मत्तय 25
25
दहा कुमारींचा दृष्टान्त
1तेव्हा स्वर्गाचे राज्य दहा कुमारींसारखे असेल; त्या आपले दिवे घेऊन वराला सामोर्या जाण्यास निघाल्या.
2त्यांत पाच मूर्ख होत्या व पाच शहाण्या होत्या.
3कारण मूर्ख कुमारींनी आपले दिवे घेतले; पण आपल्याबरोबर तेल घेतले नाही;
4शहाण्यांनी आपले दिवे घेतले व भांड्यांत तेलही घेतले.
5मग वराला विलंब लागला व त्या सर्वांना डुलक्या आल्या व झोप लागली.
6तेव्हा मध्यरात्री अशी हाक आली की, ‘पाहा, वर आला आहे, त्याला सामोर्या चला.’
7मग त्या सर्व कुमारी उठून आपापले दिवे नीट करू लागल्या.
8तेव्हा मूर्खांनी शहाण्यांना म्हटले, ‘तुम्ही आम्हांला तुमच्या तेलातून काही द्या, कारण आमचे दिवे जाऊ लागले आहेत.’
9पण शहाण्यांनी उत्तर दिले की, ‘कदाचित आम्हांला व तुम्हांलाही पुरणार नाही; तुम्ही विकणार्यांकडे जाऊन स्वतःकरता विकत घ्यावे हे बरे.’
10त्या विकत घेण्यास गेल्या असता वर आला; तेव्हा ज्यांची तयारी झाली होती त्या त्याच्याबरोबर आत लग्नास गेल्या आणि दार बंद झाले.
11नंतर त्या दुसर्याही कुमारी येऊन म्हणाल्या, ‘प्रभूजी, प्रभूजी, आमच्यासाठी दार उघडा.’
12त्याने उत्तर दिले, ‘मी तुम्हांला खचीत सांगतो, मी तुम्हांला ओळखत नाही.’
13म्हणून तुम्ही जागृत राहा, कारण कोणत्या दिवशी किंवा कोणत्या घटकेस मनुष्याचा पुत्र येईल हे तुम्हांला ठाऊक नाही.
रुपयांचा दृष्टान्त
14कारण ज्याप्रमाणे परदेशी जाणार्या एका मनुष्याने आपल्या दासांना बोलावून त्यांच्यावर आपली मालमत्ता सोपवून दिली, त्याप्रमाणे हे आहे.
15एकाला त्याने पाच हजार रुपये, एकाला दोन हजार व एकाला एक हजार असे ज्याच्या-त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले; आणि तो परदेशी गेला.
16ज्याला पाच हजार मिळाले होते त्याने लगेचच जाऊन त्यांवर व्यापार केला व आणखी पाच हजार मिळवले.
17तसेच ज्याला दोन हजार मिळाले होते त्यानेही आणखी दोन हजार मिळवले.
18परंतु ज्याला एक हजार मिळाले होते त्याने जाऊन जमीन खणली व तिच्यात आपल्या धन्याचा पैका लपवून ठेवला.
19मग बराच काळ लोटल्यावर त्या दासांचा धनी आला व त्यांच्यापासून हिशेब घेऊ लागला.
20तेव्हा ज्याला पाच हजार मिळाले होते तो आणखी पाच हजार आणून म्हणाला, ‘महाराज, आपण मला पाच हजार रुपये सोपवून दिले होते; पाहा, त्यांवर मी आणखी पाच हजार रुपये मिळवले आहेत.’
21त्याला त्याच्या धन्याने म्हटले, ‘शाबास, भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन; तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो.’
22मग ज्याला दोन हजार मिळाले होते तोही येऊन म्हणाला, ‘महाराज, आपण मला दोन हजार रुपये सोपवून दिले होते; पाहा, त्यांवर मी आणखी दोन हजार रुपये मिळवले आहेत.’
23त्याला त्याच्या धन्याने म्हटले, ‘शाबास, भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन; तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो.’
