YouVersion Logo
Search Icon

यिर्मया 19

19
भंगलेल्या मडक्यावरून धडा
1परमेश्वर म्हणाला, “जा, कुंभाराचे एक मडके विकत घे आणि आपल्याबरोबर लोकांचे व याजकांचे काही वडील घेऊन,
2जेथे खापर्‍या टाकतात त्या वेशीसमोरच्या बेन-हिन्नोम खोर्‍यात जा, तेथे मी तुला सांगेन ती वचने जाहीर कर.
3असे म्हण, ‘अहो यहूदाच्या राजांनो, व अहो यरुशलेम-निवासी जनांनो, परमेश्वराचे वचन ऐका; सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, पाहा, ह्या स्थळावर मी अरिष्ट आणतो, त्याविषयी जो कोणी ऐकेल त्याचे कान भणभणतील.
4त्यांनी माझा त्याग केला आहे, हे स्थान त्यांनी परक्यांचे असे मानले आहे; त्यांचे पूर्वज व यहूदाचे राजे ह्यांना जे माहीत नव्हते अशा अन्य देवांपुढे त्यांनी धूप जाळला; निर्दोष्यांच्या रक्ताने ते स्थान भरले;
5आणि बआलदैवताप्रीत्यर्थ आपले पुत्र होमार्पण म्हणून अग्नीत होम करण्यासाठी त्यांनी उच्च स्थाने बांधली; अशी आज्ञा मी केली नव्हती, हे मी सांगितले नव्हते, हे माझ्या मनातही आले नव्हते.
6परमेश्वर म्हणतो, पाहा, ह्या कारणास्तव ह्या स्थळास तोफेत व बेन-हिन्नोमाचे खोरे म्हणणार नाहीत, तर वधाचे खोरे म्हणतील, असे दिवस येत आहेत.
7ह्या स्थळी यहूदा व यरुशलेम ह्यांची मसलत मी निष्फल करीन; त्यांच्या शत्रूंपुढे त्यांचा जीव घेण्यास टपणार्‍यांच्या हाताने, तलवारीने ते पडतील असे मी करीन; त्यांची प्रेते आकाशांतील पक्ष्यांना व पृथ्वीवरील श्वापदांना भक्ष्य म्हणून देईन.
8मी हे नगर विस्मय व उपहास ह्यांना पात्र करीन; त्यावर झालेल्या सर्व आघातांमुळे त्याच्याजवळून जाणारा-येणारा प्रत्येक जण विस्मित होऊन उपहास करील.
9मी त्यांना त्यांच्या पुत्रांचे मांस व त्यांच्या कन्यांचे मांस खायला लावीन; त्यांचे शत्रू व त्यांचा जीव घेण्यास टपणारे त्यांना वेढा घालतील व पेचात आणतील, तेव्हा त्यांच्यातला प्रत्येक जण आपल्या शेजार्‍याचे मांस खाईल.’
10मग जी माणसे तुझ्याबरोबर असतील त्यांच्या डोळ्यांदेखत ते मातीचे मडके फोड;
11आणि त्यांना सांग, सेनाधीश परमेश्वर म्हणतो कुंभाराच्या मडक्याचा भंग केल्यास ते नीट करता येत नाही, तसे मी ह्या लोकांचा व ह्या नगराचा भंग करीन व पुरण्यास जागा उरणार नाही इतके लोक तोफेत येथे पुरण्यात येतील.
12परमेश्वर म्हणतो, हे नगर तोफेतासारखे करावे म्हणून मी हे स्थळ व त्यातील रहिवासी ह्यांचे असे करीन.
13ज्या सर्व घरांच्या धाब्यांवर त्यांनी आकाशातील सर्व सेनांना धूप जाळला व अन्य देवांना पेयार्पणे अर्पण केली ती यरुशलेमेतील घरे व यहूदाच्या राजांची घरे तोफेताच्या स्थळाप्रमाणे अशुद्ध होतील.”’
14मग परमेश्वराने यिर्मयाला तोफेत येथे जाऊन संदेश देण्यास पाठवले; तेथून तो आला व परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात उभा राहून सर्व लोकांना म्हणाला,
15“सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, पाहा, मी ह्या नगरावर व त्याच्या सर्व गावांवर जे अरिष्ट आणणार म्हणून म्हणालो ते सर्व आणीन, कारण माझी वचने ऐकू नयेत म्हणून त्यांनी आपली मान ताठ केली.”

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in