YouVersion Logo
Search Icon

इब्री 3

3
प्रभू येशू हा मोशेपेक्षा श्रेष्ठ आहे
1म्हणून पवित्र बंधूंनो, स्वर्गीय पाचारणाचे भागीदारहो, आपण पत्करलेल्या मार्गाचा प्रेषित व प्रमुख याजक2 ख्रिस्त येशू ह्याच्याकडे लक्ष लावा.
2जसा, ‘मोशे देवाच्या सबंध घरात विश्वसनीय’ होता तसा तोही त्याला ज्याने नेमले त्याच्याशी विश्वसनीय होता.
3कारण ज्या मानाने घर बांधणार्‍याला सबंध घरापेक्षा अधिक सन्मान आहे त्या मानाने हा मोशेपेक्षा अधिक वैभवास योग्य गणलेला आहे.
4कारण प्रत्येक घर कोणीतरी बांधलेले असते; पण सर्वकाही बांधणारा देवच आहे.
5जे पुढे विदित होणार होते त्याविषयीच्या साक्षीसाठी ‘त्याच्या सबंध घरात मोशे सेवक ह्या नात्याने विश्वासू होता.’
6ख्रिस्त तर ‘देवाच्या घरावर’ नेमलेला पुत्र ह्या नात्याने विश्वासू होता, आणि आपण आपला भरवसा व आपल्या आशेचा अभिमान शेवटपर्यंत दृढ राखल्यास त्याचे ते घर आहोत.
7ह्यावरून पवित्र आत्मा म्हणतो त्याप्रमाणे,
“‘आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल,
8तर रानातील परीक्षेच्या दिवशी
इस्राएल लोकांनी चीड आणली होती तशी
तुम्ही आपली मने कठीण करू नका.
9तेथे तुमच्या वाडवडिलांनी कसोटीस लावून माझी
परीक्षा केली,
आणि चाळीस वर्षे माझी कृत्ये पाहिली.’
10त्यामुळे त्या पिढीवर संतापून मी म्हणालो,
‘हे सतत भ्रमिष्ट अंतःकरणाचे लोक आहेत,
ह्यांनी माझे मार्ग जाणले नाहीत.”’
11म्हणून मी रागाने शपथ वाहून म्हणालो,
‘हे माझ्या विसाव्यात निश्‍चित येणार नाहीत.’
शेवटपर्यंत विश्वासाची आवश्यकता
12बंधुजनहो, जिवंत देवाला सोडून देण्याइतके अविश्वासाचे दुष्ट मन तुमच्यातील कोणाचेही असू नये म्हणून जपा.
13जोपर्यंत “आज” म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत तुम्ही एकमेकांना प्रतिदिवशी बोध करा; हेतू हा की, पापाच्या फसवणुकीने तुमच्यातील कोणी ‘कठीण होऊ’ नये.
14कारण जर आपण आपला आरंभीचा भरवसा शेवटपर्यंत दृढ धरला तरच आपण ख्रिस्ताचे भागीदार झालो आहोत.
15शास्त्रात असे म्हटले आहे,
“आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल,
तर इस्राएल लोकांनी चीड आणली होती
तशी तुम्ही आपली मने कठीण करू नका.”
16कारण ऐकूनही कोणी ‘चीड आणली’? मोशेच्या द्वारे मिसरातून निघालेले सर्वच नव्हेत काय?
17आणि ‘चाळीस वर्षे तो कोणावर ‘संतापला’? ज्यांनी पाप केले, ‘ज्यांची प्रेते रानात पडली,’ त्यांच्यावर नव्हे काय?
18आणि ‘शपथ वाहून’ तो कोणाला म्हणाला की, ‘तुम्ही माझ्या विसाव्यात येणार नाही’? ज्यांनी अवज्ञा केली त्यांनाच की नाही?
19तरी ह्यावरून आपल्याला दिसून येते की, अविश्वासामुळे त्यांना आत येता आले नाही.

Currently Selected:

इब्री 3: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in