यात आले तेव्हा आपण फार पेचात आहोत असे त्यांच्या लक्षात आले;
20ते फारोकडून निघाले तेव्हा मोशे व अहरोन त्यांची वाट पाहत उभे होते ते त्यांना आढळले.
21तेव्हा ते त्यांना म्हणाले, “परमेश्वर तुम्हांला पाहून घेवो; फारोच्या दृष्टीने व त्याच्या चाकरांच्याही दृष्टीने तुम्ही आम्हांला आमची किळस येईल असे केले आहे; आम्हांला मारून टाकण्यासाठी तुम्ही त्यांच्या हातात जशी काय तलवारच दिली आहे.”
मोशेची प्रार्थना
22मग मोशे परमेश्वराकडे परत जाऊन म्हणाला, “प्रभू, तू ह्या लोकांचे का वाईट केले आहे? मला तू त्यांच्याकडे पाठवले ते काय म्हणून?
23मी तुझ्या नावाने बोलण्यासाठी फारोकडे आलो तेव्हापासून तो ह्या लोकांना पिडीत आहे; तू आपल्या लोकांची सोडवणूक तर मुळीच केली नाहीस.”

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in