मार्क 3
3
शब्बाथ दिवशी हात वाळलेल्या माणसास बरे करणे
1मग तो पुन्हा एका सभास्थानात गेला; तेथे वाळलेल्या हाताचा एक माणूस होता.
2आणि त्याच्यावर दोष ठेवावा म्हणून शब्बाथ दिवशी तो त्याला बरे करतो की काय हे पाहण्यास ते टपून बसले होते.
3तेव्हा त्याने हात वाळलेल्या माणसाला म्हटले, “ऊठ, मध्ये उभा राहा.”
4मग तो त्यांना म्हणाला, “शब्बाथ दिवशी बरे करणे किंवा वाईट करणे, जीव वाचवणे किंवा जीव घेणे, ह्यांतून कोणते सशास्त्र आहे?” पण ते उगेच राहिले.
5मग त्याने त्यांच्या मनाच्या कठीणपणामुळे खिन्न होऊन त्या सर्वांकडे रागाने पाहिले व त्या माणसाला म्हटले, “हात लांब कर.” त्याने हात लांब केला आणि तो बरा झाला.
6मग परूशी बाहेर जाऊन त्याचा (येशूचा) घात कसा करावा ह्याविषयी लगेचच हेरोदीयांबरोबर त्याच्याविरुद्ध मसलत करीत बसले.
येशू पुष्कळ रोग्यांना बरे करतो
7मग येशू आपल्या शिष्यांना घेऊन समुद्राकडे निघून गेला; आणि गालीलातून मोठा समुदाय मागोमाग निघाला;
8यहूदीया, यरुशलेम, इदोम व यार्देनेच्या पलीकडचा प्रांत आणि सोर व सीदोन ह्यांच्या आसपासचा प्रदेश ह्यांतूनही मोठा समुदाय, जी मोठमोठी कामे तो करत होता त्यांविषयी ऐकून त्याच्याकडे आला.
9तेव्हा दाटीमुळे आपण चेंगरून जाऊ नये म्हणून त्याने शिष्यांना एक होडी तयार ठेवण्यास सांगितले.
10कारण त्याने अनेकांना बरे केले होते, म्हणून जे रोगाने पिडलेले होते ते सर्व त्याला स्पर्श करण्यास त्याच्या अंगावर पडत होते.
11जेव्हा जेव्हा अशुद्ध आत्मे त्याला पाहत तेव्हा तेव्हा ते त्याच्या पाया पडून म्हणत की, “तू देवाचा पुत्र आहेस.”
12तेव्हा तो त्यांना सारखे निक्षून सांगत असे की, “मला प्रकट करू नका.”
बारा प्रेषितांची निवड
13मग तो डोंगर चढून गेला व त्याला जे हवे होते त्यांना त्याने बोलावले आणि ते त्याच्याकडे आले.
14तेव्हा त्याने बारा जणांची नेमणूक केली; अशासाठी की,
15त्यांनी त्याच्याबरोबर असावे, व रोग बरे करण्याचा व भुते काढण्याचा अधिकार देऊन, उपदेश करण्यास त्यांना पाठवावे.
16त्याने ह्या बारा जणांची नेमणूक केली व शिमोनाला पेत्र हे आणखी एक नाव दिले.
17जब्दीचा मुलगा याकोब व याकोबाचा भाऊ योहान ह्यांना बोआनेर्गेस म्हणजे गर्जनेचे पुत्र हेही नाव दिले;
18अंद्रिया, फिलिप्प, बर्थलमय, मत्तय, थोमा, अल्फीचा मुलगा याकोब, तद्दय, शिमोन कनानी,
19व त्याला धरून देणारा यहूदा इस्कर्योत.
सैतानाच्या साहाय्याने येशू आपली कामे करतो ह्या आरोपास त्याने दिलेले उत्तर
20मग तो घरी आला; तेव्हा पुन्हा इतके लोक जमले की त्यांना जेवायलाही सवड होईना.
21हे ऐकून त्याचे आप्त त्याला धरायला निघाले; कारण “त्याला वेड लागले आहे” असे त्यांचे म्हणणे होते.
22तसेच यरुशलेमेहून आलेले शास्त्री म्हणत होते की, “त्याला बालजबूल लागला आहे व तो त्या भुतांच्या अधिकार्याच्या साहाय्याने भुते काढतो.”
23तेव्हा तो त्यांना आपणाजवळ बोलावून म्हणू लागला की, “सैतान सैतानाला कसा काढील?
24आपसांत फूट पडलेले राज्य टिकत नाही.
25आपसांत फूट पडलेले घरही टिकत नाही.
26सैतान स्वतःवरच उठला व त्याच्यात फूट पडली तर तोही टिकणार नाही, त्याचा शेवट होणार.
27बलवान माणसाला आधी बांधून टाकल्याशिवाय कोणालाही त्याच्या घरात शिरून त्याची मालमत्ता लुटता येणार नाही; त्याला बांधल्यावरच त्याचे घर लुटता येईल.
28मी तुम्हांला खचीत सांगतो की, मानवपुत्रांना सर्व प्रकारच्या पापांची व त्यांनी केलेल्या दुर्भाषणांची क्षमा होईल,
29परंतु जो कोणी पवित्र आत्म्याची निंदा करील त्याला क्षमा नाहीच, तर तो सार्वकालिक पापाचा दोषी आहे.”
30“त्याला अशुद्ध आत्मा लागला आहे,” असे ते म्हणत होते म्हणून तो हे बोलला.
येशूचे वास्तविक नातेवाईक
31तेव्हा त्याची आई व त्याचे भाऊ आले, आणि बाहेर उभे राहून त्यांनी निरोप पाठवून त्याला बोलावले.
32त्याच्याभोवती पुष्कळ लोक बसले होते; ते त्याला म्हणाले, “पाहा, बाहेर आपली आई व आपले भाऊ आपला शोध करीत आहेत.”
33त्याने त्यांना उत्तर दिले, “कोण माझी आई व कोण माझे भाऊ?”
34मग जे त्याच्याभोवती बसले होते त्यांच्याकडे पाहून तो म्हणाला, “पाहा, ही माझी आई व हे माझे भाऊ!
35जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण व तीच माझी आई.”
Currently Selected:
मार्क 3: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.