शास्ते 18
18
मीखा आणि दानवंशज
1त्या दिवसांत इस्राएलाचा कोणी राजा नव्हता. त्या वेळेस दान वंशाचे लोक राहण्यासाठी जागा शोधत होते. कारण इतर इस्राएली लोकांबरोबर त्यांना त्यांच्या वाट्याचे वतन अद्याप मिळाले नव्हते.
2तेव्हा दानवंशजांनी आपल्या कुळातल्या लोकांतून पाच शूर वीर निवडले आणि त्यांना सरा व एष्टावोल येथून देश हेरून पाहण्यास पाठवले; त्यांना ते त्या प्रांताची पाहणी करा असे म्हणाले; ते एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात मीखाच्या घरापर्यंत आले व तेथे त्यांनी रात्रीचा मुक्काम केला.
3ते मीखाच्या घराजवळ असताना त्यांनी त्या तरुण लेव्याचा आवाज ओळखला तेव्हा ते तिकडे जाऊन त्याला विचारू लागले, “तुला येथे कोणी आणले? तू येथे काय करतोस? तुझे येथे काय काम आहे?”
4त्याने त्यांना उत्तर दिले, “मीखाने मला वेतन देऊन ठेवले असून मी त्याचा पुरोहित झालो आहे; एवढे त्याने माझ्यासाठी केले आहे.”
5ते त्याला म्हणाले, “ज्या प्रवासाला आम्ही निघालो आहोत तो यशस्वी होईल की नाही हे देवाला विचारून पाहा.”
6तो पुरोहित त्यांना म्हणाला, “तुम्ही खुशाल जा; ज्या प्रवासाला तुम्ही निघाला आहात तो परमेश्वराला मंजूर आहे.”
7मग ते पाच पुरुष निघून लईश येथे गेले. तेथे त्यांना असे दिसून आले की, तेथील लोक सीदोनी लोकांप्रमाणे शांत व निश्चिंत आहेत; अन्नधान्याची त्यांना मुळीच वाण नसून ते धनवान आहेत; ते सीदोनी लोकांपासून दूर राहत असून अरामी लोकांशी त्यांचा काही संबंध नाही.
8नंतर ते सरा व एष्टावोल येथे आपल्या भाऊबंदांकडे परत आले तेव्हा त्यांचे भाऊबंद त्यांना विचारू लागले, “तुम्ही काय खबर आणली आहे?”
9त्यांनी म्हटले, “आम्ही तो प्रदेश पाहिला असून तो फार उत्तम आहे. चला उठा; आपण त्या लोकांवर हल्ला चढवू. तुम्ही स्वस्थ का बसला आहात? तेथे जाऊन तो देश ताब्यात घेण्याबाबत काही हयगय करू नका.
10तेथे गेल्यावर निश्चिंत राहणारे लोक तुम्हांला आढळतील. तो देश विस्तीर्ण असून देवाने खरोखर तो तुमच्या हाती दिला आहे. ती जागाच अशी आहे की, तेथे जमिनीच्या कोणत्याही उत्पन्नाची कमतरता नाही.”
11तेव्हा सरा व एष्टावोल येथून दान कुळातले सहाशे पुरुष सशस्त्र होऊन निघाले.
12त्यांनी कूच करून यहूदातील किर्याथ-यारीम येथे तळ दिला. ह्यामुळे त्या स्थळाला आजपर्यंत महाने-दान (दानाची छावणी) असे म्हणतात. ते किर्याथ-यारीमच्या पश्चिमेस आहे.
13तेथून निघून ते एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात मीखाच्या घराजवळ आले.
14तेव्हा लईश प्रदेश हेरायला गेलेले पाच जण आपल्या बांधवांना म्हणाले, “ह्या घरात एक एफोद, तेराफीम (कुलदेवता), एक कोरीव मूर्ती आणि एक ओतीव मूर्ती आहे हे तुम्हांला माहीत आहे काय? आता काय करायचे ह्याचा विचार करा.”
15ते तिकडे वळले आणि मीखाच्या घरी राहणार्या तरुण लेवीच्या खोलीत जाऊन त्यांनी त्याचे क्षेमकुशल विचारले.
