YouVersion Logo
Search Icon

यिर्मया 40

40
यिर्मया, गदल्या व उरलेले लोक
1गारद्यांचा नायक नबूजरदान ह्याने यरुशलेम व यहूदा ह्यांतील जे लोक बंदिवान करून बाबेलास नेले त्या सर्वांबरोबर यिर्मयालाही बेड्या घालून रामा येथे आणले होते; तेथे त्याने यिर्मयाची सुटका केल्यानंतर यिर्मयाला वचन प्राप्त झाले ते हे :
2गारद्यांचा नायक यिर्मयाला बोलावून म्हणाला, “तुझा देव परमेश्वर ह्याने हे अरिष्ट ह्या स्थळावर येईल असे जाहीर केले;
3परमेश्वराने ते आणले व आपल्या म्हणण्याप्रमाणे केले. तुम्ही परमेश्वराविरुद्ध पाप केले व त्याची वाणी मानली नाही म्हणून हे तुमच्यावर आले.
4आता पाहा, आज तुझ्या हातांत असलेल्या बेड्यांपासून मी तुला मुक्त करतो; तुला माझ्याबरोबर बाबेलास येणे बरे वाटले तर ये, मी तुझी चांगली व्यवस्था ठेवीन; पण माझ्याबरोबर बाबेलास येणे तुला बरे न वाटले तर येऊ नकोस; पाहा, सगळा देश तुझ्यापुढे आहे; तुला बरे व सोईचे वाटेल तिकडे जा.”
5तो परतला नाही तोच तो त्याला म्हणाला, “गदल्या बिन अहीकाम बिन शाफान ह्याला बाबेलच्या राजाने यहूदाच्या नगरांवर अधिपती नेमले आहे, त्याच्याकडे परत जा व त्याच्याबरोबर लोकांमध्ये जाऊन वस्ती कर; किंवा तुला सोईचे वाटेल तेथे जा.” मग गारद्यांच्या नायकाने त्याला अन्नसामग्री व इनाम देऊन रवाना केले.
6तेव्हा यिर्मया निघून मिस्पा येथे गदल्या बिन अहीकाम ह्याच्याकडे गेला व देशात जे लोक उरले होते त्यांच्यामध्ये जाऊन राहिला.
7बाबेलच्या राजाने गदल्या बिन अहीकाम ह्याला देशाचा अधिपती नेमून पुरुष, स्त्रिया, मुले, देशातील सर्व लाचार व ज्या कोणाला पकडून बाबेलास नेले नव्हते ते सर्व त्याच्या स्वाधीन केले आहेत असे जेव्हा रानावनात असलेल्या सेनानायकांनी व त्यांच्या लोकांनी ऐकले,
8तेव्हा ते, म्हणजे इश्माएल बिन नथन्या, कारेहपुत्र योहानान व योनाथान, सराया बिन तान्हुमेथ, नटोफाथी रफै ह्याचे पुत्र व याजन्या (हा एका माकाथीचा पुत्र) हे व त्याचे लोक गदल्याकडे मिस्पास आले.
9गदल्या बिन अहीकाम बिन शाफान ह्याने त्यांना व त्यांच्या लोकांना शपथेवर सांगितले की, खास्द्यांची सेवा करण्यास भिऊ नका. देशात वस्ती करा, बाबेलच्या राजाची सेवा करा, म्हणजे तुमचे कल्याण होईल.
10पाहा, मी तर जे खास्दी आपल्याकडे येतील त्यांच्या तैनातीसाठी मिस्पा येथे राहतो; पण तुम्ही द्राक्षारस, ग्रीष्म ऋतूतील फळे व तेल ह्यांचा संचय करून आपल्या भांड्यांत भरून ठेवा व तुम्ही ताब्यात घेतलेल्या नगरात राहा.”
11त्याचप्रमाणे मवाबात अम्मोनी लोकांमध्ये, अदोमात व इतर सर्व देशांत जे यहूदी होते त्या सर्वांनी जेव्हा ऐकले की बाबेलच्या राजाने यहूदाचा अवशेष देशात राहू दिला आहे व त्यांच्यावर गदल्या बिन अहीकाम बिन शाफान नेमला आहे,
12तेव्हा ज्या ज्या ठिकाणी त्यांना हाकून दिले होते तेथून सर्व यहूदी परत यहूदा देशात मिस्पा येथे गदल्याकडे आले व त्यांनी द्राक्षारस व ग्रीष्म ऋतूतील फळे ह्यांचा मोठा संचय केला.
इश्माएलचे गदल्याविरुद्ध बंड
13ह्याखेरीज योहानान बिन कारेह व रानावनात असलेले सर्व सेनानायक हे मिस्पा येथे गदल्याकडे आले.
14ते त्याला म्हणाले, “अम्मोनी लोकांचा राजा बालीस ह्याने आपला जीव घेण्यासाठी नथन्याचा पुत्र इश्माएल ह्याला पाठवले आहे हे आपणांला ठाऊक आहे काय?” पण गदल्या बिन अहीकाम ह्याला त्यांचे खरे वाटेना.
15तेव्हा योहानान बिन कारेह गदल्यास मिस्पा येथे गुप्तपणे म्हणाला, “मला जाऊन इश्माएल बिन नथन्या ह्याला ठार करू द्या; हे कोणाला कळणार नाही; त्याने आपला प्राण का घ्यावा? घेतल्यास आपणांकडे जमलेले सर्व यहूदी पांगतील व यहूदाच्या अवशेषाचा नाश होईल.”
16पण गदल्या बिन अहीकाम हा योहानान बिन कारेह ह्याला म्हणाला, “असे करू नकोस; कारण तू इश्माएलाविषयी खोटेनाटे सांगत आहेस.”

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in