YouVersion Logo
Search Icon

मत्तय 13

13
पेरणी करणार्‍याचा दृष्टान्त
1त्या दिवशी येशू घरातून निघून समुद्रकिनार्‍याशी जाऊन बसला.
2तेव्हा लोकांचे थवेच्या थवे त्याच्याजवळ जमले; म्हणून तो मचव्यात जाऊन बसला व सर्व लोक किनार्‍यावर उभे राहिले.
3मग त्याने त्यांना दाखल्यांनी पुष्कळ गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला, “पाहा, पेरणारा पेरणी करण्यास निघाला.
4आणि तो पेरत असता काही बी वाटेवर पडले व पाखरांनी येऊन ते खाऊन टाकले.
5काही खडकाळीवर पडले, तेथे त्याला फारशी माती नव्हती, आणि माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले;
6आणि सूर्य वर आला तेव्हा ते करपले व त्याला मूळ नव्हते म्हणून ते वाळून गेले.
7काही काटेरी झाडांमध्ये पडले; मग काटेरी झाडांनी वाढून त्याची वाढ खुंटवली.
8काही चांगल्या जमिनीत पडले; मग त्याचे कोठे शंभरपट, कोठे साठपट तर कोठे तीसपट, असे पीक आले.
9ज्याला कान आहेत तो ऐको.”
दृष्टान्तांचा उपयोग
10मग शिष्य जवळ येऊन त्याला म्हणाले, “आपण त्यांच्याबरोबर दाखल्यांनी का बोलता?”
11त्याने त्यांना उत्तर दिले, “स्वर्गाच्या राज्याची रहस्ये जाणण्याचे दान तुम्हांला दिलेले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही.
12कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला भरपूर होईल; परंतु ज्या कोणाजवळ नाही त्याचे जे असेल तेदेखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल.
13ह्यास्तव मी त्यांच्याबरोबर दाखल्यांनी बोलतो; कारण ते पाहत असता पाहत नाहीत, आणि ऐकत असता ऐकत नाहीत व त्यांना समजतही नाही.
14यशयाचा संदेश त्यांच्याविषयी पूर्ण होत आहे, तो असा की,
‘तुम्ही ऐकाल तर खरे,
परंतु तुम्हांला समजणारच नाही,
व पाहाल तर खरे,
परंतु तुम्हांला दिसणारच नाही;
15कारण ह्या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे,
ते कानांनी मंद ऐकतात,
आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत;
ह्यासाठी की, त्यांनी डोळ्यांनी पाहू नये,
कानांनी ऐकू नये,
अंतःकरणाने समजू नये व वळू नये,
आणि मी त्यांना बरे करू नये.’
16पण धन्य तुमचे डोळे, कारण ते पाहत आहेत; आणि तुमचे कान, कारण ते ऐकत आहेत.
17मी तुम्हांला खचीत सांगतो की, तुम्ही जे पाहत आहात ते पाहण्यास पुष्कळ संदेष्टे व नीतिमान जन उत्कंठित होते, तरी त्यांना पाहण्यास मिळाले नाही; आणि तुम्ही जे ऐकता ते ऐकण्यास ते उत्कंठित होते, तरी त्यांना ऐकण्यास मिळाले नाही.
पेरणार्‍याच्या दृष्टान्ताचे स्पष्टीकरण
18आता तुम्ही पेरणार्‍याचा दाखला ऐकून घ्या.
19कोणी राज्याचे वचन ऐकतो पण ते त्याला समजत नाही, तेव्हा तो दुष्ट येऊन त्याच्या अंतःकरणात पेरलेले ते हिरावून घेतो; वाटेवर पेरलेला तो हा आहे.
20खडकाळीवर पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकतो व ते तत्काळ आनंदाने ग्रहण करतो;
21परंतु त्याला मूळ नसल्याकारणाने तो थोडाच वेळ टिकतो, आणि वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे तो लगेच अडखळतो.
22काटेरी झाडांमध्ये पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकतो, परंतु संसाराची चिंता व द्रव्याचा मोह वचनाची वाढ खुंटवतात आणि तो निष्फळ होतो.
23चांगल्या जमिनीत पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकून ते समजतो; तो फळ देतोच देतो; कोणी शंभरपट, कोणी साठपट, तर कोणी तीसपट असे देतो.”
निदणाचा दृष्टान्त
24त्याने त्यांच्यापुढे दुसरा एक दाखला मांडला : “कोणाएका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले त्याच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे.
25लोक झोपेत असताना त्याचा वैरी येऊन गव्हामध्ये निदण पेरून गेला.
26पण जेव्हा पाला फुटला व दाणे आले तेव्हा निदणही दिसले.
27तेव्हा घरधन्याच्या दासांनी येऊन त्याला म्हटले, ‘महाराज, आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले ना? तर मग त्यात निदण कोठून आले?’
28तो त्यांना म्हणाला, ‘हे काम कोणा वैर्‍याचे आहे.’ दासांनी त्याला म्हटले, ‘तर आम्ही जाऊन ते जमा करावे अशी आपली इच्छा आहे काय?’
29तो म्हणाला, ‘नाही. तुम्ही निदण गोळा करताना त्याच्याबरोबर कदाचित गहूही उपटाल.
30कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या; मग कापणीच्या वेळेस मी कापणार्‍यांना सांगेन की, आधी निदण गोळा करा व जाळण्यासाठी त्याच्या पेंढ्या बांधा; परंतु गहू माझ्या कोठारात साठवा.”’
मोहरीचा दाणा व खमीर ह्यांचे दृष्टान्त
31त्याने त्यांच्यापुढे आणखी एक दाखला मांडला की, “स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे; तो कोणाएका मनुष्याने घेऊन आपल्या शेतात लावला;
32तो तर सर्व दाण्यांमध्ये लहान आहे; तरी वाढल्यावर भाज्यांपेक्षा मोठा होऊन त्याचे असे झाड होते, की ‘आकाशातील पाखरे’ येऊन ‘त्याच्या फांद्यांत वस्ती करतात.”’
33त्याने त्यांना आणखी एक दाखला सांगितला की, “स्वर्गाचे राज्य खमिरासारखे आहे; ते एका स्त्रीने घेऊन तीन मापे पिठामध्ये लपवून ठेवले, तेणेकरून शेवटी ते सर्व पीठ फुगून गेले.”
34ह्या सर्व गोष्टी येशूने दाखल्यांनी लोकसमुदायांना सांगितल्या आणि दाखल्यावाचून तो त्यांच्याबरोबर काही बोलला नाही;
35ह्यासाठी की, संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे; ते असे की,
“मी आपले तोंड उघडून दाखले देईन;
जगाच्या स्थापनेपासून जे गुप्त ते प्रकट करीन.”
निदणाच्या दृष्टान्ताचे स्पष्टीकरण
36नंतर तो लोकसमुदायांना निरोप देऊन घरात गेला. तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, “शेतातल्या निदणाच्या दाखल्याची आम्हांला फोड करून सांगा.”
37त्याने उत्तर दिले की, “चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे;
38शेत हे जग आहे; चांगले बी हे राज्याचे पुत्र आहेत; निदण हे त्या दुष्टाचे पुत्र आहेत;
39ते पेरणारा वैरी हा सैतान आहे; कापणी ही युगाची समाप्ती आहे; आणि कापणारे हे देवदूत आहेत.
40तेव्हा जसे निदण गोळा करून अग्नीत जाळतात तसे युगाच्या समाप्तीस होईल.
41मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांना पाठवील, आणि ते सर्व ‘अडखळवणार्‍यांना व अनाचार करणार्‍यांना’ त्याच्या राज्यातून जमा करून
42त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील; तेथे रडणे व दात खाणे चालेल.
43तेव्हा ‘नीतिमान’ आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे ‘प्रकाशतील.’ ज्याला कान आहेत तो ऐको.
ठेव, मोती व जाळे ह्यांचे दृष्टान्त
44स्वर्गाचे राज्य शेतात लपवलेल्या ठेवीसारखे आहे; ती कोणाएका मनुष्याला सापडली आणि त्याने ती लपवून ठेवली. मग आनंदाच्या भरात तो जातो, आपले सर्वस्व विकतो आणि ते शेत विकत घेतो.
45आणखी, स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्यांचा शोध करणार्‍या कोणाएका व्यापार्‍यासारखे आहे;
46त्याला एक अति मोलवान मोती आढळला; मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि तो विकत घेतला.
47आणखी, स्वर्गाचे राज्य समुद्रात टाकलेल्या एखाद्या जाळ्यात सर्व प्रकारचे जीव एकत्र सापडतात त्यासारखे आहे;
48ते भरल्यावर माणसांनी ते किनार्‍याकडे ओढले आणि बसून जे चांगले ते भांड्यांत जमा केले, वाईट ते फेकून दिले.
49तसे युगाच्या समाप्तीस होईल; देवदूत येऊन नीतिमानांतून दुष्टांना वेगळे करतील
50आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील; तेथे रडणे व दात खाणे चालेल.”
51येशू त्यांना म्हणाला, “तुम्हांला ह्या सर्व गोष्टी समजल्या काय?” ते त्याला म्हणाले, “होय प्रभूजी.”
52तेव्हा तो त्यांना म्हणाला, “प्रत्येक शास्त्री जो स्वर्गाच्या राज्याचा शिष्य झाला आहे तो आपल्या भांडारातून नव्याजुन्या गोष्टी काढणार्‍या गृहस्थासारखा आहे.”
नासरेथात येशूचा अव्हेर
53नंतर असे झाले की, हे दाखले सांगण्याचे समाप्त केल्यावर येशू तेथून निघाला.
54आणि स्वतःच्या गावी आल्यावर त्याने त्यांच्या सभास्थानात त्यांना अशी शिकवण दिली की ते आश्‍चर्यचकित होऊन म्हणाले, “हे ज्ञान व अद्भुत कृत्ये करण्याचे हे सामर्थ्य ह्याला कोठून?
55हा सुताराचा पुत्र ना? ह्याच्या आईला मरीया म्हणतात ना? याकोब, योसे, शिमोन व यहूदा, हे ह्याचे भाऊ ना?
56ह्याच्या बहिणी, त्या सर्व आपल्याबरोबर नाहीत काय? मग हे सर्व ह्याला कोठून?”
57असे ते त्याच्याविषयी अडखळले. येशूने त्यांना म्हटले, “संदेष्ट्याला आपला देश व आपले घर ह्यांत मात्र सन्मान मिळत नाही.”
58तेथे त्यांच्या अविश्वासामुळे त्याने फारशी अद्भुत कृत्ये केली नाहीत.

Currently Selected:

मत्तय 13: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in