24नंतर ज्याला एक हजार मिळाले होते तोही येऊन म्हणाला, ‘महाराज, मी जाणून होतो की, तुम्ही कठोर माणूस आहात; जेथे तुम्ही पेरले नाही तेथे कापणी करता व जेथे पसरून ठेवले नाही तेथून गोळा करता;
25म्हणून मी भ्यालो व तुमचे हजार रुपये मी जाऊन जमिनीत लपवून ठेवले होते; पाहा, ते तुमचे तुम्हांला मिळाले आहेत.’
26तेव्हा त्याच्या धन्याने त्याला उत्तर दिले, ‘अरे दुष्ट व आळशी दासा, जेथे मी पेरले नाही तेथे कापतो व पसरून ठेवले नाही तेथून गोळा करतो हे तुला ठाऊक होते काय?
27तर माझे पैसे सावकारांकडे ठेवायचे होते, म्हणजे मी आल्यावर माझे मला व्याजासकट परत मिळाले असते.
28तर ते हजार रुपये त्याच्यापासून घ्या आणि ज्याच्याजवळ दहा हजार आहेत त्याला द्या.
29कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला भरपूर होईल; आणि ज्या कोणाजवळ नाही त्याच्याजवळ जे असेल तेदेखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल;
30आणि ह्या निरुपयोगी दासाला बाहेरील अंधारात टाका; तेथे रडणे व दात खाणे चालेल.’
न्यायाचा दिवस
31जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने ‘सर्व पवित्र देवदूतांसह येईल,’ तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल.
32त्याच्यापुढे सर्व राष्ट्रे जमवली जातील; आणि जसे मेंढपाळ शेरडांपासून मेंढरे वेगळी करतो तसे तो त्यांना एकमेकांपासून वेगळे करील,
33आणि मेंढरांना तो आपल्या उजवीकडे व शेरडांना डावीकडे ठेवील.
34तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्यांना म्हणेल, ‘अहो, माझ्या पित्याचे आशीर्वादितहो, या; जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्याकरता सिद्ध केले आहे ते वतन घ्या;
35कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले, तान्हेला होतो तेव्हा मला प्यायला पाणी दिले, परका होतो तेव्हा मला घरात घेतले,
36उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले, आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला आलात, बंदिशाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आलात.’
37त्या वेळेस नीतिमान त्याला उत्तर देतील की, ‘प्रभूजी, आम्ही तुम्हांला केव्हा भुकेले पाहून खायला दिले? केव्हा तान्हेले पाहून प्यायला दिले?
38तुम्हांला परके पाहून केव्हा घरात घेतले? उघडे पाहून केव्हा वस्त्र दिले?
39आणि तुम्हांला आजारी अथवा बंदिशाळेत पाहून केव्हा आम्ही तुमच्याकडे आलो?’
40तेव्हा राजा त्यांना उत्तर देईल, ‘मी तुम्हांला खचीत सांगतो की, ज्या अर्थी तुम्ही ह्या माझ्या कनिष्ठ बंधूंपैकी एकाला केले, त्या अर्थी ते मला केले आहे.’
41मग डावीकडच्यांनाही तो म्हणेल, ‘अहो शापग्रस्तहो, माझ्यापुढून निघा आणि सैतान व त्याचे दूत ह्यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे त्यात जा.
42कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले नाही, तान्हेला होतो तेव्हा मला प्यायला पाणी दिले नाही,
43परका होतो तेव्हा मला घरात घेतले नाही; उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले नाही, आजारी व बंदिशाळेत होतो तेव्हा माझ्या भेटीला आला नाहीत.’
44त्या वेळेस हेही त्याला उत्तर देतील, ‘प्रभूजी, आम्ही केव्हा तुम्हांला भुकेले, तान्हेले, परके, उघडे, आजारी किंवा बंदिशाळेत पाहिले आणि तुमची सेवा केली नाही?’
45तेव्हा तो त्यांना उत्तर देईल, ‘मी तुम्हांला खचीत सांगतो की, ज्या अर्थी ह्या कनिष्ठांपैकी एकालाही केले नाही, त्या अर्थी ते मला केले नाही.’
46‘ते तर सार्वकालिक’ शिक्षा भोगण्यास जातील; आणि नीतिमान ‘सार्वकालिक जीवन उपभोगण्यास’ जातील.”’
Currently Selected:
मत्तय 25: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.