YouVersion Logo
Search Icon

यशया 42

42
परमेश्वराचा सेवक
1पाहा, हा माझा सेवक, ह्याला मी आधार आहे; पाहा, हा माझा निवडलेला, ह्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे; ह्याच्या ठायी मी आपला आत्मा घातला आहे; तो राष्ट्रांना न्याय प्राप्त करून देईल.
2तो गवगवा करणार नाही, तो आपला स्वर उच्च करणार नाही, तो रस्त्यातून पुकारा करणार नाही.
3चेपलेला बोरू तो मोडणार नाही. मिणमिणती वात तो विझवणार नाही; तो सत्याने न्याय पुढे आणील.
4पृथ्वीवर न्याय स्थापीपर्यंत तो मंदावणार नाही, भंगणार नाही; द्वीपे त्याच्या नियमशास्त्राची प्रतीक्षा करतात.
5आकाश निर्माण करून विस्तारणारा, पृथ्वीचा व तिच्या उपजाचा फैलाव करणारा, तिच्यावरील लोकांत प्राण घालणारा व तिच्यावर संचार करणार्‍यांना जीवित देणारा देव परमेश्वर असे म्हणतो;
6“मी परमेश्वराने न्यायानुसार तुला बोलावले आहे, मी तुझा हात धरला आहे, तुला राखले आहे; तू लोकांना करार व राष्ट्रांना प्रकाश देणारा असे मी तुला करीन;
7आंधळ्यांचे डोळे उघडावे, बंदिशाळेतून बंदिवानांना व अंधारात बसलेल्यांना कारागृहातून बाहेर काढावे म्हणून मी असे करीन.
8मी परमेश्वर आहे; हे माझे नाम आहे; मी आपले गौरव दुसर्‍यास देऊ देणार नाही; मी आपली प्रशंसा मूर्तींना प्राप्त होऊ देणार नाही.
9पहिल्या गोष्टी घडून चुकल्या आहेत; नव्या गोष्टी मी विदित करतो; त्यांना आरंभ होण्यापूर्वी त्या तुम्हांला ऐकवतो.”
परमेश्वराच्या महान मुक्तीबद्दल स्तवन
10अहो समुद्रावर पर्यटन करणारे व त्यात राहणारे सर्व लोकहो, अहो द्वीपांनो, तुम्ही आपल्या रहिवाशांसह परमेश्वराला नवगीत गा, पृथ्वीच्या दिगंतापर्यंत त्याची स्तोत्रे गा.
11अरण्य व त्यातील नगरे आणि ज्या खेड्यापाड्यांत केदार वसत आहे ती, गाण्याचा गजर करोत; सेलाचे रहिवासी उत्सव करोत, ते टेकड्यांच्या माथ्यांवर मोठ्याने जयघोष करोत.
12ते परमेश्वराचे गौरव करोत, द्वीपद्वीपांतरी त्याचा गुणानुवाद करोत.
13परमेश्वर वीराप्रमाणे निघेल; रणधुरंधराप्रमाणे तो आपल्या आवेशाचे उद्दीपन करील; तो प्रचंड शब्द करील; तो रणशब्द करील; तो आपल्या शत्रूंना आपला प्रभाव दाखवील.
14मी दीर्घकाळ मौन धरले; मी स्तब्ध राहिलो; मी स्वतःला आवरले; वेणा देणार्‍या स्त्रीप्रमाणे मी आता कण्हत आहे, उसासे व धापा टाकत आहे.
15मी पर्वत व टेकड्या उद्ध्वस्त करीन, त्यांच्यावरचा झाडपाला सुकवीन; नद्यांची बेटे करीन, तळी आटवून टाकीन.
16माहीत नाही अशा रस्त्याने मी आंधळ्यांना नेईन; अज्ञात अशा मार्गांनी मी त्यांना चालवीन; त्यांच्यापुढे अंधकार प्रकाश होईल व उंचसखल जागा सपाट मैदान होईल असे करीन. ह्या गोष्टी मी करणार, सोडणार नाही.
17जे कोरीव मूर्तींवर भाव ठेवतात, ओतीव मूर्तींना “तुम्ही आमचे देव आहात” असे म्हणतात, ते उलथून पडतील व अगदी लज्जित होतील.
शिस्तीचे फायदे मिळवण्यास इस्राएल असमर्थ
18बहिर्‍यांनो, ऐका; आंधळ्यांनो, पाहा, म्हणजे तुम्हांला दिसेल.
19माझ्या सेवकाखेरीज कोण आंधळा आहे? मी पाठवतो त्या माझ्या दूतासारखा कोण बहिरा आहे? माझ्या भक्तासाराखा कोण आंधळा आहे? परमेश्वराच्या सेवकासारखा कोण आंधळा आहे?
20तू बहुत पाहिले आहे ते ध्यानात ठेवत नाहीस; त्याचे कान उघडे आहेत पण तो ऐकत नाही.
21परमेश्वर आपल्या न्यायपरायणतेमुळे प्रसन्न झाला व आपल्या नियमशास्त्राची महती व थोरवी त्याने वाढवली.
22तरी हे लुटलेले, नागवलेले लोक आहेत; ते सर्व गर्तांच्या पाशात सापडले आहेत, कारागृहात कोंडले आहेत; ते भक्ष्य झाले आहेत, त्यांना सोडवणारा कोणी नाही; ते लूट झाले आहेत, आणि “ती परत द्या” असे म्हणणारा कोणी नाही.
23ह्याकडे तुमच्यातला कोण कान देईल? ह्यापुढे कोण लक्ष देऊन हे ऐकेल?
24याकोबाला लुटीस कोणी जाऊ दिले? इस्राएलास लुटारूंच्या स्वाधीन कोणी केले? ज्या परमेश्वराविरुद्ध आम्ही पाप केले त्यानेच की नाही? त्याच्या मार्गांनी ते चालेनात, त्याचे नियमशास्त्र ते ऐकेनात;
25म्हणून त्याने त्यांच्यावर आपला कोप, आपला संताप व युद्धाचा गहजब ह्यांचा वर्षाव केला; त्याला चोहोकडून आग लागली तरी त्याला कळले नाही; तिचा भडका झाला तरी त्याने त्याची पर्वा केली नाही.

Currently Selected:

यशया 42: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Video for यशया 42