16मग ते दान वंशातले सहाशे सशस्त्र लोक वेशीच्या दरवाजाजवळ उभे राहिले;
17तेव्हा देश हेरायला गेलेल्या पाच लोकांनी आत शिरून त्या कोरीव व ओतीव मूर्ती, एफोद व तेराफीम (कुलदेवता) बाहेर आणल्या. त्या वेळेस पुरोहित सहाशे सशस्त्र लोकांसह वेशीच्या दरवाजात उभा राहिला होता.
18त्या पाच जणांनी मीखाच्या घरात शिरून त्या कोरीव व ओतीव मूर्ती, एफोद व तेराफीम (कुलदेवता) बाहेर आणल्या तेव्हा पुरोहिताने त्यांना हटकले, “तुम्ही हे काय चालवले आहे?”
19ते त्याला म्हणाले, “गप्प बस; तोंड बंद कर, आमच्याबरोबर चल; आमचा वडील व पुरोहित म्हणून राहा. एकाच मनुष्याच्या घरी पुरोहित होऊन राहण्यापेक्षा इस्राएलाच्या एखाद्या वंशाचा व कुळाचा पुरोहित होऊन राहणे अधिक बरे नाही काय?”
20हे ऐकून पुरोहित खूश झाला आणि एफोद, कुलदेवता व कोरीव मूर्ती घेऊन त्या लोकांबरोबर गेला.
21मग ते मागे फिरून आपल्या वाटेने गेले. त्यांनी आपली मुलेबाळे, पशू आणि सामानसुमान आपल्यापुढे चालवून कूच केले.
22ते मीखाच्या घरापासून बरेच दूर गेल्यावर त्याच्या घराच्या आसपास राहणार्या लोकांनी जमा होऊन दानाच्या लोकांना जाऊन गाठले.
23त्यांनी दानाच्या लोकांना हाका मारल्या; तेव्हा त्यांनी मागे वळून मीखाला विचारले, “काय झाले? तुम्ही इतके जण का जमा झालात?”
24तो म्हणाला, “मी स्वतःसाठी केलेले देव व माझा पुरोहित तुम्ही घेऊन चाललात; माझे आता काय राहिले आहे! आणि वर मला विचारता की, काय झाले?”
25दानवंशजांनी त्याला म्हटले, “तुझा आवाज चढवू नकोस, नाहीतर आमचे अविचारी लोक तुझ्यावर तुटून पडतील आणि तू व तुझ्या घरचे लोक प्राणास मुकाल.”
26मग दानवंशज आपल्या वाटेने चालू लागले. मीखाने पाहिले की, हे लोक आपल्याला भारी आहेत, तेव्हा तो आपल्या घरी परतला.
27मीखाने बनवलेल्या वस्तू व त्याचा पुरोहित बरोबर घेऊन ते लईश येथे आले. तेथील लोक शांत व निश्चिंत राहत होते. त्यांना त्यांनी तलवारीने मारून त्यांचे नगर जाळून टाकले.
28त्या नगराचा बचाव करायला कोणी नव्हता; कारण ते सीदोनापासून दूर होते आणि अराम्यांशी त्या नगरवासीयांचा काही संबंध नव्हता. ते नगर बेथ-रहोबच्या जवळ असलेल्या खोर्यात होते. ते नगर पुन्हा वसवून त्यात ते राहू लागले.
29त्यांनी त्या नगराला इस्राएलाचा एक मुलगा म्हणजे आपला पूर्वज दान ह्याचे नाव दिले. पूर्वी त्या नगराचे नाव लईश होते.
30दानवंशजांनी त्या कोरीव मूर्तीची स्थापना केली; देशाचा पाडाव होईपर्यंत गेर्षोमाचा मुलगा व मोशेचा नातू योनाथान व त्याचे वंशज दानवंशाचे पौरोहित्य करत होते.
31मीखाने केलेली कोरीव मूर्ती त्यांनी आपल्यासाठी स्थापली होती व देवाचे मंदिर शिलो येथे असेपर्यंत ती तेथे होती.
Currently Selected:
शास्ते 18: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.